खर्‍या गरजवंतांचे सेवक

09 Dec 2020 14:13:52

deepali kulkarni _1 

 



कोरोनाकाळात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आल्यानंतर समाजाची आर्थिक स्थिती कमालीची खालावली होती. अनेकांचे रोजगारही बुडाले. मध्यमवर्गीय कुटुंबंही हलाखीच्या परिस्थितीचा सामना करू लागली. हातावर पोट असणार्‍या नागरिकांचे हाल तर अवर्णनीय असेच होते. अशा वेळी अन्नधान्य, लहानग्यांसाठी दूध आदींचे मोठे प्रश्न समाजात निर्माण झाले होते. गरजवंत असलेले अनेक जण समाजात दिसत होते. त्यापैकीच एक म्हणजे नाशिकच्या दीपाली सचिन कुलकर्णी...


दीपाली सचिन कुलकर्णी
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका तथा माजी सभापती,
आरोग्य समितीप्रभाग क्र. : ३०
संपर्क क्र. : ९४२३१७७७०४


खरे गरजवंत आणि गरज असली तरी स्वबळावर आपल्या गरजेची पूर्तता करणारे, असे दोन भाग समाजात दिसून येत होते. त्यामुळे खरे गरजवंत हुडकणे आणि त्यांना मदत करणे, हे एक मोठे आव्हान या काळात समोर उभे ठाकले होते. हे आव्हान ‘कोविड योद्धा’ दीपाली सचिन कुलकर्णी यांनी अगदी लीलया पेलले. अफाट जनसंपर्क आणि मदतीची खरी तळमळ यामुळे हे आव्हान पेलणे शक्य झाल्याचे त्या सांगतात. ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यावर समाजात होणारे बदल यांचे कुलकर्णी यांनी अभ्यासू पद्धतीने निरीक्षण केले. या काळात समाजात नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या मदतीची गरज आहे, हे कुलकर्णी यांनी जाणले.
 

एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष मदतकार्यास सुरुवात केली. याकाळात त्यांनी गहू, तांदूळ, तेल, साखर, मीठ आदी वाणसामानाचे वाटप केले, तसेच गोवर्धन शिवारात असलेल्या दत्तधाम येथून शिजविलेले अन्न प्रसादाच्या रूपाने कुलकर्णी यांना प्राप्त होत होते. त्याचे वाटप कुलकर्णी यांनी केले, तसेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी कुलकर्णी यांनी रोगप्रतिकार शक्ती वृद्धिंगत करणार्‍या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटपदेखील केले. गरजवंतांना मदत करत असताना, कुलकर्णी यांनी सुमारे एक हजारांपेक्षा जास्त कुटुंबांची क्षुधातृप्ती केली. त्यांच्यामार्फत नियमित २०० ते २५० नागरिकांना शिजविलेल्या अन्नाचे वाटप या काळात करण्यात आले.

 

रोजगार बुडाल्याने व हाती कोणताही कामधंदा नसल्याने अनेक नागरिक पायी आपल्या स्वगृही जात होते. त्यांची अवस्था पाहून त्यांना मदत करणारे अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे आपल्या प्रभागातीलच गरजू नागरिकांना मदत करण्याचे धोरण कुलकर्णी यांनी आखले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी आपल्या प्रभागातील अण्णाभाऊ साठेनगर, वडाळा येथील मोठा राजवाडा, मातंगवाडा, वनवासी समजाची पिंगुळबाग सेवावस्ती, प्रभागातील मध्यमवर्गीय नागरिक वास्तव्यास असणारी विविध ठिकाणे आदी ठिकाणी आपले मदतकार्य केले. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते, त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती. अशा वेळी रिक्षाचालक असणार्या नागरिकांनाही त्यांनी सढळ हाताने मदत देऊ केली. त्यामुळे त्यांना त्यांचे जीवनमान व्यतीत करणे सहज शक्य होण्यास हातभार लागला.


 

deepali kulkarni _1  
मदत करत असताना ती खर्‍या गरजवंतांना करणे आवश्यक आहे. यासाठी मदतकर्त्यांनी नगरसेवकांशी संपर्क साधावा. कारण, त्यांना आपल्या प्रभागाची खरी माहिती असते. मानवधर्म जोपासण्याकामी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. सामाजिक जाणिवेचे भान प्रत्येकाने ठेवावयास हवे. मदत करत असताना ती सत्पात्री असावी, याची सजगता कायम बाळगावी.
 
 

 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यामुळे घरकाम करणार्‍या महिलादेखील याकाळात बेरोजगार झाल्या होत्या. त्यांनादेखील मदतीचा हात कुलकर्णी यांनी या काळात देऊ केला. बिगारी काम करणार्‍या नागरिकांचाही मदतीच्या रूपाने कुलकर्णी यांनी जीवन सावरण्याचा आत्मविश्वास जागृत ठेवला. तसेच, मिठाईचे दुकाने बंद असल्याने त्यांना गोदरेज डेअरी फार्ममार्फत पुरविण्यात येणार्या दुधाचे संकलन कुलकर्णी यांनी केले आणि दररोज साधारण ४०० लीटर दुधाचे मोफत वाटप कुलकर्णी यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे लहानग्यांच्या चेहर्‍यावर आपसूकच हसू उमटले. दीपाली कुलकर्णी यांचा हा मदतीचा रथ त्यांचे पती सचिन कुलकर्णी यांच्या साथीने याकाळात भरधाव धावला. यासाठी त्यांना किशोर अडकर, हेरंब सोनटक्के, संदीप भांगरे, सुशील सारंगधर, संदीप कुलकर्णी, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेचे विश्वास ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
 

दीपाली कुलकर्णी यांची मदतीची भावना काही सामाजिक संस्थांनीही जाणली. आपल्याद्वारेही गरजवंताना मदत करता यावी, या उद्देशाने काही सामजिक संस्थाही कुलकर्णी यांच्यासोबत या कार्यात रुजू झाल्या. त्यात प्रगती महिला मंडळ, रुंगठा बिल्डर्स, किशोर अडकर यांची सामाजिक संस्था, शांतुषा बिल्डर्स आदी संस्थांनी मोलाचे सहकार्य केले, तसेच शशी जाधव, कर्नल आनंद देशपांडे आदींनी आर्थिक स्वरूपाचे योगदान देत मदतीस मोठा हातभार लावला. साधारण 30 लाख रुपयांच्या पुढे याकामी निधी खर्चित झाला. समाजात सर्वत्र सारखीच स्थिती, समान दुःख आणि संकट होते. त्यामुळे खरे गरजवंत शोधण्याचे मोठे आव्हान कुलकर्णी यांच्यासमोर या काळात होते. अफाट जनसंपर्क आणि प्रभागाची इत्थंभूत असणारी माहिती या बळावर कुलकर्णी यांनी हे आव्हान पेलले, तसेच मदतकार्य करत असताना सामाजिक अंतर पाळले जाणे महत्त्वाचे होते. या आव्हानाचा सामना कार्यकर्ते व नागरिकांचे प्रबोधन याद्वारे कुलकर्णी यांनी सहज केला.

 
 

कुलकर्णी यांना या मदतकार्यात पोलीसदलाचे मोठे सहकार्य लाभले. विशेषत: इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी सहकार्य करण्याबरोबरच गर्दीचे नियोजन करण्याकामी मोलाचे मार्गदर्शन कुलकर्णी यांना केलेआपल्या मातेच्या या महत्तम कार्यात लालन व छाया या त्यांच्या मुलींनीही मोठी साथ त्यांना दिली. दीपाली कुलकर्णी यांच्या सासू व सासरे यांनी त्यांना मोलाचे पाठबळ या मदतकार्यात दिले, तसेच वाटपाचे जिन्नस खरेदी करण्याकामी पती सचिन कुलकर्णी यांनी केलेले कार्य हे शब्दातीत असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. पक्षपातळीवर आमदार देवयानी फरांदे, भाजप मंडल अध्यक्ष सुनील देसाई, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, महेश हिरे आदींचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन कुलकर्णी यांना लाभले. तसेच या पदाधिकार्‍यांनी जिन्नस उपलब्ध करून देण्यातही मोठा हातभार लावला. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. त्यामुळे भविष्यात मास्कचे वाटप करणे, ‘अ‍ॅन्टिजेन’ टेस्ट करणे, कोरोना रुग्णांना आरोग्यदायी सुविधा पुरविणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आदी स्वरूपाचे कार्य त्या करणार आहेत. सामाजिक संकट इतके मोठे होते की, अन्नासाठी लोक कुलकर्णी यांच्या घरासमोर येऊन बसत. काही नागरिक हे अश्रू गाळत असत. त्यावेळी स्वतःच्याही काही मर्यादा आहेत, हे जाणवत असल्याने कुलकर्णी यांची मोठी भावनिक ओढाताण होत असे. त्यामुळे या काळातील प्रत्येक क्षण आणि प्रसंग हा मन हेलावून टाकणारा असल्याचे कुलकर्णी आवर्जून नमूद करतात. प्रचंड मिळणार्‍या प्रतिसादाबरोबरच नागरिक मायेने कुलकर्णी यांना स्वतःला सांभाळण्याचा प्रेमळ सल्लादेखील देत होते. खरे गरजवंत कोण, याचा अभ्यास करून कुलकर्णी यांनी केलेले मदतकार्य त्यांच्या प्रभागात मैलाचा दगड ठरणारे आहे, हे नक्कीच!

 
 
Powered By Sangraha 9.0