कोरोनाच्या कठीण प्रसंगात कुटुंबप्रमुखाची भूमिका घेत, आपल्या ऐरोली व कोपरखैरणे प्रभाग क्र. ४४ व ५२ मधील नागरिकांच्या पाठीशी अॅड. भारती रविकांत पाटील खंबीरपणे उभ्या राहिल्या. भारतीय जनता पक्ष व ‘शिवाजीराव अण्णासाहेब पाटील महिला सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या अॅड. भारती रविकांत पाटील यांच्या कोरोनाकाळातील कार्याचा आढावा घेणारा लेख...
अॅड. भारती रविकांत पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेविका
प्रभाग क्र. : ४४/५२,
कोपरखैरणे विभाग
संपर्क क्र. : ७०३९६ २०५०३
देशावर कोरोनाचे संकट आले आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशातच ‘लॉकडाऊन’ झाल्याने रोजच्या जगण्यासाठीचे व मोठ्या प्रमाणात आर्थिक आव्हानं नागरिकांसमोर उभी राहिली. अशावेळी कुटुंबप्रमुखाप्रमाणे माजी नगरसेविका अॅड. भारती पाटील व माजी नगरसेवक रविकांत पाटील हे दाम्पत्य आपल्या प्रभागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सुरुवातीला कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दिशेने व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पाटील यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. नवी मुंबई महानगरपालिका व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. प्रभागातील नागरिकांना मास्कचा तुडवडा भासत होता. अशावेळी मास्क उपलब्ध करून दिले. सुरुवातील रुग्ण मिळाला की, त्या भागात पालिकेच्या माध्यमांतून फवारणी होत होती. परंतु, कालांतराने रुग्णसंख्या वाढू लागली, अशावेळी पालिकेची वाट न पाहता पाटील दाम्पत्याने स्वतः फवारणी मशीन विकत घेऊन कार्यकर्त्यांच्या सोबतीने प्रत्येक इमारती व वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली.
सर्व नागरिकांना, गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप पाटील यांनी केले. सुरुवातीला एपीएमसी मार्केट बंद झाल्यामुळे नागरिकांना भाजीपाला मिळविण्यात अडचणी येऊ लागल्या. मग अशांना भाजीपाला व अन्नधान्याचे वाटप करण्यास पाटील यांनी सुरुवात केली. यामध्ये साखर, डाळ, तेल, तांदूळ, मीठ यांसह भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा याचा समावेश होता. घरोघरी जाऊन अन्नधान्याचे किटवाटप केले. काही ठिकाणी शिजवलेले अन्नवाटपही केले. विशेषतः पाटील यांच्या प्रभागात सर्वाधिक रिक्षाचालक कुटुंबं आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता. तसेच अनेक महिला घरगुती काम करून घर चालवत होत्या, त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले. मोठ्या संख्येने माथाडी कामगारांची कुटुंबेदेखील पाटील यांच्या प्रभागात वास्तव्यास आहेत. प्रभागातील अशा प्रत्येक घरात ही मदत पोहोचेल, याची दक्षता भारती पाटील व रविकांत पाटील तसेच सहकाऱ्यांनी घेतली.
त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात अॅन्टिजेन चाचण्या सुरू झाल्या. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत बरेच गैरसमज होते. ते गैरसमज दूर करून प्रभाग ४४ व प्रभाग ५२ मध्ये अॅन्टिजेन चाचण्यांचे कॅम्पदेखील पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने उभारले. हे करत असतानाच, रुग्णांची गैरसोय होऊ नये, पालिका रुग्णालयात व खासगी रुग्णालयांत रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध व्हावे, विशेषतः आयसीयू बेड मिळावे, यासाठी भारती पाटील व रविकांत पाटील हे सातत्याने नागरिकांच्या व रुग्णालयांच्या संपर्कात होते. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान आता सुरू झाले. मात्र, यापूर्वीच घरोघरी फिरून महिला कार्यकर्त्यांच्या तसेच युवकवर्गाच्या सोबतीने भारती पाटील व रविकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वतः पीपीई किट घालून नागरिकांची माहिती घेतली. थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन लेव्हल तपासणी करून नागरिकांमध्ये कोरोनाच्या लक्षणांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम पाटील यांनी केले.
"महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, तसेच महिलांना व्यवसाय, उद्योगांसाठी प्रोत्साहन देत महिलांनी स्वावलंबी बनावे, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करते. वकिली पेशा सांभाळत माथाडी संघटनेची कायदेशीर सल्लागार, ही जबाबदारी पार पाडत असताना, सामाजिक कामाची आवड असल्याने मी अविरत हे काम करते आहे."
हे सर्व कार्य करताना सरकारी यंत्रणांचेही सर्वतोपरी सहकार्य पाटील यांना लाभले. पोलीस यंत्रणादेखील या कार्यात पाटील यांना सहकार्य करत होती. पक्षपातळीवरदेखील वरिष्ठांकडून पाटील यांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत मिळत होती. आ. गणेश नाईक, नेते संदीप नाईक यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी मिळत होते. रुग्णांना अनेक वेळा आयसीयू बेड मिळविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, नाईकसाहेबांनी तत्काळ रुग्णालयांशी संपर्क केले व माहिती मिळवून दिली. संपूर्ण मदतकार्यात तरुणाईचा मोठा सहभाग पाटील यांना लाभला. सर्वश्री राम, भाऊ खोपडे, मारुती सपकाळ, सोमनाथ पागगुडे, अभिमान कोळेकर, बाबाजी गाढवे, अजय ठुबे, साधू धोंडे, गोरक्षनाथ साळुंखे, भगवान खोपडे, लक्ष्मण पानसरे, सुरेश दिघे, नंदकुमार माने, अविनाश वासुदेवन, प्रताप महाडिक, सतीश खोपडे, अरुण भोसले, सतीश गोरे, भल्ला साहेब, सुनील साळुंखे, यशवंत निकम, बाळासाहेब गुजर, सुलतान भाई, संजय सावंत, यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही पाटील दाम्पत्याच्या कार्याने प्रभावित होऊन या मदतकार्यात मोलाचे सहकार्य पाटील यांना केले. याचबरोबर सर्वश्री सुळके, आकाश पवार, सुनील डोके, विजय कदम, शुभम खोपडे, विनोद निकम, सोपान बैलकर, शरद कंक, धीरज शिंदे, विक्रम देशमुख, विपुल खराडे, संदीप अस्कट, समीर शेख, सूरज बर्गे, धनेश पाटील, संदेश भाबड जैन यांसारखे अनेक तरुण कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या मदतकार्यात पाटील यांच्याबरोबर होते.
साडेतीन ते चार हजार घरांपर्यंत पाटील यांनी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप केले. हे केवळ शक्य झाले ते या उत्साही कार्यकर्त्यांमुळेच हे पाटील आवर्जून सांगतात. रूपाली पवार, शुभांगी साळुंखे, मनीषा भोर, क्षीरसागर ताई, संध्या पिंगळे, शशिकला केंजळे यांसारख्या अनेक महिला कार्यकर्त्यादेखील पाटील यांच्यासमवेत मदतकार्यात उतरल्या होत्या. एकीकडे कोरोनाचा लढा सुरू होता, तर दुसरीकडे प्रभागातील इतर प्रश्न सोडविण्यावरही भारती पाटील यांनी भर दिला. ‘शिवाजीराव अण्णासाहेब पाटील महिला सामाजिक संस्थे’तील महिला कार्यकर्त्याही धडाडीने या मदतकार्यात पाटील यांच्या सोबतीने उतरल्या होत्या. या सर्व महिलांच्या सहकार्याने पाटील यांनी प्रभागातील महिलांचे समुपदेशन केले. अशा वातावरणातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे कार्य पाटील दाम्पत्याने केले.
कोरोनाच्या या लढाईत प्रत्यक्ष उतरत मदतकार्य करत असताना पाटील दाम्पत्यालादेखील कोरोनाची लागण झाली. मात्र, त्यांनी यावर यशस्वी मात केली व पुन्हा समाजकार्यात रुजू झाले. प्रभागातील नागरिकांनीही पाटील दाम्पत्याची घरातील नागरिकांप्रमाणे काळजी घेतली, भरभरून प्रेम दिले. प्रभागातील एक आजीबाई, ज्यांचे कुटुंबीय ‘लॉकडाऊन’मुळे बाहेरगावी अडकले व आजी इकडे एकट्या होत्या, या आजींची भारती पाटील यांनी आईप्रमाणे काळजी घेतली. या काळात नागरिकांना समोर येणाऱ्या अडचणी व अनेक प्रसंग पाटील यांचे मन हेलावणारे होते. मात्र, या सर्व प्रसंगांत पाटील दाम्पत्य प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते व आजही आहेत. “या काळात नागरिकांना केवळ आर्थिक नाही, तर माणुसकीच्या नात्याची व सहानुभूतीच्या शब्दांची आवश्यकता आहे. ही वेळ कोणावरही येऊ शकते म्हणून माणुसकीच्या नात्याने संकटात असणाऱ्या प्रत्येकाला जमेल ती मदत अवश्य करावी,” असे आवाहन अॅड. भारती रविकांत पाटील यांनी केले.