१९७१ च्या युद्धातील यशाचे सर्वात मोठे शिल्पकार : फिल्ड मार्शल ‘सॅम माणेकशाँ’

26 Dec 2020 20:48:50

india_1  H x W:
 
१९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १४ दिवसांत शरण आणताना फिल्डमार्शल सॅम माणेकशाँनी निर्धार, खंबीर वृत्ती, या गुणांचा परिचय दिला. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही, तितकी लोकप्रियता माणेकशाँ यांना मिळाली. अर्थात, त्यांच्या युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुणांमुळेच. युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्याप्रमाणे युद्धनीती आखणारे माणेकशाँ एक सेनापती होते.
 
 
देशाचे पहिले ‘फिल्ड मार्शल’
 
 
१६ डिसेंबर, २०२० रोजी १९७१च्या युद्धाला ४९ वर्षे पूर्ण झाली. १९७१ मध्ये ‘बांगलादेश मुक्ती संग्रामा’त पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले ‘फिल्ड मार्शल’ सॅम माणेकशाँ, ‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे भारतीय लष्करात पहिले अधिकारी होते. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांनी लष्कराचे नेतृत्व केलं होतं. ‘सॅम बहादूर’ या नावानेही ते परिचित आहेत.
 
 
मला गाढवाने लाथ मारली
 
 
दुसऱ्या महायुद्धातील जपानबरोबरील बर्मा युद्धात, पॅगोडा हिल्सवर ताबा मिळविताना माणेकशाँ यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या. लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत असताना ते गंभीररीत्या जखमी झाले.शस्त्रक्रिया कक्षात नेल्यानंतर जगण्याची शक्यता कमीच असल्यामुळे तेथील सर्जनने, “मी, तुमची शस्त्रक्रिया करणार नाही,” असे मोठ्या आवाजात सांगितले. एवढ्यात माणेकशाँ शुद्धीवर आले होते, म्हणून तिथून जाण्यापूर्वी सर्जनने त्यांना विचारले की, “अशी अवस्था तुमची कशामुळे झाली?” नुकतेच शुद्धीवर आलेले माणेकशाँ म्हणाले की, “मला गाढवाने लाथ मारली म्हणून माझी ही अवस्था झाली.” मरणाच्या दारात असताना त्यांचे उत्तर ऐकून सर्जनला धक्का बसला व त्यांची लढाऊ वृत्ती बघून त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, इतिहास घडला. युद्धभूमीवरील शौर्यासाठी त्यांना ‘मिलिटरी क्रॉस’ देऊन गौरविण्यात आले होते.
 
 
तुम्ही युद्धाला तयार आहात का?
 
 
१९७१ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मार्च महिन्यात सॅम माणेकशाँ यांना, “तुम्ही युद्धाला तयार आहात का?” असा प्रश्न विचारला. तेव्हा सॅम माणेकशाँ यांनी दिलेले उत्तर होते, “नाही.” सध्या आर्मर्ड डिव्हिजन आणि इन्फन्ट्री डिव्हिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत, त्यांच्याकडे युद्धासाठी तयार असलेले केवळ 12 रणगाडे आहेत, नवीन बटालियनना प्रशिक्षण देण्याची गरज होती. रणगाडे आणि इतर अजून जास्त युद्धसामग्री बनविण्याची गरज होती, दारुगोळा पुरेसा नाही, सैन्याची अनेक शस्त्रे स्पेयर पार्ट्स नसल्यामुळे नादुरुस्त आहेत, थोड्या दिवसांनी मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर नद्यांना पूर येऊ शकतो. तसे झाल्यास बांगलादेशात लढाई शक्य नाही. तयारी करण्याकरिता सैन्याला कमीत कमी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वेळ पाहिजे. याच काळात हिमालयात बर्फ पडल्यामुळे चीन पाकिस्तानची मदत करू शकणार नाही आणि चिनी सीमेवरती असलेले भारतीय सैन्य ईस्ट पाकिस्तानमध्ये आक्रमक कारवाईकरिता वापरता येईल.
 
 
 
भारतीय सैन्यावर राजकीय नेतृत्वाचा प्रचंड दबाव होता की, युद्ध लगेच एप्रिल महिन्यामध्ये सुरू करावे. परंतु, सॅम माणेकशाँ यांनी सांगितल्यानंतर काही तथाकथित तज्ज्ञांनी त्यांच्याविरुद्ध एक अपप्रचार मोहीम सुरू केली. तेव्हा सॅम माणेकशाँ यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊ केला होता. इंदिरा गांधींनी माणेकशाँ यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारत सरकारने आता काय करावे, असा सल्ला मागितला. त्यावर सॅम माणेकशाँ यांनी इंदिरा गांधी यांना विजयाची खात्री दिली. मात्र, त्यासाठी राजकीय व कुठलाही हस्तक्षेप न करता सैनिकी पद्धतीने युद्ध लढण्याची मोकळीक द्यावी. इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशाँ यांचा हा प्रस्ताव मान्य केला आणि एक मोठा विजय मिळविण्यात आला. श्रीमती इंदिरा गांधींशी त्यांचा थेट मिलाप असल्यामुळे नोकरशाही कुठल्याही प्रकारचा अडथळा सैन्याच्या तयारीमध्ये करू शकली नाही व उत्तम तयारी करता आली.
 
 
युद्धकाळात सैन्याचे नेतृत्व
 
 
पाकिस्तानी हवाईदलाचा ३ डिसेंबरला अचानक हल्ला झाला. त्यावेळेला पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री हे दिल्लीमध्ये नव्हते. माणेकशाँ यांनी स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेऊन लढाई सुरू करण्याचे हुकूम दिले. हा निर्णय त्यांचा स्वत:च्या कर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास दाखवितो. पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या मोठ्या शहरांचे रक्षण किल्ल्यासारखी रचना (strong point defences) करून करण्याचे ठरविले होते. परंतु, युद्ध सुरू व्हायच्या काही महिने आधी पूर्व पाकिस्तानच्या सीमेवरील बॉर्डर पोस्ट्सवरती भारतीय सैन्याने सप्टेंबरपासून छुपे हल्ले केल्यामुळे पाकिस्तानला आपले सैन्य मोठ्या शहरांपासून काढून सीमेवरती आणावे लागले. या डावपेचामुळे पाकिस्तानी सैन्य ना सीमेवरती ना शहराभोवती लढण्याकरिता तयार होते. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला पाकिस्तानी सैन्याची म्यानमार सीमा आणि समुद्राकडून नाकेबंदी केल्यामुळे त्यांचे तिथून पळून जाणे अशक्य झाले.
युद्धात अनेक अभिनव डावपेचांचा वापर झाला. जसे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच टांगेलमध्ये भारतीय सैन्याचा एयर ड्रॉप करण्यात आला. हेलिकॉप्टरच्या मदतीने बांगलादेशमधल्या नद्या पार करणे किंवा मोठ्या शहराजवळ असलेल्या किल्ल्यांवरती हल्ला न करता त्यांच्या मागे जाऊन त्यांचा परत जायचा रस्ता अडविणे इत्यादी. बांगलादेशमध्ये भारतीय सैन्याची वेगाने हालचाल करण्याकरिता घोडे, रिक्षा, बैलगाड्या आणि अशा अनेक अभिनव वाहनांचा वापर केल्यामुळे आणि सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे पूर्व पाकिस्तानमधील पाकिस्तानी सैन्य हे भांबावून गेले आणि कुठेही त्यांना चांगल्या पद्धतीने लढाई करता आली नाही.
कमी रक्त सांडून युद्ध जिंकणारे युद्ध नेतृत्व
खरे म्हटले तर शरणागतीच्या वेळी पाकिस्तानी सैन्याची युद्धक्षमता शाबूत होती आणि त्यांना अजून अनेक दिवस युद्ध लढता आले असते व भारताला अजून अनेक सैनिकांचे रक्त सांडावे लागले असते. पण, या मानसिक युद्धामुळे पाकिस्तान मनात युद्ध हरले आणि माणेकशाँ यांच्या या इशाऱ्यानंतर १६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने पांढरे निशाण फडकावले. कमीत कमी रक्त सांडून युद्ध जिंकणे, यालाच कुशल युद्धनेतृत्व म्हणतात. ढाका शहरात ९४ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते.
 
माणेकशाँ यांचे युद्धकौशल्यआणि नेतृत्व
 
त्यांनी ‘मुक्ती बाहिनी’ हा बंगाली सैनिकांचा एक कमांडो विभाग बनवला, ज्यामध्ये हजारो बंगाली सैनिकांना प्रशिक्षण देऊन पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता तयार करण्यात आले. ‘मुक्ती बाहिनी’ने युद्धात चांगले काम केले. ‘फिल्ड मार्शल’ माणेकशाँ हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी असे सेनानी होते. युद्ध रणनीतीची उत्तम जाण, कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्याची क्षमता, राजकीय नेतृत्वाला निर्भीडपणे सल्ला देण्याची हिंमत, सैनिकी मूल्यावर निष्ठा, आपल्या सैनिकांना लढाईकरता मनोबल वाढविण्याचे कौशल्य असे अनेक पैलू त्यांनी १९७१च्या युद्धामध्ये दाखविले. पाकिस्तानी सैन्याची शरणागती पत्करायला माणेकशाँ यांनी स्वतः जावे, असे इंदिरा गांधी यांना वाटत होते. परंतु, हा मान जनरल जगजीत सिंग अरोरा यांचा आहे म्हणून त्यांनी जाण्याचे नाकारले आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला.
 
सेवानिवृत्तीनंतर १९७२ मध्ये माणेकशाँ यांना ‘पद्मविभूषण’ हा सन्मान व ‘फिल्ड मार्शल’ हा रँक मिळाला. पण, त्यांना ‘फिल्ड मार्शल’ या पदाचा पगार निधनाच्या आठ महिने अगोदर म्हणजे २३ वर्षांनंतर देण्यात आला. अर्थात, त्यांनी याकरिता कधीही तक्रार केली नाही. या युद्धातील यशाचे ते एक सर्वात मोठे शिल्पकार होते. २७ जून, २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात माणेकशाँ यांचे निधन झाले. सॅम यांच्या अत्यसंस्काराला कोणताही राजकीय नेता उपस्थित राहिला नाही किंवा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला नाही. ही राष्ट्रीय शोकांतिकाच म्हणावी लागेल.
पण, तो देशाचा अपमान होता. कारण माणेकशाँ हे सगळ्या भौतिक सुखाच्या पुष्कळ पुढे होते. सैनिकांच्या आणि देशवासीयांच्या मनामध्ये त्यांचे स्थान अटळ आहे. निवृत्तीनंतर ते सैन्याच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रांना भेट देत राहिले आणि युद्धनेतृत्व या विषयावरती त्यांचे प्रशिक्षण करत राहिले. १९८८ मध्ये स्टाफ कॉलेजमध्ये वेलिंग्टन येथे प्रशिक्षण करत असताना मला माणेकशाँ यांचे युद्धनेतृत्व या विषयावरील विचार ऐकण्याची संधी मिळाली, त्यामुळे खूप शिकता आले. तो एक अविस्मरणीय असा अनुभव होता.
१९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १४ दिवसांत शरण आणताना फिल्डमार्शल सॅम माणेकशाँनी निर्धार, खंबीर वृत्ती, या गुणांचा परिचय दिला. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही, तितकी लोकप्रियता माणेकशाँ यांना मिळाली. अर्थात, त्यांच्या युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुणांमुळेच. युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्याप्रमाणे युद्धनीती आखणारे माणेकशाँ एक सेनापती होते.
 
Powered By Sangraha 9.0