सुट्टीचा प्लॅन करताय ? चला आंजर्ल्यात 'मॅंग्रोव्ह कयाकिंग'ला

26 Dec 2020 17:09:34

mangrove _1  H


कांदळवन दर्शन, पक्षीनिरीक्षण, पाणमांजरांचे दर्शन आणि बरचं काही...

मुंबई (प्रतिनिधी) - नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तुमचा कोकणात जाण्याचा बेत असेल, तर दापोतील आंजर्ले गावाला नक्की भेट द्या. कारण, आंजर्ल्याच्या खाडीतील कांदळवनांमध्ये तुम्हाला 'मॅंग्रोव्ह कायाकिंग'चा आनंद लुटता येईल. यासोबतच तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल, तर कांदळवन आणि पक्षीनिरीक्षणही करता येईल. वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने गावातीलच लोकांना प्रशिक्षित करुन त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. 
 
 
गेल्या काही वर्षांपासून वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'कडून (मॅंग्रोव्ह सेल) महाराष्ट्राच्या किनारी गावांमधील लोकांना कांदळवनांवर आधारित रोजगार निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'अंतर्गत 'कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजने'च्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये खेकडा-कालवे पालन, शोभिवंत मत्स्यपालन, निसर्ग पयर्टन अशा काही उपक्रमांचा समावेश आहे. निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने कांदळवनांमध्ये परिपूर्ण जैवविविधता असलेल्या जागा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत दोपोलीतील आंजर्ले गावात निसर्ग पर्यटन सुरू करण्यात आले आहे. आंजर्ले हे गाव कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. महोत्सवाबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक आणि निसर्गप्रेमींना आता याठिकाणी कांदळवनांमधील निसर्ग पर्यटनाचाही आनंद लुटता येणार आहे. 
 
 
 
 
आंजर्ल्यातील खाडीमध्ये साधारण १० हेक्टरवर कांदळवन पसरलेले आहे. कांदळवनांवर आधारित उपजीविका निर्माण करण्यासाठी गावातील लोकांच्या 'कांदळवन सहव्यवस्थापन समिती' तयार करण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून त्यांनी निसर्ग पर्यटनाचे विविध उपक्रम घेण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. कांदळवनांमध्ये पर्यटकांना एका तासासाठी 'मॅंग्रोव्ह कयाकिंग'चा आनंद घेता येईल. त्यासाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारले जाईल. कयाकिंग करताना एका पर्यटकासोबत एक प्रशिक्षित गाईड असेल. कयाकिंगदरम्यान कांदळवनांची माहिती देण्याबरोबरच आणि पक्षीनिरिक्षणही करता येईल. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अभिनय केळस्कर (9637654327, 9404765675) आणि तृशांत भाटकर (94047 65477) यांच्याशी संपर्क साधू शकता. 

Powered By Sangraha 9.0