१३८ अंडी आढळली
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर कासवाचे पहिले घरटे मिळाले. यामध्ये १३८ अंडी आढळून आली. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतील.
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. २००३ साली चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने सागरी कासवांच्या संवर्धन मोहिमेला सुरूवात केली. आता संवधर्नाचे हे काम वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने पाहिले जाते. गेल्यावर्षी सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २३३ घरटी आढळली होती.
यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे आज पहाटे हरिहरेश्वर किनारपट्टीवर आढळल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. या किनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम करणाऱ्या कासवमित्र सुबोध खोपटकर आणि संतोष मयेकर यांनी सापडलेल्या १३८ अंड्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हॅचरीत हलविल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी राज्याच्या कांदळवन कक्षाचे (मॅंग्रोव्ह सेल) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला सांगितले की, "किनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम करणाऱ्या कासवमित्रांची मार्गदर्शनपर कार्यशाळा 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या वतीने घेण्यात आली आहे. यंदा निसर्ग चक्रीवादळामुळे काही किनाऱ्यांवर कासवांच्या अंड्यांच्या संगोपनासाठी बांधलेल्या हॅचरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्याने हॅचरी बांधण्यासाठी येणारा खर्च प्रादेशिक वन विभागाचा प्रस्ताव आल्यानंतर 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या वतीने देणार आहोत."
अंडी व घरटय़ांची जपणूक
समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरटय़ांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला हॅचरी म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खडय़ाप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते.