निर्मळ मनाचा व्यंगचित्रकार

29 Dec 2020 21:35:35
mansa _1  H x W
 
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे वास्तव्यास असणारे गजरमल काका हे एक नावाजलेले व्यंगचित्रकार. त्यांच्या कलाकारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
अभिव्यक्त होण्याकामी विविध माध्यमांचा वापर कायमच होताना दिसून येतो. मुद्रित माध्यमांचा जर इतिहास चाळला, तर एका छोट्या जागेत असणारे व्यंगचित्रदेखील कायमच वाचकांचे लक्ष वेधून घेते. व्यंगचित्रासाठी खास मासिके, पाक्षिके प्रकाशित करण्यात आली असल्याचेही आपण पाहिले आहे. राजकीय, सामाजिक स्थितीचे व्यंगात्मक ढंगात वर्णन करणे आणि त्यातून केवळ हास्याची लकेर उमटविणे तसे फारच अवघड काम. पण, हीच किमया व्यंगचित्राच्या माध्यमातून सहज साकारली जाते.
 
 
व्यंगचित्रकार होण्याकामी सर्वात महत्त्वाचा अंगभूत गुण असावा लागतो तो म्हणजे, मनाची निर्मळता. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या छोट्याशा गावात वास्तव्यास असणारे भास्कर गोविंद गजरमल उपाख्य ‘गजरमल काका’ त्यामुळेच जिल्ह्यात एक नावाजलेले व्यंगचित्रकार म्हणून उदयास आले आहेत. लासलगावची ओळख आजवर आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव अशीच आहे. मात्र, गजरमल काकांचे व्यंगचित्र आता लासलगावची ओळख म्हणून पुढे येताना दिसते.
 
 
 
कृषी खात्यात सेवेत असलेल्या गजरमल काकांनी निवृत्तीपश्चात काय करावे म्हणून सहजच व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली. काका कृषिखात्यात अनुरेखक म्हणून सेवेत होते. सचोटीबद्ध आणि आखीव-रेखीव असणारे हे काम. त्यामुळे रेषांची किमया साधून कलात्मकता घडविता येते, याबाबत काकांना सेवाकाळात माहिती असण्याचा काही प्रश्नच नव्हता. निवृत्तीनंतर माहीत असलेल्या रेखा या मनातील विचार आणि दिसणारी दृश्यं, येणारी अनुभूती यांच्या साहाय्याने फिरविल्यास कलाकृती साकारता येते, हे गजरमल काकांनी जाणले आणि सुमारे १७ वर्षांपूर्वी लासलगावच्या मातीतून व्यंगचित्र साकारली जाऊ लागली.
 
 
काकांना व्यंगचित्र पाहण्याची, ते जाणून घेण्याची आवड ही अगदी लहानपणापासूनच. शालेय जीवनात चित्रकलेच्या परीक्षेत ते नीचांकी गुणांनी उत्तीर्ण झालेले. त्यामुळे चित्रकला हा त्यांचा हातखंडा वगैरे होता, असेही काही नाही. अनेक वेळा प्रयत्न केल्यावर काकांना व्यंगचित्र काढता येणे शक्य होऊ लागले. आजवर काकांनी हजारो व्यंगचित्रं काढली असून, ती सामाजिक जीवनात येणार्‍या अनुभवांवर आधारित आहेत. व्यंगचित्र काढणे जमायला लागल्यावर ती हळूहळू साचत गेली. या व्यंगचित्रांचे करायचे काय, हा प्रश्न आता काकांना सतावू लागला. त्यामुळे त्यांनी ही चित्रे नाशिकमधील काही वृत्तपत्रांच्या कार्यालयात आणून दाखविली.
 
 
या वृत्तपत्रांनी त्यांना हे उत्तम असून आपण हे छापू, असे सांगत काकांचा आत्मविश्वास दुणावण्यास मदत केली व त्याप्रमाणे काकांचे व्यंगचित्र हे नाशिकमधील वृत्तपत्रांत झळकूही लागले. त्यानंतर विविध दिवाळी अंकांमध्येही काकांचे व्यंगचित्र हे प्रकशित होण्यास सुरुवात झाली. येथूनच लासलगावी एसटी स्थानकाच्या समोर वास्तव्यास असणारे गजरमल काका जिल्ह्यास परिचित होण्यास सुरुवात झाली. काकांशी संवाद साधताना त्यांच्यातील निर्मळता अगदी सहज जाणवते. व्यंगचित्र काढताना कोणता विचार आपण करता, असे त्यांना विचारले असता, ते सहज सांगतात की, “आपल्या व्यंगचित्रांनी कोणीही दुखावले जाणार नाही, असे चित्र काढावे.
 
 
तसेच, व्यंगचित्र हे केवळ टीका-टिपणीचे साधन न होता ते वाचकाच्या चेहर्‍यावर हसू फुलविणारे असावे,” अशीच काकांची माफक धारणा. व्यंगचित्र हे थोडक्यात मात्र आशयपूर्ण असावे, अशीच भूमिका ते मांडताना दिसतात. आजच्या माहिती-तंत्रज्ञानच्या युगात छापून येणारी आणि रेखाटलेली व्यंगचित्रे ही अत्यंत महत्त्वाची आहेत. व्यंगचित्रकार हा जरी ती काढत असला, तरी बघणार्‍यांनी ती आवर्जून पाहाणेदेखील आवश्यक आहे, तरच या कलेचे असणारे महत्त्व अबाधित राहण्यास मदत होईल, अशीच भूमिका काका मांडताना दिसतात.
 
व्यंगचित्रे ही अभिव्यक्तीचे उत्तम साधन आहे, तसेच कोणालाही न दुखविता परिणामकारक संदेश देण्याची ताकद या व्यंगचित्रात आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय बदल घडविण्यातही ही व्यंगचित्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे व्यंगचित्रं सर्वकाही साध्य करू शकतात. फक्त ती साकारणारी व्यक्ती आणि ती पाहणारी व्यक्ती यांच्याकडे तशी दृष्टी असणे आवश्यक आहे, असेच मत काका व्यंगचित्रांचे महत्त्व अधोरेखित करताना व्यक्त करतात.
 
 
व्यंगचित्र काढणे ही कठीण कला आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. जीवनातील विसंगती टिपता आली पाहिजे. गुण-दोष दाखविताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेष नाजूक आणि ठळक असायला हवी. गमतिशीर विचारशक्ती हवी. हे सर्व गुण काकांच्या ठायी असून, त्यामुळेच त्यांचे व्यंगचित्र हे जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहेत. व्यंग्यचित्र कधी थट्टामस्करी, तर कधी उपरोध-उपहास यांचा यथोचित उपयोग करून चित्ररसिकाचे प्रबोधन करते. योग्य काय, अयोग्य काय, याचे त्याला भान आणून देते. त्याची खिलाडू वृत्ती आणि संवेदनक्षमता वाढवते. याच भूमिकेतून काका आपले व्यंगचित्र साकारत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी वाचकांना हसविण्याचा ध्यास घेतलेल्या गजरमल काकांच्या कलेला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
Powered By Sangraha 9.0