जात पडताळणी समित्यांनी ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत: धनंजय मुंडे

30 Dec 2020 18:00:37
 
dhananjay mundhe_1 &
 
 



जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड



मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार ‘बार्टी’मार्फत याबाबतचा आदेश निश्चित करण्यात आला आहे.
 
 
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली आहे. त्यामुळे ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत, याबाबत राज्यभरातून विनंती करण्यात येत असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
 
 
 
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची गैरसोय न होता, पोचपावती मिळावी यासाठी ३० डिसेंबर रोजीही अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच समितीने ठिकठिकाणच्या अर्जाची संख्या लक्षात घेत, अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे सदर दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालये सुरू ठेवावीत व ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि. ०१ जानेवारी २०२० पर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी, असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.


Powered By Sangraha 9.0