आयुर्वेदात स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य, आरोग्य टिकविणे व आजारी रूग्णाचा रोग बरा करणे या दोन्हींसाठी उपाययोजना सांगितली आहे. केवळ औषध स्वरूपात हे उपाय नसून जीवनशैलीत बदल करणे, आहार हा उत्तम आणि पौष्टिक घेणे, व्यायाम करणे, मनोबल वाढविणे व टिकवणे इ. गोष्टींचाही विचार केला गेला आहे. स्वास्थ्य टिकवण्यासाठी तसेच रोग लवकर बरा होण्यासाठी शरीराची व्याधिक्षमता उत्तम असणे गरजेचे आहे. तेव्हा, व्याधिक्षमतेबद्दल शास्त्रात काय सांगितले आहे, ते आज जाणून घेऊया.
'कोविड-१९’ची साथ जगभरात येऊन एक वर्ष पूर्ण झाले. जगभरातील विविध देशांतून त्याचे भयानक रूपही समोर आले. या काळात काही लाखांच्या घरात जीवितहानीदेखील झाली. त्याचा आता दुसरा भाग म्हणजेच कोरोनाची दुसरी लाट काही देशांमध्ये आली आहे. अशा वेळेस जेव्हा या ‘कोविड’वर कुठलीही लस, प्रतिबंधात्मक उपाय व पूर्ण औषधोपचार चिकित्सात्मक उपाय उपलब्ध नाहीत. शत-प्रतिशत तोडगा नाही. तेव्हा अन्य औषधीचिकित्सा व उपाय लक्ष वेधून घेत आहेत. भारतामध्ये आयुर्वेदाच्या उपचारांचा कोरोनाविरोधी लढ्यात चांगला उपयोग होताना आढळून येतो.
आयुर्वेदात स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य, आरोग्य टिकविणे व आजारी रूग्णाचा रोग बरा करणे या दोन्हींसाठी उपाययोजना सांगितली आहे. केवळ औषध स्वरूपात हे उपाय नसून जीवनशैलीत बदल करणे, आहार हा उत्तम आणि पौष्टिक घेणे, व्यायाम करणे, मनोबल वाढविणे व टिकवणे इ. गोष्टींचाही विचार केला गेला आहे. स्वास्थ्य टिकवण्यासाठी तसेच रोग लवकर बरा होण्यासाठी शरीराची व्याधिक्षमता उत्तम असणे गरजेचे आहे. तेव्हा, व्याधिक्षमतेबद्दल शास्त्रात काय सांगितले आहे, ते आज जाणून घेऊया.
शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. जीवाणू-विषाणूशी लढा देण्यासाठी व्याधिक्षमता उत्तम ठेवावी लागते. व्याधिक्षमतेबद्दल आयुर्वेदात खालीलप्रमाणे विवेचन केलेले आहे.
व्याधिक्षमत्वं नाम व्याधिबल
विरोधित्वम् व्याध्युत्पादक
प्रतिबंधकत्वम् इति यावत्।
व्याधि क्षमत्वाचे २ प्रकार आहेत. व्याधिबलविरोधी आणि व्याधिप्रतिबंधात्मक
व्याधिबल विरोधी
या प्रकारची शक्ती रोग झाल्यानंतर त्याला आटोक्यात आणण्यासाठी उपयोगी ठरते. रोग झाल्यावर त्याची तीव्रता (लक्षणांची तीव्रता) कमी करणे व त्याचे Episodes (Frequency) कमी करणे या दोन प्रकारे ती कार्य करते.
व्याधिप्रतिबंधात्मक
रोग होऊ नये म्हणून शरीराची जी धडपड असते, जी रोगप्रतिकारक्षमता असते, त्याला व्याधिप्रतिबंधात्मक क्षमता म्हटले जाते. म्हणजे काय, तर आधी रोग होऊ नये म्हणून शरीर प्रयत्न करते आणि जर रोग झालाच, तर त्याच्या लक्षणांची तीव्रता कालमर्यादा व दुष्परिणाम कमीत कमी ठेवण्याचे प्रयत्न करणे अशा दोन्ही पद्धतींची शरीर रचना असते. आपण दैनंदिन जीवनात बघतो की, काही व्यक्ती वारंवार आजारी पडतात, तर काहींना कुठलाच त्रास, आजार होत नाही आणि जर कधी झालाच, तर विश्रांती घेऊन आटोक्यात येतो. भरमसाठ औषधोपचारांची गरज भासत नाही. कोरोनोग्रस्त व्यक्तींमध्ये असे दिसून येते की, घरातील चार व्यक्तींपैकी दोन-तीन व्यक्तींना कोरोनाची लागण होतेआणि त्याच परिवारातील एकत्र राहणाऱ्यांपैकी एखादी व्यक्ती ‘कोरोना-निगेटिव्ह’ राहते. तसेच ज्यांच्यात लागण होते, त्यातील प्रत्येक व्यक्तींमध्ये आढळणारी लक्षणे आणि त्यांची तीव्रता हीदेखील भिन्न असते. (कमी-मध्यम-उच्च लक्षणे) काही व्यक्तींमध्ये लक्षणेच निर्माण होत नाहीत (Asymptomatic) म्हणजे काय तर, जरी शरीरात रोगाचे जीवाणू-विषाणू प्रवेशित झाले, तरी शरीरातील प्रतिकार करणारी संस्था किती सक्षम आहे, त्यावर त्याची लक्षणे व लक्षणांनुसार औषधोपचार अवलंबून आहेत.
व्याधिप्रतिकार क्षमता ही कशी वाढवावी आणि टिकवावी हेदेखील आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. ही मुख्यत्वे करुन तीन प्रकारची क्षमता असते. सहज, कालज आणि युक्तिकृत. सहज व्याधिक्षमता म्हणजे Innate/ Inbuilt Immunity हा व्याधिक्षमतेचा प्रकार. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात, जन्मजात असतो. (by default) कालज व्याधिक्षमता ही वयसापेक्ष व ऋतुसापेक्ष बदलत असते. म्हणजे वार्धक्य आणि बाल्यावस्थेपेक्षा तारुण्यात व्याधिक्षमता (Comparatively) उत्तम असते. (प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात) तसेच पावसाळ्यापेक्षा आणि उन्हाळ्यापेक्षा थंडीत मनुष्याची व्याधिक्षमता अधिक उत्तम असते. थंडीमध्ये त्यामुळे विशिष्ट संस्थांचे जसे- श्वसनसंस्था इ.चे आजार वगळता, अन्य आजारांचे प्रमाण कमी असते. युक्तिकृत व्याधिक्षमतेमध्ये व्याधिप्रतिबंधात्मक क्षमता आणि व्याधिप्रतिकारक्षमता वाढविणे शक्य आहे. यासाठी आयुर्वेदात काही उपाययोजना सांगितल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे-
सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठण्यापासून ते दुसऱ्या दिवशी उठेपर्यंतच्या काळात काय काय करावे. (म्हणजेच दिनचर्या व रात्रचर्येचे पालन करणे) (ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी दीड तास) उठल्यापासून झोपेपर्यंतचे नियम यांचा समावेश या दिनचर्येत होतो. यामध्ये शौचशुद्धी, दंतधावन, कवल-गणूष(चुळा भरणे आणि Gargle करणे), नस्य, स्नानविधी, व्यायाम इ. बद्दल विस्तृत माहिती दिली आहे. जसे कोणी करावे, कोणी टाळावे, कुठल्या ऋतूत अधिक व्यायाम करावा, आहार कधी घ्यावा, त्याचे प्रमाण व क्रम कसा असावा इ. याचे कारण म्हणजे शरीरातील प्रत्येक परमाणू उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्रातून जातो. शरीराची झीज होते आणि ती भरूनही येते. हे सर्व कार्य अविरत सुरू असते. जुन्या मृतपेशीचा शरीरांतून निचरा होऊन नवीन उत्तमप्रतिच्या पेशींची निर्मिती करणे हे सर्व आहारीय घटकांवर अवलंबून असते. त्यासाठी पोषक आहार तर घ्यावाच, पण तो नीट पचविण्यासाठी शारीरिक हालचाल, व्यायाम आणि मानसिकरीत्या समाधानी असणे महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या हालचालींमुळे शरीराचे रक्ताभिसरण व पोषण/ऊर्जा याच कर्मांमध्ये वापरली जाते. Wear and Tear भरुन काढण्याचे कार्य हे रात्री झोपल्यावर शरीर करते, पण हे नीट होण्यासाठी जेवलेले अन्न पोटातून पचून पुढे गेलेले असणे अपेक्षित आहे. आयुर्वेदशास्त्रात म्हणूनच जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये दोन-अडीच तासांचे अंतर असावे, असे सांगितले आहे. (सूर्यास्ताला जेवून रात्री १०-१०.३०ला निजणे हे उत्तम) जेवढ्या पेशी उत्तम दर्जाच्या निर्माण होतील, तेवढेच श्रेष्ठ त्यांचे कार्य ते करु शकतील आणि मनुष्याचे स्वास्थ्य व दीर्घायुष्य अबाधित राहू शकेल.
आयुर्वेदात काही रसायन, औषधे सांगितली आहेत. यांच्या वापराने शरीरातील विविध धातुघटक पेशी इ.ची दर्जा उत्तमरीत्या सुधारता येतो. गुणवत्ता सुधारते. सध्याच्या कोरोनाच्या काळात शारीरिक हालचाली,व्यायाम बहुतांशी कमी झालेले आहे. मानसिक ताण बऱ्याच जणांना जाणवतो, मनात अनामिक भीती वाटत असते, अशा वेळेस सकस, पोषक अन्नही शरीराला खूप फायदेशीर ठरत नाही. अशा वेळेस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही रसायने, औषधे, काही पंचकर्म करुन घ्यावीत. रसायन औषधातील एक औषध, जे आजच्या घडीला व ऋतूला फायदेशीर ठरु शकते, ते म्हणजे च्यवनप्राश होय. पण, ते कसे खायचे, कोणी खायचे इ. बद्दल आपण पुढील लेखात जाणून घेऊया. (क्रमश:)