रंजल्या-गांजल्यांचा तारणहार

09 Dec 2020 20:43:56

vinod shelar_1  


कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात झोपडपट्टी, चाळीत राहणारे, हातावर पोट असणारे अशा सर्वांसमोर जीवन जगण्याचे संकट उभे ठाकले. मात्र, भाजप नेते विनोद शेलार यांनी या कठीण काळात समाजातील रंजल्या-गांजल्यांचे दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले, कोरोना रुग्णांना बिल कमी करणे, वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, अशाप्रकारची मदत केली. तेव्हा, त्यांच्या या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


विनोद शेलार
राजकीय पक्ष : भाजप
कार्यक्षेत्र : उत्तर मुंबई
संपर्क क्र. : ९८६७६८९५४०


कोरोना महामारीच्या हल्ल्याने आणि त्यावर मात करण्यासाठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कमालीचे जिकिरीचे झाले. दोन वेळच्या जेवणासाठीही अनेक जण अगतिक झाले. परंतु, भाजप नेते विनोद शेलार यांनी याच काळात परिसरातील प्रत्येक रंजल्या-गांजल्यांच्या मदतीसाठी कष्ट उपसले. उत्तर मुंबईतील विविध परिसरातील झोपडपट्टी, चाळीत राहणार्‍या गरीब, हातावर पोट असलेल्यांसाठी गहू, तांदूळ, तयार पीठ, तेल, मीठ-मसाला, भाजीपाला आदी वस्तू त्यांनी अगदी घरपोच नेऊन दिल्या. विनोद शेलार यांनी ‘लॉकडाऊन’ काळात जवळपास ५८ टन अन्नधान्याचे वाटप केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी सुरुवातीचे अडीच ते तीन महिने मालाडमधील गरिबांसाठी तयार अन्न म्हणून खिचडीचे वाटपदेखील केले, जेणेकरून कोणीही उपाशीपोटी राहू नये. विनोद शेलार यांनी केलेल्या मदतीचे वैशिष्ट्य म्हणजे, एरवी दैनंदिन आयुष्यात ज्यांच्याकडे कोणाचे फारसे लक्ष जात नाही, अशा वर्गालाही त्यांनी मदत केली. त्यात ६०० तृतीयपंथीयांना अन्नधान्य व भोजन, ७०० अंध व्यक्तींना अन्नधान्य व भोजन, अनाथाश्रम, वृद्धाश्रमातही त्यांनी ही मदत पोहोचवली.



कोरोनाचे संकट आरोग्याशी निगडित असल्याने आरोग्यविषयक मदतीचीही आवश्यकता होती. त्यात रोगप्रतिकार शक्ती वर्धक गोळ्यांपासून आयुर्वेदिक काढे आणि मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझरचा समावेश होतो. विनोद शेलार यांनी नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून तब्बल दीड लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक गोळ्यांचे वाटप केले. तसेच पाच हजारांपेक्षा अधिकांना ‘आयुष’ काढ्याचे वाटप केले व हे काम अजूनही सुरू आहे. गरिबांबरोबरच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, कोरोनाशी प्रत्यक्ष लढणार्‍या रुग्णालयांतील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आदींनाही त्यांनी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ आणि ‘आयुष’ काढ्याचे वाटप केले. सोबतच पाच हजार हॅण्ड ग्लोव्हज, दोन हजार मास्क आणि सॅनिटायझरचेही त्यांनी वाटप केले. दरम्यान, कोरोनाची बाधा झालेल्यांना मदत करण्यासाठीही विनोद शेलार नेहमी पुढे राहिले. जसे की, कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती करणे, बेड मिळवून देणे, आयसीयू बेड मिळवून देणे, व्हेंटिलेटर मिळवून देणे. सुमारे ४०० रुग्णांना त्यांनी या काळात ही मदत केली, तर अनेकदा रुग्णालयांनी अधिकचे बिल लावल्याचे आढळल्यास संबंधित रुग्णालयाशी चर्चा करून, रुग्णाची परिस्थिती सांगून बिलाची रक्कम कमी करण्यासही भाग पाडले.


कोणत्याही संकटाशी सामना करायचा असेल, तर तो एकट्याने करता येत नाही, तर त्यात माणसाला सहकार्‍यांचीही आवश्यकता असते. असेच काहीसे विनोद शेलार यांच्याबाबतही झाले आणि त्यांच्यामागे त्यांचे कार्यकर्ते-सहकारी उभे राहिले. झोपडपट्टी, चाळी-वस्तीत जाऊन अन्नधान्यवाटप, खिचडीवाटप, औषध-काढावाटप यात विनोद शेलार यांना त्यांच्या सहकार्‍यांनी सातत्याने मदत केली. सहकारी-कार्यकर्ते नसते, तर इतक्या मोठ्या प्रमाणात मदतकार्य करताच आले नसते, असे त्यांनी सांगितले. तसेच सहकारी-कार्यकर्त्यांबरोबरच रोटरी क्लब, भारत विकास परिषद, साईदर्शन मंदिर आणि इतरही अनेक संस्थांनी त्यांना या कार्यात हातभार लावला. सोबतच पक्षपातळीवरील वरिष्ठ नेतृत्वाने विनोद शेलार यांना नेहमीच सहकार्य केले, मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांना मदतकार्यात सहकार्य-मार्गदर्शन केले, तसेच त्यांचे कार्य पाहून कौतुकही केले. दरम्यान, सरकारी यंत्रणांनीही विनोद शेलार यांना त्यांच्या मदतकार्यात सहकार्य केले. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, वाहतूक पोलीस, पालिकेची रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी अशा सर्वच यंत्रणांनी यात त्यांना मदत केली. तसेच या काळात महापालिका, पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय किंवा पालिकेचे स्वच्छता कर्मचारी हेदेखील विनोद शेलार यांना आपल्या समस्या सांगत असत व त्यातही त्यांनी मदत केली.



vinod shelar_1  


मी, बालपणापासून रा. स्व. संघाचा स्वयंसेवक असून परिवारातील अभाविपसह अनेक संघटनांमध्ये काम केलेले आहे, तसेच भाजपमध्येही विविध जबाबदार्‍या पार पाडल्या. विविध संघटनांशी जोडला गेल्याने त्यातून अडल्या-नडलेल्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. मदत-सहकार्य करण्याचे संस्कार संघाच्या शाखेतूनच झाले आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात याच संस्कारांच्या शिदोरीवर मदतकार्य केले.


समाजकार्य करताना आपल्या घरातील सदस्यांचा पाठिंबा खूपच आवश्यक असतो. कारण, समाजकार्य म्हणजे घराबाहेर राहून समाजासाठी मेहनत, परिश्रम करणे. विनोद शेलार यांना त्यांच्या या मदतकार्यात मुलगा, पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनीही पुरेपूर मदत केली. तरीही समाजकार्य व मदतकार्य करताना आव्हाने निर्माण होतातच आणि ते आव्हान जर पितृमृत्यूसारख्या संकटाचे असेल तर? होय, एप्रिलच्या सुरुवातीला, म्हणजे ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर विनोद शेलार यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. वडिलांचे निधन ही खरे तर फार मोठी गोष्ट; पण विनोद शेलार यांनी अशा परिस्थितीतही पुत्रकर्तव्य पार पाडताना समाजकर्तव्याला अंतर दिले नाही. ज्या दिवशी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच्या दुसर्‍या दिवशीच ते स्वतःचे वैयक्तिक दुःख विसरून गरजवंतांच्या समस्या, अडी-अडचणी, दुःख दूर करण्यासाठी सरसावले. सहकार्‍यांच्या-कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी सुमारे ८५० अन्नधान्याची पाकिटे म्हणजे आठ ते नऊ टन अन्नधान्याची मदत गरजूंपर्यंत पोहोचविली आणि वडिलांच्या निधनानंतर दोन दिवसांनी स्वतः विनोद शेलारदेखील पुन्हा समाजसेवेत उतरले.

भविष्यातील मदतीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही स्वतःच्या खर्चाने आणि देणगीदारांच्या खर्चाने कोरोनाकाळात गरिबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. पण, यापुढील काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या, शाळा-महाविद्यालयीन प्रवेशाच्या, शिक्षण शुल्काच्या आणि रुग्णालयांतील औषधे, व्हेंटिलेटर, बेड, बिल वगैरे समस्या सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे विनोद शेलार म्हणाले. दरम्यान, “कोरोना संकटाने स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची संधी दिली,” असे शेलार यांनी सांगितले. तसेच “मनापासून काम केले, तर शरीरातील प्रत्येक पेशी सकारात्मक होते आणि त्यातून जी आंतरिक शक्ती निर्माण होते, त्याने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळत राहते आणि यामुळेच कोरोना साथीच्या काळात बाहेर राहून, मदतकार्य करूनही मला कोरोना झाला नाही,” असे ते म्हणाले. सोबतच “आम्ही मदत केली नाही, तर आम्ही कर्तव्यभावनेने काम केले,” असेही ते म्हणतात. तसेच कामातून आनंद आणि आनंदातून काम केल्याचे व कोणताही राजकीय फायदा-तोटा न पाहता सेवाकार्य केल्याचे ते सांगतात.

Powered By Sangraha 9.0