वन आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनेचा मच्छीमारांना लाभ
मुंबई (अक्षय मांडवकर) - संरक्षित सागरी जीवांच्या संवर्धनासाठी वन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने सुरू केलेल्या भरपाई योजनेअंतर्गत यंदा मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या १२३ सागरी प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडले आहे. जाळे कापून सागरी प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडल्याबद्दल मच्छीमारांना वीस लाखांहून अधिक रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. सागरी जीवांच्या रक्षणाबरोबरच मच्छीमारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
वन विभागाचा 'कांदळवन कक्ष' आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबर, २०१८ रोजी मच्छीमारांकरिता भरपाई योजना सुरू करण्यात आली. मासेमारीदरम्यान मच्छीमारांच्या जाळ्यात अनावधानाने 'वन्यजीव संरक्षण कायद्या'ने संरक्षित असलेले व्हेल शार्क, डाॅल्फिन, समुद्री कासवांसारखे जीव अडकले जातात. अशा वेळी मच्छीमार या जीवांना जाळे कापून पुन्हा समुद्रात सोडतात. त्यामुळे मच्छीमारांना जाळ्याची नुकसान भरपाई देण्याबरोबरच अधिकाधिक सागरी जीवांना जीवदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही भरपाई योजना राबविण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांना जाळ्याची भरपाई म्हणून कमाल २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांच्या बोटीचे कागदपत्र तपासल्यानंतर 'कांदळवन कक्षा'च्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून हे अनुदान दिले जाते.
नुकसान भरपाई योजनेअंतर्गत २०२० या वर्षात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२३ मच्छीमारांना संरक्षित प्रजाती जाळ्यातून सुखरुप सोडल्याबद्दल २० लाख ६३ हजार ३०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या सागरी जीवशास्त्रज्ञ धनश्री बगाडे यांनी दिली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वात जास्त ४५ प्रकरणे 'कांदळवन कक्षा'ला प्राप्त झाली. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग ३१, रायगड २२, रत्नागिरी १३ आणि पालघरमधून १२ प्रकरणांची माहिती मिळाली होती. मागील आठवड्यात 'कांदळवन कक्षा'तर्फे ३० प्रकरणांची शहानिशा करुन ४ लाख ७५ हजार रुपयांची भरपाई ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना दिल्याचे बगाडे यांनी सांगितले.
भरपाई योजनेअंतर्गत गेल्या दीड वर्षांमध्ये 'कांदळवन कक्षा'ने १४५ मच्छीमारांना २४ लाख ३७ हजार ५५० रुपयांचे अनुदान दिले आहे. संरक्षित सागरी जीवांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला असून यामुळे मच्छीमारांना संरक्षित सागरी जीवांना जीवदान देण्यास प्रोत्साहन मिळत आहे. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
प्रजातीनुरुप यंदाची आकडेवारी
आॅलिव्ह रिडले कासव - ५५
लेदरबॅक कासव - १
ग्रीन सी कासव - ३७
हाॅक्सबिल कासव - ३
हम्पबॅक डाॅल्फिन - १
व्हेल शार्क - २४
गिटारफीश - २