रामदास स्वामींनी समर्थ संप्रदायाची स्थापना करून संप्रदायाच्या कार्यासाठी लागणारे महंत, शिष्य शोधले आणि परिश्रमाने त्यांना तयार केले. महंतांनी प्रथम ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करून आत्मोद्धार साधावा आणि मग लोकोद्धाराच्या कामाला लागावे, अशी समर्थांची अपेक्षा होती, हे आपण मागील एका लेखात पाहिले आहे. महंतांनी संप्रदायाच्या कामासाठी मुख्यतः लोकसंग्रह करावा, हे अपेक्षित होते. यासाठी महंताने जनसमुदायाला आपलेसे करून घेतले पाहिजे. लोकसमुदायाला वश करून घेतले की, मग समुदायाबाहेरील जी मंडळी असतात, त्यांनाही महंतांविषयी विश्वास वाटू लागतो आणि महंतांच्या कार्याविषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण होते.
अनन्य राहे समुदाय।
इतर जनास उपजेभाव।
ऐसा आहे अभिप्राव। उपायांचा॥
लोकसंग्रहासाठी महंतांना पुढारीपण करावे लागे. असे हे पुढारीपण नीट सांभाळण्यासाठी समर्थांनी एक चार कलमी कार्यक्रम महंतांना सांगितला आहे. अर्थात, ते सारे सांप्रदायिकांसाठीही आहे. कारण, महंतांप्रमाणे सर्व शिष्यांना संप्रदायासाठी काम करायचे आहे. स्वामींनी सांगितलेला चार कलमी कार्यक्रम असा आहे.
मुख्य ते हरिकथा निरूपण।
दुसरें तें राजकारण।
तिसरें ते सावधपण।
सर्व विषयी॥ (दा. ११.५.४)
चौथा अत्यंत साक्षेप...
यातील पहिले लक्षण म्हणजे हरिकथा निरूपण, हरिकथा निरूपणातून आध्यात्मिक पार्श्वभूमी तयार करणे हे महत्त्वाचे काम आहे. लोकांना एखाद्या कामास लावण्याअगोदर त्यांची आध्यात्मिक पातळी उंचावली पाहिजे. भगवंताच्या कथा श्रवणाने लोकांमध्ये शौर्य, औदार्य, परोपकार निर्माण होतात. तशी प्रेरणा त्यांना मिळते. म्हणून हरिकथा निरूपणाला मुख्य म्हटले आहे. त्यावर जास्त भर दिला आहे. या ठिकाणी स्वामींनी ‘हरिकथा निरूपण’ असा शब्दप्रयोग केला असला तरी त्यांच्या मनात ‘रामकथा निरूपण’ असा भाव होता. रामकथेतून लोकांना अनेक सद्गुणांचा साक्षात्कार होतो. भगवंताचा विसर कधीही पडू देऊ नये, हे जरी खरे असले तरी त्याचबरोबर व्यवहारज्ञानही आवश्यक आहे. म्हणून दुसरे लक्षण ‘राजकारण’ सांगितले आहे. राजकारण हे व्यवहारातील चातुर्य आहे. आता हे चातुर्य सांभाळायचे असेल तर सावधपणा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून स्वामींनी तिसरे लक्षण स्पष्ट करताना, ‘सावधपण सर्व विषयी’ असे सांगितले आहे. अर्थात, ही तिन्ही लक्षणे कार्यान्वित करायची तर आळशीपणा टाकून देऊन कामाला लागावे लागते, हे ओघाने आले. त्यासाठी सतत उद्योग करावा लागतो. समर्थ त्यासाठी ‘साक्षेप’ शब्दाचा प्रयोग करतात. यश मिळाले तरी ते टिकवून ठेवण्यासाठी सतत उद्योग म्हणजेच ‘साक्षेप’ आवश्यक असतो.
महंतांची ही अशी शिस्तबद्ध संघटना स्वामींनीं उभारुन तिचे जाळे सर्व देशभर पसरवले. संप्रदायाच्या कार्याचा प्रचार-प्रसार संघटनेवर अवलंबून असतो. व्यक्तीपेक्षा संघटना चिरंजीव असते. एखादी व्यक्ती आज आहे, पण उद्या नसेल. संघटन मात्र टिकून राहिले तर कार्याचा नाश होत नाही. समर्थांनी एका ओवीत हे स्पष्ट केले आहे.
आपण अवचित मरोन जावे।
मग भजन कोणे करावे।
याकारणे भजनास लावावे।
बहुत लोक॥
संघटना उभारणे व ती टिकवून धरणे हे राजकारणासाठी महत्त्वाचे असते. समर्थांनी कीर्तन-भजनाबरोबर प्रपंच विज्ञानाला व राजकीय राष्ट्रीय विचाराला स्थान दिले होते. इतिहासाचार्य व थोर विचारवंत राजवाडे यांच्या मते रामदास आणि त्यांच्या पूर्वीच्या साधू-संतात फरक आहे. इतर संतांहून रामदासांचे वेगळेपण दाखवताना राजवाडे लिहितात, “ज्ञानेश्वरांपासून सुरुवात करुन रामदासांपर्यंत व रामदासांपासून राम जोशींपर्यंत ५०० वर्षांच्या ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ निरुपण करणारा ग्रंथकार रामदासांखेरीज दुसरा कोणी झाला नाही. राजकीय व राष्ट्रीय दिशेने विचार करण्यात इतर संतांनी बिल्कुल लक्ष घातले नाही. रामदास व त्यापूर्वीच्या साधूंत हाच मोठा भेद होता.” समर्थांनी आपल्या वाङ्मयातून राजधर्म, क्षात्रधर्म, सेवकधर्म विस्तृपणे सांगितले आहेत. या प्रकरणांचा जरी विचार केला तरी रामदासांच्या राजकीय जाणिवा त्यातून स्पष्ट होतात. तेव्हा रामदासांचा राजकारणाशी संबंध नव्हता, असे टीकाकारांना म्हणता येत नाही आणि तरीही ते तसे म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे.
समर्थांच्या सूचनांनुसार महंतांनी संप्रदायाचे काम करीत असताना त्यांना आजूबाजूला घडणार्या घटनांवर लक्ष ठेवावे लागे. समर्थांचे हजारो शिष्य देशात संचार करीत असत. देशाच्या अंतर्गत भागात फिरताना ‘भिक्षा मिसे लहान थोर। परिक्षूनी सोडावे।’ हा नियम सर्व महंत पाळत. त्यानुसार मिळणार्या बातम्या स्वामींकडे चाफळला पोहोचवल्या जात. त्यापैकी राजकीय महत्त्वाच्या बातम्या शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था समर्थ स्वत: करीत असत. छत्रपती शिवाजी महाराज जे धर्मकार्य उभे करीत होते, त्याला केवळ शाब्दिक पाठिंबा स्वामी देत होते, असे नव्हे तर त्यासाठी समर्थांचा सक्रिय पाठिंबा होता. कारण ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे त्यांचेच उद्गार आहेत. रामदासांनी उभारलेल्या मठांमध्ये रामोपासनेबरोबर राजकारण हेही तितकेच महत्त्वाचे होते. जेथे मुसलमानांचे प्राबल्य होते, अशा ठिकाणी मठ स्थापन करुन समर्थांनी राजकीय चाणाक्षपणा दाखविला आहे. स्वामींचे जे बैरागी मुसलमानी मुलखात फिरत, त्यांनी तेथील बित्तंबातमी शिवाजीराजांना पुरवावी, अशी समर्थांची अपेक्षा असे. यासाठी ‘अखंड सावधानता’ आणि ‘धूर्तपणा’ यांची शिकवण महंतांना दिलेली असे. अफजलखान विजापूरहून निघाला आहे, ही बातमी सांगणारे सांकेतिक भाषेतील कल्याणस्वामींच्या लिखावटीत असलेले पत्र उपलब्ध आहे.
विवेक करावे कार्यसाधन।
जाणार हे नरतनू जाणोन।
पुढील भविष्यार्थी मन।
रहाटोच नये॥१॥
चालो नये असन्मार्गी।
सत्यता बाणल्या अंगी।
रघुवीरकृपा ते प्रसंगी।
दासमाहात्म्य वाढवी॥२॥
रजनीनाथ आणि दिनकर।
नित्यनेमे करिती संचार।
घालिताती येरझार।
लाविले भ्रमण जगदीशे॥३॥
आदिमाया मूळभवानी।
हेचि जगाची स्वामिनी।
एकांती विवंचना करोनी।
इष्ट योजना करावी ॥४॥
या पत्रातील पहिल्या तीन कडव्यातील व शेवटच्या कडव्यातील पहिल्या ओळीतील आद्याक्षरे क्रमवार ‘विजापूरचा सरदार निघाला आहे’ असा स्पष्ट संदेश देतात. ही त्यावेळी गुप्त बातम्या पोहोचवण्याची सांकेतिक पद्धत असावी. ‘उदंड राजकारण करावे। परी गुप्तरुपे‘ असे समर्थांनी सांगून ठेवले आहे. वरील पत्राच्या शेवटी ‘इष्ट योजना करावी’ हा गुप्त संदेश शिवरायांना पाठवला आहे, तशी ‘योजना’ करुन शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा प्रश्न कसा सोडवला, हे सर्वांना माहीत आहेच.
- सुरेश जाखडी