सुरळीत वाहतुकीसाठी रिंग रोड व मेट्रो

22 Dec 2020 20:31:18

Mumbai Metro Ring Road_1&
 
 
 
एमएमआरडीएकडून २०३० पर्यंत प्रवास सोईच्या व हितकारक वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. (अ) सर्व बाजूस सोईस्कर असा चक्राकार रस्ता वाहतूक सिग्नलविरहित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (ब) मेट्रो प्रकल्पही सर्वकडे राबविले जात आहेत. (क) इतर महत्त्वाचे मार्ग नियोजनात आहेत.
 
 
मुंबई महानगर प्रदेशात (MMR) अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे अनेक वर्षे विशेषत: २०१४ सालापासून वाहतूक प्रकल्पांचे खोलवर नियोजन सुरू असून, काही कामे पूर्ण झाली आहेत, काही सुरू आहेत, तर काही प्राथमिक नियोजनात आहेत. ‘एमएमआर’चे भौगोलिक क्षेत्रफळ ६ हजार ३३५ चौ. किमी आहे व हे महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्राच्या फक्त २.१ टक्के आहे. या क्षेत्रात नऊ महत्त्वाच्या महानगरपालिका वा नगरपालिका वसलेल्या आहेत आणि या प्रदेशातील एकूण स्थानिक फलोत्पत्ती (GDP) महाराष्ट्राच्या एकूण ‘जीडीपी’च्या ३६ टक्के आहे. बृहन्मुंबईचे क्षेत्र ‘एमएमआर’च्या १०.५ टक्के आहे. परंतु, सध्याच्या स्थितीवरून हा महानगर प्रदेश आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या बृहन्मुंबईसारख्या सांपत्तिक केंद्राला (Financial hub) रस्त्याने वा रेल्वेने चांगल्या प्रकारच्या पद्धतीने जोडला गेलेला नाही. अनेक ठिकाणी पोहोचण्याकरिता प्रवासी बसने, उपनगरी रेल्वेने प्रवास करावा लागतो. या कारणाने बस वा रेल्वेवर हल्ली फार मोठा बोजा पडतो. परंतु, हा प्रवास यापुढे झगडणाऱ्या स्थितीत न राहता, तो रिंग रोडसारख्या रस्त्याने व मेट्रो रेल्वेने २०३० सालापर्यंत जोडला जाऊन सुखाचा बनणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या संस्थेकडून २०३० पर्यंत प्रवास सोईच्या व हितकारक वाहतुकीचे नियोजन केले जात आहे.
(अ) सर्व बाजूस सोईस्कर असा चक्राकार रस्ता वाहतूक सिग्नलविरहित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
(ब) मेट्रो प्रकल्पही सर्वकडे राबविले जात आहेत.
(क) इतर महत्त्वाचे मार्ग नियोजनात आहेत.
 
मुंबईच्या बाहेरून सुमारे सात लाख प्रवासी रोज सकाळ-संध्याकाळ कामानिमित्त प्रवास करत आहेत. यातून ‘एमएमआर’ हे जगातील सहावे मोठे महानगर म्हणून ओळखले जाणार आहे.
 
अ. चक्राकार रस्ते व पुलांची माहिती
 
१. मुंबई-पार बंदर जोड रस्ता (MTHL) - मुंबईतील शिवडीहून नवी मुंबईतील चिर्ल्यापर्यंत २२ किमी लांबीचा व रु. १७ हजार ८४३ कोटी खर्चाचा सागरी सेतू पूल बांधला जात आहे. हे काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरे होत आहे.
 
२. वसई ते अलिबाग १२८ किमी लांबीचा व ४० हजार कोटी किमतीचा १६ मार्गिकांचा बहु-उद्देशीय मार्ग तयार होणार आहे. या मार्गाचे काम यापुढे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) बघणार आहे. जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. हे काम संपण्याची तारीख अजून ठरविली गेली नाही.
 
३. शिवडी ते वरळी ४.५ किमी उन्नत मार्गाचे व रु. १ हजार २७६ कोटी खर्चाचे काम लवकरच सुरू होणार आहे व २०२३ सालापर्यंत ते पुरे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
४. वरळी ते वांद्रे ५.६ किमी लांब सागर सेतू पुलाचे व रु. १ हजार ६३० कोटी खर्चाचे काम काही वर्षांपूर्वी पुरे झाले आहे व हा सेतू पूल सध्या वापरात आहे.
 
५. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू पुलाचे १७.७ किमी लांब व रु. ७ हजार ५०२ कोटी खर्चाचे काम सुरू आहे. हे काम २०२३ सालापर्यंत पुरे होण्याची शक्यता आहे.
 
६. वसई ते मीरा-भाईंदर पाच किमी लांबीच्या पुलाचे व रु. १ हजार ५०१ कोटी खर्चाचे काम नियोजनात आहे. हे काम सप्टेंबर २०२४ पर्यंत पुरे करण्याचे योजले आहे.
 
७. वर्सोवा ते विरार दुसरा सागर सेतू पूल नियोजनात आहे. हे काम ‘एमएमआरडीए’कडून केले जाणार आहे. या कामात ५७ किमी लांबीच्या सागरी सेतूकरिता रु. ३ हजार २०० कोटी खर्च येणार आहे. वसई, उत्तन व चारकोप येथे जोडरस्ते ठेवले जाणार आहेत.
 
ब. ‘एमएमआर’मधील बहुतेक सर्व वस्त्यामध्ये विखुरलेले मेट्रोचे प्रकल्प
 
१. मार्ग ४ - वडाळा ते कासारवडवली ३२.३ किमी लांब उन्नत व रु. १४ हजार ५४९ कोटी खर्चाचे काम सुरू आहे. हे काम २०२२ सालात पुरे होण्याची शक्यता आहे.
 
२. मार्ग ४ अ - कासारवडवली ते गायमुख २.७ किमी लांब उन्नत व रु. ९४९ कोटी खर्चाचे काम सध्या सुरू आहे. हे काम २०२२ सालात पुरे होण्याची शक्यता आहे.
 
३. मार्ग ५ - ठाणे-भिवंडी-कल्याण २४.९ किमी लांब उन्नत व रु. ८ हजार ४१७ कोटी खर्चाचे काम सध्या सुरू आहे. हे काम २०२४ सालात पुरे होण्याची शक्यता आहे.
 
४. मार्ग ९ - दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर १३.५ किमी लांब उन्नत व रु. ६ हजार ६०७ कोटी खर्चाचे काम सुरू आहे. हे काम २०२४ सालात पुरे होण्याची शक्यता आहे.
 
५. मार्ग १० - गायमुख ते शिवाजी चौक ९.२ किमी लांब उन्नत व रु. ४ हजार ४७६ कोटी खर्चाचे काम नियोजनात आहे. हे काम २०२४ सालात पुरे करण्याचे नियोजन आहे.
 
६. मार्ग १२ - कल्याण ते तळोजा २०.७ किमी लांब उन्नत व रु. ५ हजार ८६५ कोटी खर्चाचे काम नियोजनात आहे. हे काम २०२४ सालात पुरे करण्याचे नियोजन आहे.
 
७. मार्ग १३ - शिवाजी चौक ते विरार २३ किमी लांब उन्नत व रु. ६ हजार ९०० कोटी खर्चाचे काम नियोजनात आहे. हे काम २०२४ सालात पुरे करण्याचे नियोजन आहे.
 
८. मार्ग १४ - कांजुरमार्ग ते बदलापूर ४५ किमी लांब उन्नत व रु. १३ हजार ५०० कोटी खर्चाचे काम नियोजनात आहे. हे काम २०२६ सालापर्यंत पुरे करण्याचे नियोजन आहे.
 
क. जीएमएलआर, एससीएलआर, महामार्ग (प.) रस्त्यांची कामे
 
१. गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (GMLR) - १३.७ किमी रु. ३ हजार ८०० कोटी एकूण खर्च - पूर्व व पश्चिम उपनगरे परस्परांना जोडून वाहतुकीवरील ताण हलका करण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प हाती घेतला. अडथळा ठरलेली महावितरणाची उच्च दाबाची ओव्हरहेड वाहिनी भूमिगत करण्यासाठी रु. ३.४४ कोटी खर्च पालिका वीज कंपनीला देणार आहे. फिल्म सिटीमधून बोगदा काढला जाणार आहे, तसेच नाहूर रेल्वे स्थानकानजिकचा उड्डाणपूल विस्तारकामे व पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
 
२. सांताक्रुझ-चेंबुर सिग्नलविरहित जोडरस्ता (SCLR) - या कामाच्या विस्तार कामासाठी कापडिया नगर ते कुर्ल्याजवळ सीएसएमटी रोड व पश्चिम महामार्गालगतची वाकोला येथील कामे खर्च रु. १०९ कोटी. ही कामे काही अडचणींमुळे दोन वर्षे लांबणार आहेत व २०२२ मध्ये पुरे होण्याची शक्यता आहे.
 
३. महामार्ग प. सिग्नलविरहित करण्यासाठी सुधारणा कामे -
 
भाग १ - दिंडोशी जोड ते मिलन बोगदा जोड -पर्जन्य जलवाहिनीची कामे, पदपथ व इतर कामे. रु. २९.३७ कोटी खर्च.
 
भाग २ - मिलन बोगदा जोड ते माहिम - पर्जन्य जलवाहिनीची कामे, पदपथ व इतर कामे रु. २०.७० कोटी खर्च.
 
भाग ३ - माहिम ते शंकरवाडी - वाहन रस्त्यात सुधारणा कामे, जोडलेल्या रस्त्यावर सिग्नलविरहित करण्यासाठी स्लिप रस्ते, सर्विस रस्ता बिट्युमेन वापरून सुधारणा करणे. रु. २५.२४ कोटी खर्च.
 
भाग ४ - शंकरवाडी ते दहिसर नाका - वाहन रस्त्याकरिता सुधारणा कामे, जोडलेल्या रस्त्यावर सिग्नलविरहित करण्यासाठी स्लिप रस्ते, सर्विस रोड बिट्युमेन वापरून सुधारणा करणे. रु २८.११ कोटी.
 
 
एकूण सुमारे रु. २०० कोटी खर्चाची कामे
 
 
४. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी, मलबार हिलमधील बोगद्यांसह सागरी मार्ग सुमारे ९.९८ किमी लांब व रु. १२ हजार ७२१ कोटी खर्चाचे काम मुंबई पालिकेकडून सुरू आहे. समुद्रात भराव घालणे, याविरुद्ध मच्छीमारांच्या तक्रारी आहेत. पर्यावरण र्‍हासाच्याही तज्ज्ञांकडून तक्रारी येत आहेत. तसेच प्रवाळ समूहही दुसरीकडे हलवावे लागत आहेत. खारफुटी व वृक्ष तोडावे लागत आहेत.
 
५. उर्वरित रस्त्यांची व मेट्रोची कामे वापरात, बांधकामात वा नियोजनात आहेत.
 
या रस्त्यांच्या व मेट्रोच्या कामातले अडथळे पालिका, ‘एमएसआरडीसी’ व ‘एमएमआरडीए’ दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून २०३० सालापर्यंत ‘एमएमआर’ची वाहतूक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करू या. तथापि, या संस्थांनी पर्यावरण र्‍हास होऊ देऊ नये व योग्य ती खबरदारी घेणे जरुरी आहे.
 
Powered By Sangraha 9.0