कुठल्याही देशात व्यापार करायचा म्हटला की, तिथली संस्कृती, भाषा आणि परंपरांचा आदर करणे हे आपसूकच आले. मग त्यासाठी अत्यंत आकर्षक जाहिराती, कॅम्पेनद्वारे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये ‘अॅमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीचा जो मनमानी कारभार सुरू आहे, त्याला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे, यापलीकडे काहीही म्हणू शकत नाही.
ई-कॉमर्स वेबसाईट्स यादेखील सोशल मीडियाचाच एक भाग मानायला आता हरकत नाही. ऑनलाईन वेबसाईट्सवर काय विक्री होते, काय विकले जाते, याची गरमागरम चर्चा ट्विटर, फेसबुक आणि अन्य ठिकाणच्या सोशल मीडियावर रंगत असते. मग कधी धार्मिक तेढ निर्माण करणार्या वस्तूंची विक्री असो वा कधी भाषिक अस्मितेचा मुद्दा असो, डिजिटल युगात वावरत असताना त्यातही व्यापार करत असताना जनतेच्या ‘भावना’ जपणं हे फार महत्त्वाचे असते. जर आपण एखाद्या ‘बॉयकॉट’ मोहिमेच्या रडारवर आलोच, तर मग होणारा त्रास, नुकसान सर्वस्वी हे व्यापाराचेच असेल, हे अद्याप भारतात व्यापार करणार्या परराष्ट्रीय कंपन्यांना लक्षात आलेले नाही.
मनसेशी पंगा घेऊन नमते घेतल्यावर ‘अॅमेझॉन’ आता नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी अशाच एका मुद्द्यावरून ‘अॅमेझॉन’ला कोंडीत पकडले. ‘इंडियन हिंदू वाईफ्स विद हर मुस्लीम लव्हर’ हे कथित नीलिमा स्टेवेन्स या लेखिकेचे पुस्तक ‘किंडल’वर उपलब्ध आहे. असाच आशय असणारी आणखीही बरीच पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, कुणाच्या किडक्या डोक्यातून या कहाण्या जन्माला आल्या ते आपसूक लक्षात येते. अशीच डझनभर पुस्तके किंडलवर उपलब्ध आहेत.
मुळात या एका पुस्तकाचा वाद उफाळून आल्यावर ते पुस्तक हटविण्याचे उशिराचे शहाणपण ‘अॅमेझॉन’ला आले. अर्थात, यात थेट ‘अॅमेझॉन’ची चूक कशी काय, असा प्रश्न विचारणारे आहेतच. बनावट नावाने, कुणाचेही पुस्तक कुणाच्याही नावाने खपविणारे नासक्या डोक्याची मंडळी या माध्यमातून कसा द्वेष पसरवू पाहत आहेत, त्यासाठी ‘अॅमेझॉन’ने उपलब्ध करून दिलेल्या मंचाचा वापर करत आहेत, मग याला जबाबदार कोण? हा प्रश्न विचारल्यावर बोट ‘अॅमेझॉन’कडे येणार नाही का?, हादेखील प्रश्न आहेच.
उदारमतवादी मानसिकता असणार्यांच्या सुपीक डोक्यातून केवळ हिंदुविरोध वेळोवेळी उफाळून आला आहे. ऑनलाईन ई-कॉमर्स साईट्सवर देवी-देवतांचे फोटो आक्षेपार्ह ठिकाणी असलेल्या वस्तूंची विक्री ही कुणाच्या कट्टर मानसिकतेतून येते? सेक्युलरवाद मिरवत असताना धर्मांना नख लावण्याचे उद्योग अशाच जाहिरातींतून वेळोवेळी झाल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. ‘तनिष्क’ची ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी जाहिरात असो वा ‘इरॉस नाऊ’ या म्युझिक कंपनीने केलेला रास-गरबा दांडियाचा विद्रूप जाहिरातीचा खेळ, हे सगळे जण एकाच पारड्यात मोजले जातील.
‘फेसबुक’ने मात्र यातून धडा घेत इथल्या संस्कृतीला साजेशी जाहिरात केली होती. ‘लॉकडाऊन’मध्ये देशात महामारी पसरत असताना होणारी कर्मचारीकपात ही बातमी वाचून एका धाडसी महिलेचे ‘फेसबुक’ पोस्टच्या माध्यमातून नोकरीसाठी गरज असलेल्यांनी संपर्क करा, हे सांगणारी जाहिरात प्रेक्षकांना फारच भावली. इथल्या मातीत आणि माणसांमध्ये मिसळल्याशिवाय भारतीय संस्कृती म्हणजे काय, हे समजणे कठीण आहे. विमानाच्या खिडकीतून दिसणारी झोपडपट्टी म्हणजे भारत नव्हे, तर त्याच झोपडपट्टीच्या गल्लीबोळातील लोकांचे एकमेकांशी असलेले बंध म्हणजे भारत, हे समजायला इथे थोडा वेळ घालवावा लागेल.
‘अॅमेझॉन’ने मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आडकाठी घालण्याचा प्रयत्न केलाच, त्याशिवाय नंतर नमते घेऊन विषय मिटविण्याचाही प्रयत्न झाला. जिथे व्यापार करायचा तिथल्या संस्कृतीचा स्वीकार न करता निर्णय लादण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेले आहेत. आमीर खानच्या वक्तव्यामुळे अशाच एका वादाची झळ ‘स्नॅपडील’ या कंपनीलाही बसली होती. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जेव्हा प्रादेशिक मुद्दा येईल, त्यावेळेस मात्र अशी काळजी घ्यावीच लागणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे, ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ ही संस्कृतीही आमचीच आहे...!