संस्कृत उत्थानातील डॉ. आंबेडकरांचे योगदान!

05 Dec 2020 22:18:46

Sanskrit_1  H x
 
 
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचे आपण नेहमीच स्मरण करतो. पण, एक संस्कृतची विद्यार्थिनी म्हणून मला बाबासाहेबांचे संस्कृतप्रेम हे काहीसे दुर्लक्षितच राहिले आहे, असे वाटते. त्यांनी संस्कृत भाषेसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या संस्कृत कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
संस्कृत... ‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।‘ असा संस्कृत भाषेचा लौकिक आहे. हा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मान्यता पावलेला आहे. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ सर विल्यम जोन्स यांनी २४० वर्षांपूर्वी कोलकात्यामध्ये एक युगप्रवर्तक भाषण केले. या भाषणात त्यांनी म्हटले की, “संस्कृत भाषेची प्राचीनता काय असायची असेल ती असो, तिची घटना आश्चर्यकारक आहे. ग्रीक भाषेहून बांधेसुद, लॅटिनहून समृद्ध आणि या दोहोंहून प्रौढ व परिष़्कृत... तरीही क्रियापदांचे धातू आणि व्याकरणाची रूपे पाहताना योगायोगाने संभवणार नाही इतकी संस्कृत भाषेशी जवळीक दिसते. ही इतकी दृढ आहे की, या तीनही भाषांचे परीक्षण करताना भाषाशास्त्रज्ञांना या भाषा कोणत्यातरी एकाच भाषा कुलातून आल्या आहेत, असे मानण्यावाचून गत्यंतरच राहत नाही.”
 
 
संस्कृत भाषेची महानता वेगळी सांगायला नको. परंतु, काहीसा दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संस्कृत भाषा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारले की, आपल्याला आठवते ते त्यांनी सामाजिक, राजकीय कार्य आणि परोमच्च बिंदू म्हणजे भारताची राज्यघटनेची केलेली निर्मिती. त्यांच्या या कामाबरोबरच डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी फारसा प्रकाशात न आलेला एक भाग व तो म्हणजे त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम आणि आस्था. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संस्कृतचे अभ्यासक होते व त्यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, म्हणून प्रयत्नदेखील केलेले होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. संस्कृत भाषा ही आपली राष्ट्रभाषा असावी यासाठी श्रीप्रकाश, डॉ. सी. व्ही. रमण, डॉ. बाळकृष्ण केसरकर, कृष्णमाचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अनुच्छेद ३१०’ (पुनर्मांडणीनुसार ‘अनुच्छेद ३४३’) यामध्ये एक संघराज्याची शासकीय भाषा संस्कृत असावी, अशी मागणी केलेली होती. संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांना प्रेम होते, हे त्यांच्या साहित्यावरून आणि संविधान सभेतल्या भाषणांवरून दिसतेच. थोर विचारवंत दत्तोपंत ठेंगडींच्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब’ या ग्रंथामधील परिशिष्टामध्ये त्यांनी बाबासाहेबांचे संस्कृतचे ज्ञान व तत्कालीन संदर्भ दिलेले आहेत.
 
 
संस्कृत भाषेकडे बघण्याचा बऱ्याच जणांचा दृष्टिकोन वेगळा असतो. संस्कृत ही कठीण भाषा आहे किंवा काही समाजापुरतीच ती मर्यादित आहे, त्याच्यापलीकडे जाऊन संस्कृत शिकून काय मिळणार, अशी (नकारात्मक) दृष्टी आपल्याला दिसते. पण, संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, या प्रस्तावास पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती जर पाहिल्या तर हे सर्व(गैर) समज दूर होतील. उलट नझिरुद्दीन यांच्यासह तत्कालीन परराष्ट्रमंत्री डॉ. बी. व्ही. केसकर, टी. टी. कृष्णम्माचारी (मद्रास), जी. एस. गुहा (त्रिपुरा-मणिपूर आणि खासी राज्य), सी. एम. पूनाचा (कूडग), व्ही. रामैया (पुदुकोट्टै), व्ही. आय. मुनिस्वामी पिल्लै (मद्रास), कल्लूर सुब्बा राव (मद्रास), व्ही. सी. केशव राव (मद्रास), डी. गोविंद दास (मद्रास), पी. सुब्बारायन (मद्रास), डॉ. व्ही. सुब्रमण्यम (मद्रास) आणि दाक्षायनी वेलायुधन (मद्रास) यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. ही सगळी नावे पाहिली, तर ती मुख्यतः हिंदीभाषक नसलेल्या राज्यांतील आणि आजच्या तामिळनाडूतील आहेत. आजही हिंदी ही राष्ट्रभाषा मानावी का, याबाबत वाद आहे. पण, हा वाद संस्कृत विषयी नाही. तेलुगू, कन्नड, तामिळ व मल्याळम या द्रविडी भाषा बोलणाऱ्यांचा हिंदीला विरोध असतो, पण संस्कृतला नाही. संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, हा प्रस्ताव त्या वेळीच हा प्रस्ताव मंजूर झाला असता, तर संस्कृतमधील ज्ञानाचे भांडार देशाला खुले तर झाले असतेच, पण भाषेच्या नावावर पुढे उसळलेला आगडोंबही रोखता आला असता. दुर्दैवाने तत्कालीन राजकारणात संस्कृतचा पराभव झाला. वास्तविक बाबासाहेब विद्यार्थी असताना त्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा होती. मात्र, अस्पृश्य जातीतील असल्याचे कारण सांगून त्यांना संस्कृत शिकविण्यास शिक्षकांनी नकार दिला होता. या संदर्भात आचार्य अत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदा म्हटले आहे, “मला संस्कृत शिकण्याची इच्छा होती; पण शिक्षकांनी नकार दिल्यामुळे मला फारशी (पर्शियन) शिकावी लागली.” पुढे जर्मनीला बॉन विद्यापीठात गेल्यानंतर त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले.
 
 
अशा स्थितीत बाबासाहेब संस्कृतचा आग्रह का धरत होते, हे पाहणे महत्त्वाचे आगे. भारताला भाषिक अस्मितेच्या लढायांपासून मुक्त करणे, हा त्यांचा उद्देश होता. ‘भाषा आधारित राज्यांमुळे नवीन राष्ट्रीयता निर्माण होण्याचा धोका आहे,’ असा सावधानतेचा इशारा त्यांनी ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ या ग्रंथात दिलेला होता. तसेच, संस्कृतसारखी प्राचीन भाषा ही ज्ञानाचे समृद्ध भांडार आहे, हेही त्यांना माहीत होते. हिंदूंप्रमाणेच बौद्ध आणि जैन धर्मातील बहुतांश प्राचीन ज्ञान हे संस्कृतमध्येच आहे. आर्य आणि अनार्य, उच्च जाती व कनिष्ठ जाती या संबंधातील युरोपिय विद्वानांच्या प्रतिपादनाचा खरेपणा शोधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकायचे होते. त्याप्रमाणे ते संस्कृत शिकले आणि हा सिद्धांत त्यांनी नाकारला. डॉ. आंबेडकर यांच्यासारख्यांनी राष्ट्रभाषेच्या या प्रस्तावाचे समर्थन केले. तेव्हा त्यामागे आणखी एक तर्क होता. तो म्हणजे, अनेक भाषा असलेल्या देशात एकच एक भाषा संपूर्ण देशाची भाषा व्हायची असेल, तर ती नि:पक्ष असणे आवश्यक आहे. देशातील राज्यांची स्थापनाही भाषेच्या आधारावर झालेली. म्हणजेच प्रत्येक प्रांताची आपली एक मातृभाषा असणार. याचाच अर्थ असा की, कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा झाली, तर ती मातृभाषा असलेल्या नागरिकांना स्वाभाविक फायदा होणार आणि दुसऱ्या भाषिकांना त्रास. हिंदीच्या बाबतीत नेमके हेच घडले. या परिस्थितीत संस्कृत ही एकमेव अशी भाषा होती की, तिला स्वतःचा कोणताही प्रादेशिक प्रांत नव्हता. ती कोणाचीही मातृभाषा नव्हती आणि सर्वांसाठी सारखीच होती. संस्कृत ही केवळ एका समाजाची भाषा मानण्यात आली, तरी ती त्यांच्यासाठी धार्मिक कार्यापुरतीच मर्यादित होती, व्यवहारात तिचा वापर नव्हताच. शिवाय पुरोहित वर्गापुरताच या भाषेचा प्रसार होता. १०० टक्के ब्राह्मण संस्कृत जाणणारे तेव्हाही नव्हते आणि आता तर नाहीतच. म्हणूनच बाबासाहेबांनी संस्कृतला मनःपूर्वक पाठिंबा दिला होता. इतकेच नाही, तर ‘ऑल इंडिया अनुसूचित जाती फेडरेशन’च्या कार्यकारिणीने या संबंधात प्रस्ताव मंजूर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. संस्कृतच्या उत्थानाचा डॉ. बाबासाहेबांनी आटोकाट प्रयत्न केला.
 
 
डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना वेगवेगळे ग्रंथ अभ्यासले होते. त्या ग्रंथांचा सखोल अभ्यास करुन नवीन कायदे करुन राज्यघटनेत स्त्रिया व दलितांच्या हक्कांचा समावेश केला. यासाठी त्यांनी ‘भारद्वाज’, ‘याज्ञवल्क्य’ आदी स्मृतिग्रंथाचाही अभ्यास केला. बाबासाहेबांची जी प्रतिमा त्यांच्या समर्थकांनी व विरोधकांनी उभी केली होती वा आहे, त्यात त्यांचे हे संस्कृतप्रेम बसत नव्हते. म्हणूनच त्यांनी ही राष्ट्रभाषा व्हावी, या ठरावाला पाठिंबा दिला, तेव्हा ‘पीटीआय’च्या प्रतिनिधीने त्यांना ‘हे खरे आहे का’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर ‘का नाही, संस्कृतमध्ये काय दोष आहेत,’ असा प्रतिप्रश्न केला. आज देशात असणाऱ्या अनेक अनुत्तरित प्रश्नांप्रमाणे संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी, हा प्रश्न अनुत्तरित आहे, दुर्लक्षित आहे. संस्कृत या सर्वांना एकसंध ठेवणाऱ्या भाषेला राष्ट्रभाषा केले असते, तर महाराष्ट्र-कर्नाटक भाषिक वाद, दक्षिण भारतातील भाषिक वाद संभवला नसता. लेखक व प्राध्यापक प्र. शं. जोशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर संस्कृत श्लोकांच्या स्वरुपात ‘भीमायनम’ हे चरित्रकाव्य लिहिले आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील या प्रा. जोशी यांनी वयाच्या ८४व्या वर्षी हे चरित्र लिहिले. डॉ. आंबेडकर यांना संस्कृत भाषेविषयी किती आदर होता आणि संस्कृत भारताची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी डॉ. आंबेडकर यांनी कसे प्रयत्न केले, ते यात वाचायला मिळते. या ग्रंथातील डॉ. आंबेडकरांच्या संस्कृत ज्ञानाची माहिती देणारे श्लोक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता दहावीच्या संस्कृत (संपूर्ण) या पाठ्यपुस्तकात देण्यात आले होते. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यास एका दिवसाची आवश्यकता नाही. त्यांचे कार्य हे नित्यस्मरणीय आहे. हे स्मरण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काहीसे दुर्लक्षित राहिलेले संस्कृतप्रेम आपण जाणून घेऊया. भाषांमध्ये मुख्य असणारी, मधुरा, सर्व ज्ञान सामावून घेतलेली अशी संस्कृत भाषा ही डॉ. आंबेडकरांची प्रियतम भाषा होती. त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना त्यांचे संस्कृत भाषा राष्ट्रभाषा करण्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करायचा निर्धार आपण करायला हवा. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साधला संस्कृतमध्ये संवाद...
पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी या विचाराला पाठिंबा दिला. पं. मैत्र यांना डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पं. मैत्र यांनी आपल्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या आणि डॉ. आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच पं. मैत्र यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कृत अभ्यासाचे मिळणारे संदर्भ
‘हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या १२ सप्टेंबर, १९४९ रोजीच्या अंकात डॉ, बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये संस्कृतमध्ये संवाद साधत असत, याचा संदर्भ मिळतो. दि. स्टेट्समन, दि. ११ सप्टेंबर, १९४९ या वृत्तपत्रामध्येही डॉ.आंबेडकर यांच्या संस्कृत ठरावाचा संदर्भ आहे. दै. ‘आज’ (हिंदी), १५ सप्टेंबर, १९४९ दि. लीडर (इंग्रजी) अलाहाबाद, १३ सप्टेंबर, १९४९ दि. ‘हिंदू’,११ सप्टेंबर, १९४९
 
- वसुमती करंदीकर
 
 
Powered By Sangraha 9.0