मुंबई (अक्षय मांडवकर) - 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर' (आययूसीएन) या संस्थेने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातील एकूण १३ मत्स्यप्रजातींची नोंद 'अति संकटग्रस्त' (Critically Endangered) प्रजातींमध्ये करण्यात आली आहे. या मत्स्यप्रजाती पूर्वी 'संकटग्रस्त' प्रजातींमध्ये मोडत होत्या. अतिमासेमारी आणि मत्स्यपरांच्या तस्करीमुळे या प्रजाती धोक्यात आल्याचे मत सागरी जीवशास्त्रज्ञांनी मांडले आहे.
गेल्या आठवड्यात 'आययूसीएन' संस्थेने आपली सागरी जीवांसंदर्भातील लाल यादी अद्यावत केली. त्यानुसार भारतातील शार्क (मुशी), पाकट (स्टिंग रे), वेड्जे फिश, करवत मासा (साॅ फिश), आणि गिटार फिश (लांजा) या कुळातील एकूण १९ प्रजातींचा समावेश 'अति संकटग्रस्त' प्रजातींमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच या प्रजाती आता जगातून नष्ट होण्यापासून केवळ एक पायरी मागे आहेत. 'आययूसीएन'ने 'अति संकटग्रस्त' प्रजातींमध्ये समाविष्ट केलेल्या भारतातील १९ प्रजातींपैकी १३ प्रजाती या महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातही आढळत असल्याची माहिती 'आययूसीएन'च्या 'शार्क स्पेशालिस्ट ग्रुप'चे सदस्य आणि 'झूलाॅजिकल सर्वे आॅफ इंडिया'चे (झेडएसआय) शास्त्रज्ञ डाॅ. बिनेश के.के यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
'झेडएसआय'चे शास्त्रज्ञ हे डाॅ. बिनेश यांच्या नेतुत्वाअंतर्गत देशातील शार्क आणि स्टींग रे प्रजातीच्या मासेमारीवर अभ्यास करत आहेत. भारतात या कुळातील माशांची मांस, मत्स्यपर (फीन) आणि तेलासाठी मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्यामुळे त्यांची नोंद 'संकटग्रस्त' प्रजातींमधून 'अति संकटग्रस्त' प्रजातींमध्ये झाल्याचे डाॅ. बिनेश यांनी सांगितले. भारताच्या सागरी परिक्षेत्रात शार्क (मुशी), पाकट (स्टिंग रे) आणि गिटार फिश कुळातील एकूण १७० प्रजाती सापडतात.
वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'अंतर्गत (मॅंग्रोव्ह सेल) 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान शार्क, पाकट (स्टिंग रे) आणि गिटार फिश प्रजातींच्या मासेमारीचा अभ्यास केला होता. या अभ्यासामधून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर 'आययूसीएन'चे संरक्षण लाभलेल्या शार्क, पाकट (स्टिंग रे) आणि गिटार फिश प्रजातींचे मत्स्यपर (फिन) आणि मत्स्यपिल्लांची बेसुमार मासेमारी सुरूच असल्याची माहिती समोर आली होती. 'आययूसीएन'मध्ये संरक्षित असलेल्या १८ प्रजाती खास करुन हॅमरहेड शार्क, टायगर शार्क, ब्लॅक टीप शार्क, स्पाॅट टेल शार्क, स्मूथनाॅझ वेड्जे फिश, स्पाॅटेड इगल रे, ब्लू स्पाॅटेड स्टींग रे आणि स्पेडनाॅझ शार्क प्रजातींची मत्स्यपिल्ले राज्यातील बंदरांवर 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या जीवशास्त्रज्ञ धनश्री बागडे यांना आढळून आली होती. तसेच 'आययूसीएन'च्या यादीतील स्पेडनाॅझ शार्क, बूल शार्क, ब्राॅडफिन शार्क, टायगर शार्क, ब्लॅक टीप शार्क, मिल्क डाॅक शार्क आणि ब्लिकरस् व्हिपरे या प्रजातींचे मत्स्यपर सातपाटी आणि काही मालवणच्या बंदरावर सापडले होते.
मॅंग्रोव्ह फाऊंडेशनने अभ्यासलेल्या प्रजातींपैकी चार ते पाच प्रजातींचा समावेश अति संकटग्रस्त प्रजातींमध्ये झाला आहे. या नोंदीचा वापर धोरणात्मक निर्णयांसाठी होणे आवश्यक असून ही माहिती मच्छिमारांपर्यंत पोहोचणेही गरजेची आहे. - धनश्री बगाडे, सागरी जीवशास्त्रज्ञ, मॅंग्रोव्ह फाऊंडेशन
महाराष्ट्रातील १३ 'अति संकटग्रस्त' प्रजाती
अर्ॅबिक व्हीपरे, व्हाईट-स्पाॅटेड गिटारफीश, बोमाऊथ गिटारफीश, लाँगकॉम्ब सॉफिश, ओशन व्हाईट-टीप शार्क, स्कॅलोपेड हॅमरहेड, ग्रेट हॅमरहेड नॅरोटूट साॅफिश, स्मूथनाॅज वेड्जे फिश, जायन्टा गिटारफिश, शार्पनाॅज गिटारफिश, व्हाईडनाॅज गिटारफिश, काॅमन शाॅव्हेलनाॅज रे