स्वयंसेवकाचे सेवाव्रत

09 Dec 2020 13:14:26

Shrikant Rajput _1 &
 
 
 
 
देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक लागलेला ‘लॉकडाऊन’ आणि सर्वकाही ठप्प झाल्यानंतर आपल्या परीने सर्वसामान्यांना धीर देण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वितरण, भाजीपाला वितरण व मजुरांना अन्नदान करणारे भाजपचे ठाणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीकांत राजपूत. त्यांच्या मदतीमुळे कित्येकांच्या जीवनावश्यक गरजांचा प्रश्न मार्गी लागला. तेव्हा, श्रीकांत राजपूत यांनी कोरोनाकाळात केलेल्या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

 
 
नाव : श्रीकांत सुरेश राजपूत
राजकीय पक्ष : भाजप
पद : युवा मोर्चा उपाध्यक्ष, ठाणे शहर
कार्यक्षेत्र : ओवळा-माजिवडा
संपर्क क्रमांक : ९८१९०७२००१
 
 
 
“भाऊ, घरात खायला अन्न नाहीये! घरमालक भाड्यासाठी तगादा लावून बसलाय! माझी नोकरी गेलीय! घरात दोन लहान मुलं, आईबाप पोट कसं भरणार, या आशेने आमच्याकडे पाहतायत, काय करू?” रडवेल्या आवाजात श्रीकांत राजपूतांना फोनवरुन विचारणार्‍या त्या व्यक्तीने आपली व्यथा मांडली असावी. धीर देत तातडीने घरात महिनाभराचं रेशन, आरोग्य किट आणि भाजीपाला पोहोचवत फोन करणार्‍या व्यक्तीचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. घराचे एक महिन्याचे थकलेले भाडेही सोबत पोहोचविले. कुटुंबाला गावी पाठविण्याचीही व्यवस्था करून दिली. ठाण्यातील अनिल कांबळे यांची व्यथा ऐकून त्यांना धीर देण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
 
डाईंग कंपनीत काम करणारे कांबळे यांची ‘लॉकडाऊन’मुळे अचानक कंपनी बंद पडली. साहेब पगार देत नाही. घरी दोन लहान मुले आणि बायको. मध्यमवर्गीय कुटुंबावर जर अशी वेळ आली, तर इतर सर्वसामान्यांचे काय होईल? हा विचार राजपूत यांना स्वस्थ बसू देत नव्हता. कांबळे यांच्यासारखे हजारो कुटुंबीय अशा संकटात असतील. त्यानंतर मनात काय काय आणि कुठले कुठले विचार येत असतील, याचा विचार न केलेलाच बरा. परिस्थिती ऐकूनच अंगावर काटा येतो. ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती तशी भयंकरच होती, प्रत्येक जण आपापल्या घरात बसून होता. बाहेर कुठे येणे-जाणे नाही, का कुणाची भेट नाही, त्यामुळे मिळेल ती माहिती फोन किंवा सोशल मीडियावरच.
 
 
 
 
श्रीकांतही ‘लॉकडाऊन’मध्ये काही काळ घरीच होते. मात्र, परिस्थिती बिकट झाल्यानंतर बाहेर पडून इतरांना मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लोकांच्या हातात पैसे नव्हते. बाजार मंडया बंद, सारेकाही ठप्प होते. बाहेरून भाजीपाला आणून आपल्या परिसरातील कुटुंबांना वाटण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. घरात शिजवून काय खायचे, याचा प्रश्न लोकांना होताच. त्या दृष्टीने सुरू केलेल्या या मदतकार्यातून ठाणे वसंत विहारच्या म्हाडा कॉलनी परिसरातील १५० ते २०० कुटुंबीयांपर्यंत मदत पोहोचविली. प्रत्येक पिशवीत सात किलो भाजी, असे एकूण ८०० जणांपर्यंत श्रीकांत पोहोचले.
 
 
 
मदतकार्य सुरूच होते. ‘लॉकडाऊन’ वाढत होता. लोकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आणखी वेग धरत होती. तीन महिन्यांमध्ये एकूण १,२०० किलो भाजीपाला त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत पोहोचविला. पेशाने बांधकाम व्यावसायिक असल्याने मजूर हा समाजातील घटक काय असतो, याची जाणीव त्यांना होती. त्यांच्याकडे अंदाजित ३० ते ४० मजूर कायमस्वरूपी कामावर आहेत. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, असे मिळून ८० ते ९० जणांच्या जेवणाची व्यवस्थाही त्यांनी पाहिली. सुरुवातीचे काही दिवस महिनाभराचा आगावू पगार देऊन त्यांनाही त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली होती. अशाप्रकारे अन्नदान करण्याचे पुण्य आणि सेवाही श्रीकांत यांच्याकडून झाली.
 
 
तो काळ होता मे महिन्याचा. मजुरांचे लोंढेच्या लोंढे रस्ते महामार्गावरून निघत होते. अनेक चॅनल्स आणि टीव्हीवर त्यांचे थेट वार्तांकन केले जात होते. मजुरांना दोन घास जेवणाचे मिळावेत, या हेतूने खाद्यपदार्थांचे वाटप केले. सोबत पाण्याच्या बाटल्याही मजुरांना देऊ केल्या. नाशिकला निघालेल्या कामगारांना भिवंडी रोड येथे ही मदत करण्यात आली. बालपणापासून रा. स्व. संघ स्वयंसेवक असल्याकारणाने आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी पोहोचवायची, याबद्दलचे संस्कार होत गेले होते. कोरोना महामारीसारखी परिस्थिती मात्र अभूतपूर्व होती. त्यामुळे यापासून स्वतःचा बचाव करत लढणेही स्वतःसमोर एक आव्हान होते. ते आव्हान श्रीकांत यांनी लीलया पेलले. घरातूनही मदतकार्यासाठी प्रोत्साहन आणि संस्कार मिळाले होते, त्याचीही पुंजी या काळात कामाला आली, असे श्रीकांत सांगतात.
 
 
 
चाळीसगाव (जळगाव जिल्हा) येथे मूळ गाव असणार्‍या राजपूत कुटुंबीयांमध्ये श्रीकांत यांचे वडील सुरेश राजपूत आणि काका चंद्रकांत राजपूत दोघेही ‘कोरोना योद्धे’ म्हणून प्रशासकीय सेवेत आपली सेवा बजावत होते. दोन्ही वडीलधार्‍या व्यक्तींकडून कौतुकाची थाप मिळालीच, शिवाय समाजकार्य करण्याच्या सूचनाही मिळत गेल्या. कल्याणच्या कोनगाव भागात आजही राजपूत समाजाचा पगडा आहे. अनेक राजपूत कुटुंबीय तिथे राहतात. ‘लॉकडाऊन’मध्ये उद्योगधंदे ठप्प झाल्याने त्यांच्यावरही संकट ओढावले होते.
 
 

Shrikant Rajput _3 &
 
 
 
 
"मी एक स्वयंसेवक. त्यामुळे घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाल्यामुळे कोरोना महामारीसारख्या स्थितीतही मदत कशी पोहोचवावी, यासाठी वेगळी प्रेरणा मिळण्याची गरज नव्हती. स्वखर्चातून सुमारे अडीच लाखांचा निधी या सत्कार्यासाठी सत्कारणी लागला आहे. ही सेवा एका खारीच्या वाट्या इतकीच आहे. अजूनही परिस्थितीही सावरलेली नाही, प्रत्येकाने जमेल त्याप्रमाणे समाजकार्यात उतरायला हवे."
 
 
 
काकांनी ही गोष्ट श्रीकांत यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर मागे पुढे न पाहता, संपूर्ण कुटुंबीयांची गरज ओळखून त्यांना लागणारे महिनाभराचे रेशन घरपोच केले. डाळी, चहा पावडर, साखर, मीठ, गव्हाचे पीठ आदी साहित्य असलेला प्रत्येकी हजार रुपयांचा बाजार समाजातील १०० कुटुंबीयांपर्यंत पोहोचविला. मदत सुरूच होती. दररोज कुणा ना कुणाची समस्या समोर येत असे, त्यातून मार्ग काढायचा आणि मदत योग्य हातात पोहोचवायची, असे तीन महिने त्यांनी अनुभवले.
 
 
 
समाजकार्यात येणार्‍याला ही परिस्थिती काही नवी नाही. मात्र, कोरोनामुळे ही मदत युद्धपातळीवर पोहोचवावी लागत होती. कधी कधी दमछाकही होत होती. वाहतूक व्यवस्था, ‘लॉकडाऊन’, पोलीस बंदोबस्त आणि इतर निर्बंध याशिवाय ‘सोशल डिस्टन्सिंग’ही आलेच. या सगळ्यातून मदत करत असताना स्वतःलाही सुरक्षित ठेवायचे आव्हान होते. हे सर्व लीलया पार पाडत श्रीकांत यांनी मदत पोहोचविली. त्यात त्यांची साथ दिली ती त्यांच्या सहकार्‍यांनी.
 
 
 
 
 
वर्तकनगर मित्रमंडळाचे सरचिटणीस दिनेश दाभोळकर, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक मुकेश मोकाशी आणि सामाजिक कार्यकर्ते चेतन वडके या तिघांनीही. ठाण्यातील वर्तकनगर म्हाडा कॉलनीत पाच हजार मास्कवाटपही केले. परराज्यात जाणार्‍या मजुरांना मेडिकिट्सही पुरविले. येत्या काळात एकूण १२ हजार मास्कवाटपाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. जोपर्यंत संकट आहे, तोपर्यंत सेवाकार्य बजावत राहणार, असा निश्चय करणार्‍या श्रीकांत राजपूत यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!


 
Powered By Sangraha 9.0