नवीन वर्षा, तुझी कहाणी

31 Dec 2020 22:05:51
new 2020 _2  H
 
 
 
 
जगभर आज दि. १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होत आहे. या कालगणनेत दिवसाची सुरुवात मध्यरात्री होत असल्याने, नवीन वर्षाचे स्वागतही सहजच मध्यरात्री केले जाते. जगभर आतशबाजीने जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत होते. नवीन वर्ष १ जानेवारीला का सुरू होते? आता येणारे वर्ष ‘२०२१’ का आहे? याचं नाव कोणी ठरवलं? कधी ठरवलं? वाचूया एका कॅलेंडरच्या गोष्टीत.
 
 
 
रोमन कॅलेंडर
 
 
ही गोष्ट सुरू होते युरोपमध्ये. ज्यावेळी तिथे रोमन राज्य पसरले होते, इथे वापरले जाणारे कॅलेंडर अर्थातच - रोमन कॅलेंडर होते. या कॅलेंडरप्रमाणे, एका वर्षात दहा महिने होते. दहा महिन्यांचे मिळून ३०४ दिवस आणि थंडीतले ६१ निनावी दिवस असे ३६५ दिवसांचे वर्ष होते. वर्षाची सुरुवात वसंत ऋतूने - मार्च महिन्यात आणि शेवट थंडीच्या आधी - डिसेंबर महिन्यात. पुढे थंडीच्या मोसमात बरीचशी कामे ठप्प असल्याने, थंडीच्या महिन्यांना नावे द्यायची गरज पडली नसावी.
 
 
 
या कॅलेंडरमधील महिन्यांची नावे होती - मार्च (मार्स / मंगळ वरून), एप्रिल (अफ्रोदाईट/शुक्र वरून), मे (कृत्तिका नक्षत्रावरून), जून (‘जुनो’ या गुरू ग्रहाच्या बायकोवरून) नावे दिली गेली होती. पुढचे महिने - Quintilis (पाचवा), Sextilis (सहावा), September (सप्त/सातवा), October (अष्ट/आठवा), November (नवम/नववा) आणि December दशम/ दहावा) अशी सरळ साधी नावे होती.
 
 
 
 
इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकात या कॅलेंडरमध्ये सुधारणा करून 'Janus' आणि 'Februa' या देवांवरून ‘जानेवारी’ आणि ‘फेब्रुवारी’ हे दोन नवीन महिने समाविष्ट करण्यात आले. वर्षाच्या शेवटी अकरावा आणि बारावा महिना घालायच्या ऐवजी हे दोन महिने वर्षाच्या आधीच घुसडले. त्यामुळे पूर्वी सातवा असलेला सप्टेंबर महिना नववा झाला, आठवा असलेला ऑक्टोबर दहावा झाला, नववा असलेला नोव्हेंबर अकरावा झाला आणि दहावा असलेला डिसेंबर बारावा झाला! असे असले, तरी आता कॅलेंडरमध्ये निनावी दिवस राहिले नाहीत. प्रत्येक दिवसाला आपापले नाव मिळाले.
 
 
 
 
ज्युलियन कॅलेंडर
 
 
 
रोमन सम्राट जुलियस सीझर इ. स. पूर्व ४८ च्या दरम्यान इजिप्तमध्ये दाखल झाला. इथे आल्या आल्या तो इजिप्तच्या अचूक सौर कॅलेंडरच्या प्रेमात पडला! लगेचच त्याने इजिप्तच्या कॅलेंडरप्रमाणे रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्या. २८ ते ३१ दिवसांच्या १२ महिन्यांचे, ३६५ दिवसांचे वर्ष तयार झाले. या ‘ज्युलियन कॅलेंडर’मध्ये दर चार वर्षांनी एका अधिक दिवसाचा समावेश केला गेला.
पुढे पाचव्या आणि सहाव्या महिन्याचे नाव 'Julius' d 'Augustus' या रोमन सम्राटांवरून 'July' व 'August' अशी ठेवण्यात आली.
 
 
 
ग्रेगोरियन कॅलेंडर
 
 
ज्युलियन कॅलेंडर दीड हजार वर्ष वापरात होते. पण, त्यामध्ये एक बारीकशी चूक होती. ज्यामुळे ते कॅलेंडर ऋतुचक्राच्या मागे पडू लागले. १६व्या शतकात पोप ग्रेगोरीने ‘ज्युलियन कॅलेंडर’मध्ये एक सुधारणा केली ती अशी की, दर ४०० वर्षांमधले तीन-तीन लीप इयर कमी केले. आता मागे पडणारे कॅलेंडर ऋतू बरोबर चालू लागले. पण, आतापर्यंत ऋतू आणि कॅलेंडरमध्ये झालेली तफावत भरून काढण्यासाठी कॅलेंडरमधून दहा दिवस कमी करणे आवश्यक होते. म्हणून त्या वर्षी ४ ऑक्टोबर, १५८२ नंतर उगवलेला दिवस होता १५ ऑक्टोबर, १५८२.
 
 
विविध देशांनी वेगवेगळ्या काळात हे कॅलेंडर स्वीकारले. उदा. ब्रिटनने १७५२ मध्ये ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ स्वीकारले. तेव्हा त्यांना सप्टेंबरमधील ११ दिवस कमी करावे लागले. यामुळे भारतातील ब्रिटिश दस्तावेजसुद्धा १७५२च्या आधी ‘ज्युलियन कॅलेंडर’प्रमाणे आहेत, तर नंतरचे ‘ग्रेगोरियन’प्रमाणे.
 
 
 
वर्षाची सुरुवात
 
 
युरोपमध्ये ठिकठिकाणी वर्षाची सुरुवात वेगवेगळी मानली जात असे. रोममधील वर्ष १ जानेवारीला सुरू होत असे, कुठे पूर्वीप्रमाणे १ मार्चला सुरू होत असे, इंग्लंडमधील वर्ष २५ मार्चला सुरू होत असे, कुठे २५ डिसेंबरला, रशियाचे वर्ष सप्टेंबरमध्ये, तर आणखी कुणाचे ऑक्टोबरमध्ये सुरू होत असे.

पोप ग्रेगोरीने वर्षाची सुरुवात १ जानेवारी ठरवली. इटली, स्पेन, फ्रान्स आदी कॅथोलिक ख्रिश्चन देशांनी हे लगेच स्वीकारले. पण, इतर प्रोटेस्टंट व ओर्थोडोक्स ख्रिश्चन देश २५ मार्च अथवा २५ डिसेंबरलाच नवीन वर्ष मानत राहिले. इंग्लंडमध्ये १८व्या शतकापर्यंत नवीन वर्षाची सुरुवात २५ मार्चलाच होत असे.
 
 
वर्षगणना
 
 
वर्षांची गणना कोणत्या घटनेपासून करावी, याचीदेखील वेगवेगळी मते होती. कुठे रोम शहर बांधल्यापासून म्हणजे इ. स. पूर्व ७५३ पासून वर्षगणना करत. कुठे तत्कालीन सम्राटाच्या राज्याभिषेकापासून करत. सम्राट बदलला की परत पुढच्या सम्राटापासून १,२,३... अशी नवीन सुरुवात. कुठे नवीन राज्य आले की, नवीन गणना सुरू करत. कुठे टॅक्स सायकलप्रमाणे वर्षांची गणना करत. प्रत्येक नवीन सायकलला पुन्हा १,२,३... सुरुवात करत. काही जण बायबलप्रमाणे देवाने पृथ्वी तयार केली, तेव्हापासून म्हणजे - इ. स पूर्व ३७६१ (६ ऑक्टोबर)पासून गणना करत. या गणनेचे नाव होते 'A Anno Mundi.' तसेच कोणी 'Anno Martyrum' नुसार वर्षगणना करत. इतक्या मतांच्या गलबल्यात येशूच्या जन्मापासून कोणीही वर्षांची गणना करत नव्हते. मग ही पद्धत आली कुठून?
 
 
इसवी सनाचे पहिले वर्ष
 
 
 
येशूने माझा जन्मदिवस साजरा करा, असे काही सांगितले नव्हते. येशूचा जन्मदिवस नक्की कोणता हेसुद्धा कुणी लिहून ठेवले नव्हते. पण, चौथ्या शतकात, चर्चच्या लक्षात आले की, रोमन लोक २५ डिसेंबरला सूर्याचा जन्मदिवस थाटात साजरा करतात. या उत्सवाला येशूचे नाव जोडण्यासाठी - ‘येशूचा जन्म २५ डिसेंबरला झाला’ असे घोषित केले आणि रोमन लोकांचे त्यांच्या उत्सवासकट धर्मांतर केले.
 
 
बरं, जसे येशूचा जन्मदिवस माहीत नव्हता, तसेच येशूचे जन्म वर्षपण माहीत नव्हते. येशूने स्वत:च्या जन्मवर्षापासून नवीन कॅलेंडर सुरू केले नव्हते. अर्थात, नवीन कालगणना सुरू करायला, तो काही राजा नव्हता. पण, जर येशूच्या काळात अशी कालगणना सुरू झाली नव्हती, तर मग ही ‘इसवी सन’ गणना कधी सुरू झाली?
 
 
याचे उत्तर आहे - सहाव्या शतकात! डियोनिसियस (Dionysius Exiguus) नावाचा रोमानिया येथील चर्चमधील अललेीं (फादर) होता. त्याने असे शोधून काढले की, त्या वर्षी येशूच्या जन्मापासून ५३२ वर्षे लोटली होती. म्हणून ते वर्ष त्याने ‘५३२ Anno Domini' म्हणजे ‘येशूचे ५३२ वे वर्ष’ होते, असे सांगितले. हे त्याने कशावरून शोधले? ते काही कळत नाही. चौथ्या शतकात ख्रिस्ताचा जन्मदिवस २५ डिसेंबर ठरला, आणि सहाव्या शतकात ख्रिस्ताचे जन्मवर्ष ठरले - इसवी सन १.
 
 
 
अर्थात, ही इसवी सनाची कालगणना लगेच कोणी वापरात आणली नाही. हळूहळू करत नवव्या शतकापासून ती वापरात येऊ लागली. पुढे जसजशी अधिकाधिक देशांनी ती स्वीकारली, तशी ती युरोपभर पसरली.
 
 
 
इसवी सनपूर्व पहिले शतक
 
 
आठव्या शतकात बेडे (Venerable Bede) नावाचा एक चर्चमधील अधिकारी होता. त्याने लिहिलेल्या पुस्तकात येशूच्या पूर्वीचे कुठलेसे वर्ष हे ‘येशू पूर्व’ अमके वर्ष, असे लिहिले. तेव्हापासून 'BC/Before Christ' अशी उलटी वर्षमोजणी करायची अभिनव पद्धत सुरू झाली. या काळात युरोपला ‘शून्य’ माहीत नसल्याने या वर्षगणनेत ‘शून्य’ वर्ष येत नाही. ‘इसवी सन पूर्व १’ नंतर ‘इसवी सन १’ येते.
 
 
AD/BC
AD/BC ही वर्षांची विशेषणे येशू ख्रिस्ताशी संबंधित आहेत. ख्रिस्ताच्या आधी = BC व ख्रिस्त जन्मानंतर = AD. पण, ही नावे ख्रिस्ताशी संबंधित असल्याने, अनेकांनी जसे की वैज्ञानिकांनी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांनी, ज्यू लोकांनी व एकूणच ज्यांना वर्षाला धार्मिक रंग द्यायचा नव्हता त्यांनी 'AD/BC'च्या ऐवजी 'CE / BCE' ही नावे स्वीकारली. वर्ष तेच; पण नाव 'Common Era / Before Commo Era.'
 
 
नवीन वर्ष स्वागत
 
 
 
ग्रेगोरियन कॅलेंडर + १ जानेवारीला वर्षाची सुरुवात + येशूचे जन्मवर्ष म्हणजे इसवी सन १ हे एकत्रितपणे आता जगभर वापरले जाते, तर येणारे ग्रेगोरियन वर्ष, येशूच्या (तथाकथित) जन्मवर्षापासून २०२१ वे वर्ष आहे किंवा सेक्युलर भाषेत सांगायचे झाले, तर येणारे वर्ष, सामान्य युगाचे (Common Era) २०२१ वे वर्ष आहे. ‘जो जे वांच्छिल, तो ते २०२१ AD / २०२१ CE लाभो!’ व येणारे वर्ष सर्वांना सुखा-समाधानाचे जावो!





Powered By Sangraha 9.0