कोरोनासारख्या महामारीच्या काळात कोविड योद्ध्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाताना आपला फारसा विचार केला नाही. अशीच महामारीच्या काळात मदत करत असतानाच, त्यांना ‘कोविड’ची लागण झाली. मात्र, ४९ वर्षांचे ‘कोविड योद्धा’ असलेले गणेश गंगाराम म्हात्रे यांनी कोरोनालाही हरवले आणि त्यांच्या विभागातील नागरिकांसह संकटांनाही तोंड दिले. दुहेरी संकटावर धैर्याने मात करणाऱ्या जनसामान्यांच्या म्हात्रे साहेबांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...
गणेश गंगाराम म्हात्रे
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : १११, नेरुळ नोड- १५
संपर्क क्र. : ९३२४८ ८३९१७
नेरुळ हा तसा नवी मुंबईतील महत्त्वाचा भाग. लोकवस्तीही तितकीच आणि दैनंदिन कार्यालयासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची कायमच वर्दळ... कोरोना महामारीने या भागातही हातपाय पसरले. कोरोना रुग्ण एक-एक करून आढळू लागले होते. आता पुढे काय होणार, हा इतरांप्रमाणे या भागातील नागरिकांसमोरही तोच प्रश्न होता. या वेळी नगरसेवक या पदाची जबाबदारी ओळखून गणेश म्हात्रे यांनी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका पार पाडली.
मास स्क्रीनिंग, कोरोना चाचणी, तपासणी शिबिरे, कम्युनिटी किचन, अन्नधान्य वाटप, मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचा मुद्दा असो, वा अन्य नागरिकांचे रोजच्या आयुष्यातील प्रश्न, सर्व समाज हेच आपले कुटुंब आणि हीच आपली जबाबदारी मानत, त्यांनी सर्वतोपरी मदत उभी केली. कार्यकर्ते, सहकारी यांची फौज उभी करून अहोरात्र जनतेसाठी ते राबले. या सगळ्या गोष्टी सुरू असताना, म्हात्रे यांनाही कोरोनाची लागण झाली. वयाच्या ४९व्या वर्षी महामारीशी झुंज देणे तसे धाडसाचे आणि धीराचे काम होते. फोर्टिस रुग्णालयात २१ जुलै रोजी ते दाखल झाले. नऊ दिवस कोरोनाशी त्यांनी लढा दिला. अशक्तपणा जाणवत होता, अस्वस्थही वाटत होते. महामारीच्या संकटाची ही भीती एवढी मोठी की, भलेभल्यांचा धीर खचतो. पण, म्हात्रे यांची पुण्याई फळाला आली. गोरगरीब जनतेचे, मायमाउलींचे, बंधू-भगिनींचे आशीर्वाद कामी आले आणि २९ जुलै रोजी ते कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले. आपले साहेब रुग्णालयात म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या आणि घरच्यांच्याही जीवाला घोर होताच. मात्र, म्हात्रे यांनी साऱ्यांना निश्चिंत राहण्यास सांगत रुग्णालयातूनच थेट आपला कारभार हाकण्यास सुरुवात केली. कुणाला बेड मिळवून देणे, अन्नधान्यवाटप करणे, या गोष्टींचे सर्व निर्देश म्हात्रे यांनी रुग्णालयाच्या बेडवर बसून आपल्या सहकाऱ्यांना दिले.
"कोरोना काही देशावर आलेले पहिले संकट नाही, आपल्या समाजावर आणखी अशी अनेक संकटे येतील. समाजकार्यात अशी संकटे येत असतात, त्या सर्व संकटांना धैर्याने त्या सर्वाला सामोरे जाण्याची जिद्द आणि प्रेरणा मला माझे वडील सुप्रसिद्ध नाट्य कलाकार गायक, आदर्श शिक्षक स्व. गंगाराम बा. म्हात्रे आणि आई बेबीबाई म्हात्रे यांच्याकडून मिळाली."
नोड १५ गावांत तर कोरोना महामारी म्हणजे काय, हेच लोकांना माहिती नव्हते. त्यावेळी आयुष मंत्रालयातील काही डॉक्टरांच्या माध्यमातून एक हजार ‘आर्सेनिक अल्बम- ३०’च्या गोळ्यांचे वाटप म्हात्रे यांनी मार्चच्या सुरुवातीलाच केले होते. लोकांना त्या गोळ्या कसल्या आहेत, याबद्दलही फारशी कल्पना नव्हती. मात्र, जेव्हा जागरूकता वाढू लागली, त्यावेळी अनेकांनी आपणहून त्या गोळ्यांची मागणी केली. त्यानंतर स्वखर्चातून आणखी अडीच हजार गोळ्यांचे वाटप म्हात्रे यांनी करत लोकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत केली. ‘लॉकडाऊन’ सुरू झाला होता. हातावर पोट असणाऱ्या अनेकांची कामे गेली होती. त्यांना रोजच्या जेवणाचा प्रश्न भेडसावत होता. त्यानुसार म्हात्रे यांनी अन्नधान्य किट्स वाटप केले. दीड हजार कुटुंबांपर्यंत शिधा पोहोचविण्यात त्यांना यश आले. कुणी उपाशी राहणार नाही, याची जबाबदारी गणेश म्हात्रे, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी उचलली होती. याच काळात त्यांनी आदिवासी पाडा असलेल्या बेहरंग गावातील २५० कुटुंबांना अन्नधान्य, मास्क आणि सॅनिटायझर पुरवले. ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज ५०० कुटुंबांना सलग आठ दिवस दोन वेळा जेवण उपलब्ध करून दिले होते.
जिथे ज्या-ज्या स्वरूपाची मदत भासेल, तिथे ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हात्रे यांनी सुरूच ठेवल्या होत्या. रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले होते. अनेकांच्या मनात भीतीचेही वातावरण होते. जनजागृती करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. तेही काम म्हात्रे यांनी आपल्या परीने पूर्ण केले. विभागातील १२५ सोसायट्यांना सॅनिटायझर स्टॅण्ड मोफत दिले. यासोबतच सॅनिटायझर कॅनचेही वाटप केले. ज्या सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरणाची आवश्यकता होती, त्यानुसार ही मोहीमही पूर्ण केली. पालिकेप्रमाणे फवारणीसाठी अद्ययावत यंत्रणा तयार केली. एक टेम्पो, निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या रसायनाचा १०० लीटरचा टँक आणि मोटार आदी साहित्य विकत घेऊन फवारणी पथक स्वखर्चातून नेमले. सिडको सोसायट्या आणि खासगी संकुलांमध्ये जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत निर्जंतुकीकरण सुरूच ठेवण्यात येणार आहे.
या सर्व सोसायट्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात अडीच हजार मास्क वाटप करण्यात आले. सोबतच छोट्या सॅनिटायझरच्या बाटल्याही वाटण्यात आल्या. कोरोना रुग्णाचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची गरज म्हात्रे यांनी लक्षात घेतली. सर्व सोसायट्या आणि परिसरामध्ये मास स्क्रीनिंग करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. शिबिरे घेतली. कोरोना रुग्ण आढळल्यावर त्यांची तातडीने रुग्णालायत व्यवस्था केली. ज्यांना रुग्णालयाची बिले शक्य नव्हती, त्यांची बिले कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःच्या माध्यमातून केला.
विभागात ‘कोविड सेंटर’ सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यादृष्टीने सेक्टर ५० नवी मुंबई सीबीएससी हायस्कूल या शाळेत हे केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व मदतकार्यासाठी अंदाजित सात लाखांपर्यंत निधी खर्च झाला. ‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांचे हाल झाले. घराची भाडी थकली होती, खायला अन्नाचा कण नव्हता, अनेक सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मंडळींचाही हाच प्रश्न होता, जिथे-जिथे शक्य होईल तिथे म्हात्रे यांनी आपल्या मदतीचा ओघ सुरू ठेवला.
या सर्व मदतकार्यात त्यांना भाजप आमदार व ज्येष्ठ नेते गणेश नाईक, नेते संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक या संपूर्ण नाईक कुटुंबीयांचे पाठबळ लाभले. ज्या-ज्या वेळी मदतीसाठी गरज भासली. म्हात्रे यांच्या मागणीनुसार सर्वतोपरी मदत वरिष्ठांकडे मिळत गेली.
मदतीसाठी सहकारी आणि कार्यकर्त्यांची फौज त्यांनी तयार ठेवली होती. यात सचिन शिंदे, बाबासाहेब पार्टे, संजय यादव, गोरख खांडेकर, आबा कांबळे, अनिल सोरटे, अच्युत तांडेल, शुभम देवरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वतःची ‘सेक्टर ४४ ए वेलफेअर्स असोसिएशन’ ही संस्थाही त्यांना या कार्यात मदत करत होती. डॉ. कविता बोर्डे व डॉ. प्रवीण कटके यांनीही त्यांच्या अनुभवाद्वारे या मदतकार्यात मोलाचा वाटा उचलला. या सर्व कार्यात कुटुंबही पाठीशी भक्कमपणे उभे होते. पत्नी संतोषी म्हात्रे, बंधू योगेश म्हात्रे, मुले पीयूष आणि पृथ्वीश, सून भावना यांनीही म्हात्रे यांना पाठबळ दिले. त्यांच्या या समाजकार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.