कोरोनापेक्षा त्याची भीती नागरिकांमध्ये पसरण्याचे प्रमाण प्रारंभी काळात जास्त होते. या काळात गरज होती ती नागरिकांना धीर देण्याची आणि लागेल ती मदत करण्याची. म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आपल्या विभागात जनजागृती करत, नागरिकांना धीर देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ‘कोविड’काळातील त्यांनी केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
विनोद विनायक म्हात्रे
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : ११० करावे गाव, (सीवूड, पश्चिम)
संपर्क क्र. : ९८९२२ २९८५५
नवी मुंबईतील करावे गाव हा भाग म्हणावा तसा गावठाण भाग व काही प्रमाणात ‘सिडको साडेबारा टक्के’ योजनेअंतर्गत येणार्या वस्तीचा. मात्र, या भागालाही कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ सुरू झाले, तसतशी या भागातील परिस्थिती आणखी चिंताजनक बनत चालली होती. नागरिकांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला. दळणवळण थांबले होते. विनोद म्हात्रे यांनी, ‘आपला प्रभाग, आपली जबाबदारी’ या मोहिमेतून जनसेवेसाठी थेट ‘ग्राऊंड झिरो’वर उतरण्याचे ठरविले.
अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. नोकर्या गेल्या, पगार थकले, अशा काळात घरात शिजवायचे काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. शिधावाटप केंद्रांवर अन्नधान्य मिळेल की नाही, याची शंका होती. भाजप नेते आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनात अन्नदान मोहीम त्यांनी सुरू केली. धान्यवाटप सुरू केले. चार हजार कुटुंबांपर्यंत धान्याचे किट्स पोहोचविण्यास हातभार लावला. पाच किलो तांदूळ, दोन प्रकारच्या डाळी, तेलसामग्री गरजूंच्या घरोघरी पोहोचविली. याच भागात रिक्षाचालकवर्ग मोठा आहे. ‘लॉकडाऊन’ असल्याने त्यांच्याही पोटाचा प्रश्न उद्भवू लागला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. रिक्षा बंद. त्यात घरचे भाडे थकले होते. बँकेचे हप्तेही लांबवणीवर पडले. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना आधार हवा होता. या आपल्या माणसांसाठी म्हात्रेसाहेब धावून आले. त्यांनी विभागातील सुमारे ६०० रिक्षाचालकांना शिधावाटप केले, मास्क आणि सॅनिटायझर दिले. त्यांच्यासाठी इतर आवश्यक ती व्यवस्थाही करून दिली.विभागातील ‘कोविड योद्धे’ असलेल्या सर्वांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. महापालिकेच्या १०० कामगारांना म्हात्रे यांनी सॅनिटायझर आणि मास्कवाटप केले. ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या एकूण ३,५०० गोळ्यांच्या बाटल्यांचे वाटप केले. पाच हजार मास्कवाटप केले. विभागातील धूरफवारणी याच्यासह ‘क्वारंटाईन’ क्षेत्रात निर्जंतुकीकीकरण करून घेतले. नवी मुंबईचा स्वच्छ शहरांमध्ये देशात तृतीय क्रमांक व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ‘कोविड योद्धे’ सफाई कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. गणेश नाईक यांनी पाठविलेल्या अन्नधान्याचे किट्सही विभागात वितरीत करण्यात आले. एकूण दहा लाखांचा निधी या सत्कार्यासाठी लागला. ‘लॉकडाऊन’ची सुरुवात झाली, तेव्हा अंगावर काटा आणणारे अनेक अनुभव म्हात्रेसाहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवले. कोणाच्या घरात दोन-तीन दिवस चूलच पेटली नव्हती.
"आई कै. सौ. विजयाताई विनायक म्हात्रे या, नवी मुंबईच्या पहिल्या आगरी महापौर व वडील विनायक वामन म्हात्रे हे पहिले आगरी परिवहन सभापती. तेव्हा, माझ्या आईवडिलांच्या संस्कारांमुळेच मी आजवर इथे पोहोचू शकलो. समाजकार्य करण्याची प्रेरणाही मला त्यांनीच दिली. याशिवाय राजकीय प्रवासात लोकनेते माजी मंत्री गणेशजी नाईक साहेब आणि अन्य पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने समाजकार्य करण्याचे बळ मिळाले. भविष्यातही मदतीचा ओघ असाच सुरू राहील, त्यात खंड पडू देणार नाही."
कुणी उपाशीच आहे, तर कुणाची परिस्थिती एकदमच अत्यवस्थ. रुग्णांच्या बाबतीतही काही वेगळे अनुभव नव्हते. कोरोना रुग्ण एकदम खचून जात होते. त्यांच्या कुटुंबीयांचीही तशीच अवस्था होती. कुटुंबीयांना दूर लोटण्याचे प्रकार प्रभागात घडत होते. माणूस समोर रडत असला तरीही ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि कोरोनाच्या भीतीने त्याला धीर देण्यासाठी जवळही घेता येत नव्हते. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याची लगबग, त्यांची बिले कमी करण्याची मदत आदी कामे सुरूच असतात. या सगळ्यात समाजकार्यात असल्याच्या गोष्टींनी बरेच काही शिकवले होते. कार्यकर्तेही नव्या अनुभवांतून धडे घेत होते, शिकत होते. विनोद म्हात्रे यांना, या कार्यात त्यांच्या पत्नी रेखा म्हात्रे, सहकारी जयवंत तांडेल, अमित मढवी, नीलम मढवी, वंदना तांडेल, पुण्यनाथ तांडेल, प्रशांत तांडेल, प्रसन्न कडू, प्रवीण पाटील, मनोहर पाटील, मच्छींद्र तांडेल, वीरसेन कडू, गुरुनाथ तांडेल, समीर पाटील, जयपाल भोईर, प्रशांत चंद्रकांत तांडेल, भानुदास म्हात्रे, प्रसाद तांडेल, जयप्रकाश तांडेल, प्रवीण तांडेल, चंद्रकांत गिरी, विनायक गिरी, अजित भोईर, श्याम तांडेल, संदेश म्हात्रे, राजन म्हात्रे आणि प्रकाश मढवी आदींचे सहकार्य लाभले. यापैकी अजित भोईर यांनी कोरोनाशी झुंज देऊन पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. म्हात्रे यांना स्वतः क्वारंटाईन व्हावे लागले होते. विशेष म्हणजे, ‘क्वारंटाईन’ झाल्यानंतरही दैनंदिन कामाचा व्याप कमी झाला नव्हता, वडील आजारी असतानाही त्यांनी मदतकार्य सुरूच ठेवले होते. आजाराला हरवून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले होते. म्हात्रे यांचे वडील विनायक म्हात्रे यांनी कोरोनाला हरवून पुन्हा एकदा आपल्या कुटुंबीयांना मदतकार्यावर जाण्यासाठी आशीर्वाद दिले. कुटुंबासाठी हा काळ फारच कसोटीचा ठरला होता. मात्र, या परीक्षेतही म्हात्रे उत्तीर्ण झाले.
‘सोशल डिस्टन्सिंग’च्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकांशी ऑनलाईन संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला. ज्यावेळी कोरोनाबद्दल जागृती करण्याची गरज होती, तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने डिजिटल संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या शंकांचे निरसन केले होते. या कार्यक्रमात एकूण आठ हजार जणांनी आपला सहभाग नोंदविला होता. डॉक्टरांच्या या मार्गदर्शनाचा सगळ्यांनाच फायदा झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श लोकांसमोर उभा राहिला. नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने नागरिकांना सुविधा पोहोचविण्याचे काम तर सुरूच होते. ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून योग्य मदत पोहोचते आहे की नाही, याकडेही त्यांचे विशेष लक्ष होते. विशेषतः पालिकेच्या सर्वेक्षणात त्यांनी मोठी भूमिका निभावली होती. आपल्या विभागातील ह.भ.प. गोसावी कृष्णा तांडेल विद्यालयात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा म्हात्रे यांनी केला. यात १५० चाचण्या दिवसाला केल्या जात आहेत. ‘कोविड उपचार केंद्रा’त लवकरात लवकर रुग्णाला सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. १६ हजार लोकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेलाही हातभार लावला. मदत करत असताना एक महत्त्वाचे सामाजिक भान म्हात्रे यांनी जपले होते. ते म्हणजे, अन्नधान्य वाटप करत असताना कुणाचाही फोटो काढायचा नाही, असा नियम कार्यकर्त्यांना घालून दिला होता. त्यांच्या या कार्याला सलाम!