नाशिक येथील निसर्गोपासक नवनाथ ढगे हे मागील १५ वर्षांपासून सापांच्या जीविताचे रक्षण होण्याकामी कार्यरत आहेत, त्यांच्या या सर्परक्षण कार्याविषयीचा आढावा...
समाजात वावरत असताना आपल्याला अनेक सर्पमित्र पाहावयास मिळत असतात. सर्पमित्र हे जरी सर्वसामान्य दिसले, ते अगदी सहज असले, तरी त्यांचे काम मात्र अतिशय जोखमीचे आणि आव्हानात्मक असेच आहे. नाशिक येथील सामनगावरोड येथे वास्तव्यास असणारे नवनाथ दगा ढगे हे सर्वच सर्पमित्रांचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण नक्कीच पाहू शकतो. आपण सापांचे मित्र होऊ शकतो. मात्र, साप आपले कधीही मित्र होऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्पमित्रपेक्षा ‘सर्परक्षक’ म्हणून ओळखले जाणे जास्त संयुक्तिक असल्याचे ढगे आवर्जून नमूद करतात. लहानपणापासून ढगे यांना सापांबद्दल विलक्षण आकर्षण होते. नदीच्या कड्याकपारीत अडकलेले साप हात घालून बाहेर काढणे हे त्यांचे खेळण्याचे साधन असे. नंतर त्यांना विविध दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या माहितीपटाच्या माध्यमातून साप व त्याचे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ढगे यांनी सापांबद्दल शास्त्रीय माहितीचे अध्ययन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साप पकडणे व त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, हे कार्य हाती घेतले. मागील १५ वर्षांच्या काळात ढगे यांनी हजारो सापांना जीवदान देत त्यांचे रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. निसर्ग हा मानवजातीसाठी अत्यावश्यक असून, निसर्गाची हानी होणे हे एक प्रकारे मानवावरील संकटांचे कारण आहे, अशी भूमिका ढगे मांडतात. निसर्गातील पशू, पक्षी, प्राणी हे महत्त्वाचे असून, प्रत्येक घटक हा पर्यावरणीय समतोल राखण्याकामी महत्त्वाचा असल्याचे ढगे यांचे मत आहे.
साप हा अधिवासातील महत्त्वाचा घटक असून त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी सर्परक्षकाच्या भूमिकेतून ढगे सापांचे जीव वाचविणे, नागरिकांना सापाबद्दल शास्त्रीय आणि खरी माहिती देत त्यांच्या मनातील सापांबद्दलची भीती दूर करणे यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जेव्हा कधी साप हे लोकवस्तीमध्ये आढळून येतात, तेव्हा त्यांना मारणे हा एकमेव उपाय नागरिक अवलंबिताना दिसून येतात. अशा वेळी सापांचे महत्त्व नागरिकांना सांगून त्यांचे प्रबोधन करण्याचे काम ढगे करत आहेत. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे अतिविषारी साप असून, त्यांचे प्रमाण इतर जातीतील सापांपेक्षा केवळ दोन टक्के आहे. इतर सर्व साप हे बिनविषारी असून, केवळ अज्ञान आणि भीतीपोटी या सापांना आपला जीव गमवावा लागत आहे. शेतकर्यांचे धान्य नष्ट करणाऱ्या उंदरांचा फडशा साप पाडत असल्याने ते शेतकर्यांसाठी उपयुक्त आहेत. याची जाणीव कृषिमूलक असलेल्या नाशिक जिल्ह्यात शेतकर्यांना ढगे करून देत आहेत. ढगे यांच्या या कार्याची फलश्रुती झाल्याचे दिसून येत असून, दिवसाकाठी दोन ते तीन ठिकाणी ढगे हे सर्परक्षणकामी जात आहेत, तसेच नागरिकही आता साप मारण्यापेक्षा सर्परक्षकास पाचारण करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहेत.
आधी नमूद केल्याप्रमाणे साप पकडणे हे जीवावर बेतणारे काम आहेच. मात्र, सर्वच सर्परक्षकांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत असतो. साप पकडण्याचे कोणतेही मूल्य कोणताही सर्परक्षक आकारत नाही. तो त्यांचा व्यवसाय नसून ती केवळ निसर्गाची उपासना आहे, असेच ढगे यांच्यासह सर्वच सर्परक्षक मानतात. तसेच शासन दरबारी सर्परक्षक ही व्याख्याच नसल्याचे ढगे सांगतात. त्यामुळे शासनाचा कोणताही आधार या सर्परक्षकांना नाही. त्यांना साधे ओळखपत्रही नाही. सर्प पकडण्याचे काम करताना जीव गेल्यास कोणताही विमा नाही. एक प्रकारे सर्वच सर्परक्षक हे शासनाचा आधार नसल्याने सरकारीदृष्ट्या निराधार आहेत. वनखाते, पोलीस ही शासनाची महत्त्वाची अंगे जोखमीच्या प्रसंगी सर्परक्षकांना पाचारण करतात. मात्र, शासन या कामाची कोणतीही दखल घेत नसल्याची खंत ढगे व्यक्त करतात. नाशिक शहरात सर्पोद्यान असणे आवश्यक असून, ते अजूनही साकारले गेले नसल्याचे ढगे सांगतात.
जगभर रोगराई पसरण्याचे कारण पशू-पक्ष्यांच्या निधनानंतर त्यांचे योग्यप्रकारे विघटन होत नाही. त्यामुळे त्यांच्या मृत शरीरातून विषाणू पसरून रोगराई पसरत असते. यावर उपाय म्हणून ढगे यांनी गोमाता व निसर्गरक्षक बहु-उद्देशीय संस्था स्थापली आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक महानगरक्षेत्रात कोणताही प्राणी मृत झाल्यास संस्थेच्या माध्यमातून त्यास मनपा शवदाहिनीत अंत्यविधी करण्यात येणार आहे. ढगे यांचे बालपण रानावनातच गेले. लहानपणापासून प्राणी, वृक्ष यांची साथसंगत ढगे यांना प्राप्त झाली. त्यामुळे ढगे यांच्या जीवनात प्राणिप्रेम ओतप्रोत भरले गेले. त्यातूनच त्यांनी आयुष्यभर पशू-पक्षी यांची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले. आजारी, जखमी पक्ष्यांवर उपचार होण्याकामी आपल्या भागात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्याचा ढगे यांचा मानस आहे, तसेच ते गोशाळाही सुरू करणार आहेत. साप पकडणे हे एक विलक्षण कार्य असून, अनंत अडचणींचा सामना करत ढगे यांच्यासह इतर सर्वच सर्परक्षक निसर्गोपासना करत आहेत. त्या सर्वांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!