कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नेते व ‘ठाणे गौरव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, ‘पीपीई किट’, औषध वितरणाची मदत नौपाड्यासह गरजेच्या प्रत्येक ठिकाणी केली. त्यामुळे गरीब-गरजूंना मोठा आधार लाभला. त्यांच्या या कोविडकाळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
कोविड योद्ध्याचे संपूर्ण नाव : डॉ. राजेश मुरलीधर मढवी
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
राजकीय पक्षातील जबाबदारीचे पद : नेता
कार्यक्षेत्र : नौपाडा
प्रभाग क्र. ः २१
संपर्क क्र. : ७५०६०००७८६
कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो, गरीब, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणारे पुरुष-महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना! त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला. परिणामी, समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने धाव घेणार्या डॉ. राजेश मढवी यांनी मदतीचा हात पुढे केला. यात त्यांना पत्नी प्रतिभा मढवी यांचीदेखील उत्तम साथ मिळाली. सुरुवातीला गरजवंतांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे मढवी दाम्पत्याने ठरवले, जेणेकरुन कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही.
शक्य त्या आणि मागेल त्या प्रत्येकाला मदत करण्याचे निश्चित केल्याने मढवी दाम्पत्याच्या सोबतीला त्यांचे सहकारीदेखील तयार झाले. अशाप्रकारे डॉ. राजेश मढवी व प्रतिभा मढवी यांच्यासह ‘ठाणे गौरव प्रतिष्ठान’ व इतरांनी मिळून ‘लॉकडाऊन’ काळात सुमारे तीन हजार कुटुंबांना रेशन किटचे वाटप केले. संपूर्ण नौपाडा प्रभागात डॉ. राजेश मढवी यांनी ही मदत पोहोचवण्याची दक्षता घेतली. मदत केलेल्यांमध्ये बहुतांश हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे, वृत्तपत्र विक्रेते, ठाणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी, फवारणी कर्मचारी आणि मराठीजनांबरोबरच अन्य राज्यातील स्थलांतरित, झोपडपट्टीवासीयांचाही समावेश होता.
रेशन किटचे वाटप करतानाच ज्येष्ठ नागरिकांसाठी फळांचे वाटप करण्याचेही डॉ. राजेश मढवी यांनी ठरवले व त्यानुसार प्रभागातील ६० घरांमध्ये फळांचे वाटप केले. तसेच सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व परिचारिकांनाही फळांचे वाटप केले. हे करतानाच दवाखान्यात, रुग्णालयात, इस्पितळात जीव धोक्यात घालून काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील अशा १५ आरोग्य कर्मचार्यांची सतत दोन महिने भोजनाची व्यवस्था प्रतिभा महिला बचत गटाच्या माध्यमातून केली. वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर राहून कोरोनाशी दोन हात करणार्या ‘कोविड योद्ध्यां’ना स्वतः डॉक्टर असलेल्या व समाजकार्यात झोकून दिलेल्या ‘कोविड योद्धा’ राजेश मढवी यांनी मदत केल्याने, एका ‘कोविड योद्ध्या’च्या मागे दुसरा ‘कोविड योद्धा’ उभा ठाकल्याचे चित्र यातून दिसले.
अन्नधान्य-रेशन किटचे विनामूल्य वितरण करतानाच १५० गृहनिर्माण संस्थांना स्वस्त दरात भाजीवाटपाचे कामही डॉ. राजेश मढवी यांनी केले. ठाणेकरांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी डॉ. राजेश मढवी यांनी स्पोर्टिंग क्लब अध्यक्ष म्हणून पुढाकार घेऊन भाजीविक्रेत्यांसाठी, भाजी मंडईसाठी सेंट्रल मैदानदेखील ठाणे महानगरपालिकेला विनामूल्य दिले. सोबतच वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, पोलिसांना चहा, बिस्कीट व नाश्त्याचे वाटपही त्यांनी केले.
मी १५ वर्षे सरकारी आरोग्य व्यवस्थेमध्ये काम केले. इथेच रुग्ण तपासणीच्या माध्यमातून समाजातील गरीब, वंचित, शोषित आणि रंजल्या-गांजलेल्यांची मला माहिती झाली. त्यांच्या समस्या, अडीअडचणी, मी जाणून घेतल्या. त्यातूनच समाजातल्या शेवटच्या रांगेतील व्यक्तीसाठी आपणही मदतकार्य सेवाकार्य करावे, याची प्रेरणा मला मिळाली व मी समाजकारणात आलो.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी २ हजार, ५०० मास्क आणि बँक कर्मचार्यांना फेसशिल्ड, तर डॉक्टरांसाठी ‘पीपीई किट’चे वाटपही डॉ. राजेश मढवी यांनी केले. मास्कबरोबरच नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहावी, यासाठी प्रतिकारशक्तीवर्धक औषध वाटपाचा उपक्रमही त्यांनी राबविला. त्यानुसार सुमारे दोन हजार कुटुंबांना डॉ. राजेश मढवी यांच्यावतीने ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच कोरोना संशयितांची ओळख पटवण्यासाठी डॉ. राजेश मढवी, प्रतिभा मढवी व ‘ठाणे गौरव प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दोन आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. डॉ. राजेश मढवी यांनी स्वतःदेखील ‘ठाणे रेड क्रॉस सोसायटी’ येथे विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली. तसेच डॉ. राजेश मढवी यांच्यावतीने तब्बल ७७ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व यातल्या रक्तसंकलनाने इतर आजाराच्या रुग्णांनाही रक्त उपलब्ध झाले.
सोबतच आपल्या प्रभागाचा परिसर रोगराईमुक्त, विषाणूमुक्त ठेवण्यासाठी डॉ. राजेश मढवी यांनी जंतुनाशक फवारणीदेखील करवून घेतली. २५ गृहनिर्माण संस्थांना सॅनिटायझर स्टॅण्डचे वाटप केले, तर १७ गृहनिर्माण संस्थांना जंतुनाशक फवारणी मशीनचे वाटप केले. मुरबाड येथील अवनी मूकबधिर शाळेतील विशेष मुलांची काळजी घेत डॉ. राजेश मढवी यांनी थर्मल गन, सॅनिटायझरसह आर्थिक मदतही केली. १५ गृहनिर्माण संस्थांना कचरा टाकण्यासाठी कचरापेट्यांचेही वितरण केले. प्रभागातील नाले, गटारे साफसफाई करुन घेण्यासाठी डॉ. राजेश मढवी यांनी पुढाकार घेतला व अतिवृष्टीमुळे तुंबणारे, साचणारे, नागरी वस्तीत शिरणारे पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था केली.
याव्यतिरिक्त सुमारे १५०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली, ७५० अत्यावश्यक कामासाठी ई-पास काढून देण्याचे काम डॉ. राजेश मढवी यांनी केले. तरुणांना कॅरम बोर्डचे वाटप केले. डॉ. राजेश मढवी यांना आपल्या सेवाकार्यात त्यांच्या सहकार्यांनी मनापासून साथ दिली, त्यात सचिन सकपाळ, राजेंद्र शहा, सुजित भट, रत्नेश मिश्रा, जयप्रकाश मिश्रा, हेमंत सार्डेकर, नितीन लटके, प्रवीण परब, शिल्पा उतेकर, महेश पष्टे यांचा सहभाग उल्लेखनीय. कार्यकर्ते काम करत असताना पक्षपातळीवर वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन अत्यावश्यक असते, तसे ते डॉ. राजेश मढवी यांना मिळाले. भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे आणि आ. संजय केळकर यांनी डॉ. राजेश मढवी यांना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले व सेवाकार्याचा हा यज्ञ सतत सुरु राहिला.
मधुमेहाचे रुग्ण असल्याने डॉ. राजेश मढवी यांच्यासमोर आरोग्यविषयक समस्याही निर्माण झाली होती. मधुमेहामुळे त्यांनादेखील रुग्णालयात भरती व्हावे लागले होते, तसे त्यांनी स्वतःचीदेखील कोरोना चाचणी करुन घेतली. सुदैवाने त्यांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याने व मधुमेहाचा त्रास कमी झाल्याने नंतर त्यांना ‘डिस्चार्ज’ही दिला गेला. मात्र, स्वतःला मधुमेहाचा त्रास असूनही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर डॉ. राजेश मढवी यांनी आपले काम सुरुच ठेवले, त्यात खंड पडून दिला नाही. दरम्यान, पथविक्रेत्यांसाठी ‘पंतप्रधान आत्मसन्मान निधी वितरणा’साठीही डॉ. राजेश मढवी यांनी शिबिराचे आयोजन केले व भविष्यातही या आणि शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विविध दाखले देण्यासाठीही शिबीर आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचेही डॉ. राजेश मढवी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
डॉ. राजेश मढवी यांना मदतकार्य करताना गरजूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यांच्या मनात आपल्यासाठीही कोणीतरी झटत असल्याचा विश्वास निर्माण झाला, तर कोरोना आपत्तीचा काळ कोणीही विसरु शकत नाही, मात्र यात समाजातील माणुसकीचे दर्शन झाले व ही माणुसकी यापुढेही दिसली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.