कोणत्याही भूमिकेत आपल्या दमदार आवाजाने आणि अस्खलित वाणीतील शब्दफेकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘नटसम्राट’ म्हणजेच प्रभाकर पणशीकर...
'तो मी नव्हेच’ हे आचार्य अत्रे लिखित नाटक जेव्हा ‘नाट्यनिकेतन’ संस्थेतर्फे करायचे ठरले, तेव्हा नाटकातील प्रमुख भूमिका करणारा नट हा संस्थेतला असावा म्हणजे तो आपल्या आवाक्यात राहील, अशा धोरणी भूमिकेतून ही भूमिका या नाट्यनिकेतन संस्थेतील कलावंताने करावी, असा रांगणेकरांनी हट्ट धरला. आचार्य अत्रेंना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. पण, रांगणेकरांच्या हट्टापुढे अत्रेंचे काही चालले नाही आणि ती भूमिका या कलावंताच्या नशिबी मिळाली. नंतर मात्र ‘तो मी नव्हेच’ मधला खलनायकी ’लखोबा लोखंडे’ या कलाकाराने असा काही रंगवला की, ’लखोबा लोखंडे’ आणि या कलावंताचे घट्ट नातेच बनले. या कलाकाराशिवाय ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा विचार करणे, त्या काळीही कोणाला शक्य झाले नाही आणि आजही होत नाही. ‘तो मी नव्हेच’चा फिरता रंगमंच हीसुद्धा याच कलाकाराची कल्पना. कितीतरी भूमिका या कलाकाराने आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. गेली अनेक दशके त्यांनी रंगभूमीची इमाने-इतबारे सेवा केली. घरच्यांचा विरोध पत्करून ते या क्षेत्रात उतरले होते. ‘हा तोंडाला रंग फासून घरच्यांच्या तोंडाला काळं फासतो’ असा घरच्यांनी आरोप करूनही त्यांचे चित्त विचलीत झाले नाही. असे ’तो मी नव्हेच’मधील खलनायक ’लखोबा लोखंडे’ असो, ’इथे ओशाळला मृत्यू’ मधील ‘शहेनशहा औरंगजेब’ असो किंवा ’अश्रूंची झाली फुले’ मधील ’प्रा. विद्यानंद’ असो, कोणत्याही भूमिकेत आपल्या दमदार आवाजाने आणि अस्खलित वाणीतील शब्दफेकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ’नटसम्राट’ म्हणजेच प्रभाकर पणशीकर ऊर्फ पंत.
मराठी सोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. काही मराठी चित्रपट, काही मराठी मालिका यांसोबतच इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांड पंडित होते. लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. वेदशास्त्रसंपन्न घराण्यात जन्माला आलेल्या पंतांनी नाटक या ’पंचम वेदा’ची आराधना करून रंगभूमीची सेवा तर केलीच, पण त्याचबरोबरीने रसिकांना गेली अनेक वर्षे अपार आनंद दिला. नाटकातून कायम ’तो मी नव्हेच’ असे म्हणणार्या प्रभाकरपंतांनी आपला नाट्यप्रवास ’तोच मी’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केला आहे.चतुर्वेदी दशग्रंथी विष्णुशास्त्री पणशीकर यांच्या घरामध्ये १४ मार्च, १९३१ रोजी प्रभाकर पणशीकर यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केले खरे, पण महाविद्यालयात जाण्याचा योग काही आलाच नाही. शाळेत असतानाच नाटकाचे वेड असलेल्या प्रभाकर यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची नाटके पाहिली. नंतर ठाकूरद्वारच्या गणपती उत्सवात ती नाटके बसविणे आणि त्यामध्ये काम करणे हा त्यांचा छंद झाला. या वेडापायी त्यांनी घर सोडले. मुंबईच्या ‘रेल्वे कल्चरल ग्रुप’तर्फे नाटक बसवत असताना एका बड्या अधिकार्याकडून त्यांना रेल्वेत नोकरी करण्याची विचारणा झाली. परंतु, नाट्यवेड्यापायी त्यांनी ती संधी नाकारली. याच काळात १३ मार्च, १९५५ रोजी ’राणीचा बाग’ नाटकात भूमिका करताना त्यांनी प्रथम चेहर्यास रंग लावला. अडचणी, विरोधांना तोंड देत आणि बेकारीचे चटके सोसत वयाच्या पंचविशीत त्यांनी मो. ग. रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ संस्थेमध्ये प्रवेश मिळविला. ’भटाला दिली ओसरी’ या नाटकातील नवकवीची भूमिका त्यांनी सफाईने आणि ताकदीने उभी करून आपण भविष्यातील उत्तम नट आहोत, याचीच ग्वाही दिली.
पणशीकरांनी रांगणेकरांच्या ’भूमिकन्या सीता’, ’पठ्ठे बापूराव’, ’कुलवधू’, ’वहिनी’, ’माझे घर’,’खडाष्टक’ या नाटकांमध्येही भूमिका केल्या. रांगणेकरांनी प्रभाकर यांना कंपनीचा व्यवस्थापक केले. निरनिराळ्या गावी फिरणे, तेथे नाटकाचे व नाट्यगृहाचे परवाने काढणे, लाऊडस्पीकरवरून जाहिरात आणि टांग्यातून हॅण्डबिले वाटणे, स्टेजची व्यवस्था, नाटकाचा सेट, रंगपट-कपडेपटाची व्यवस्था आणि प्लान तयार करणे अशा अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. रांगणेकरांनी १९६१-६२च्या काळात आचार्य अत्रे लिखित ’तो मी नव्हेच’ नाटक करण्याचे ठरविले. त्या वेळच्या चर्चेतही पंचरंगी भूमिका बाळकराम किंवा बापूराव माने यांनी करावी, असे पणशीकरांनी सुचविले. पण, ही भूमिका पणशीकरांनीच केली पाहिजे, हा आग्रह रांगणेकरांनी धरला. या नाटकाचा मुहूर्त 15 ऑगस्ट, १९६२ रोजी झाला, तेव्हा ’कोण हा पणशीकर?’ असा सूर अत्रे यांनी लावला होता. ते तालमींनादेखील कधी आले नाहीत. मात्र, ८ ऑक्टोबर रोजी दिल्लीचा प्रयोग झाला, तेव्हा पहिल्या दोन अंकांनंतरच ’गेल्या दहा हजार वर्षांत प्रभाकरसारखा अभिनेता पाहिला नाही’ अशी पावती देत अत्रेंनी त्यांची प्रशंसा केली. त्या दिवसापासून पणशीकरांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. रांगणेकरांशी मतभेद झाल्यामुळे पणशीकरांनी ’नाट्यनिकेतन’ संस्था सोडली. अत्रेंनी ’तो मी नव्हेच’ नाटक पुन्हा करण्याचे ठरविले, तेव्हा त्यांनी प्रमुख भूमिकेसाठी पणशीकरांनाच बोलावून घेतले. त्या वेळी अत्रेंनी मांडलेली फिरत्या रंगमंचाची कल्पना कोल्हापूरचे म्हादबा मिस्त्री यांच्याकडून करून घेतली आणि ’अत्रे थिएटर्स’तर्फे ’तो मी नव्हेच’चे पुन्हा धडाक्यात प्रयोग सुरू झाले. पणशीकरांनी मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर या मित्रांच्या सहकार्याने ८ एप्रिल, १९६३ रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर ’नाट्यसंपदा’ संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले यांचे ’अमृत झाले जहराचे’ आणि प्रा. वसंत कानेटकरांचे ’मोहिनी’ या दोन नवीन नाटकांची निर्मिती केली.
’नाट्यसंपदा’ संस्थेमार्फत पणशीकरांनी ’मला काही सांगायचंय’ आणि ’इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांच्या निर्मितीद्वारे पाय रोवले. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि ’नाट्यसंपदा’ची उंची वाढली. ’तो मी नव्हेच’चे सर्व हक्क १९७० पासून ’नाट्यसंपदा’ने घेतले आणि या नाटकाचे दोन हजारांहून अधिक प्रयोग पणशीकरांनी केले. ’तो मी नव्हेच’चे कानडी रूपांतर झाले. त्यामध्येही पंतांनी पंचरंगी भूमिका साकारली. नव्या पिढीतील कलाकारांनी या भूमिकेचे आव्हान पेलावे, असे आवाहन ते सातत्याने करीत होते. डॉ. गिरीश ओक यांनी ही भूमिका नव्याने साकारली तेव्हा त्यांचे कौतुक करण्यात पणशीकर आघाडीवर होते. ’इथे ओशाळला मृत्यू’मधील औरंगजेब साकारताना ते नमाज पढायला शिकले. या नाटकात औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेला मिळालेली दाद ही पणशीकरांच्या अभिनयकौशल्याला होती. ’अश्रूंची झाली फुले’ नाटकामध्ये पणशीकर यांनी साकारलेले प्रा. विद्यानंद आणि आधी डॉ. काशिनाथ घाणेकर व नंतरच्या टप्प्यात रमेश भाटकर यांनी साकारलेला ’लाल्या’ ही अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. या नाटकाच्या गुजराती भाषेतील प्रयोगातदेखील त्यांनी भूमिका साकारताना जणू आपण जन्माने गुजराती आहोत असेच सिद्ध केले. ’जिथे गवतास भाले फुटतात’, ’थँक यू मि. ग्लाड’, ’मला काही सांगायचंय’, ’बेइमान’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. हृदयविकाराच्या झटक्यानंतरही प्रकृतीची पर्वा न करता त्या काळात त्यांनी कानडी भाषा अवगत केली.
पंतांना धोतर आणि टोप्या जमविण्याचा छंद, कपडे आणि सेंटचा शौक होता. खरेतर त्यांना गाण्याची आवड होती. ’तो मी नव्हेच’ नाटकातील राधेश्याम महाराजांच्या भूमिकेत गायलेला अभंग आणि ’लग्नाची बेडी’तील त्यांच्या गाण्याला अनेक प्रयोगांमध्ये वन्स मोअर मिळाला आहे. उत्तम गायक होण्याची मनीषा त्यांनी मुलगा रघुनंदन पणशीकर याच्या माध्यमातून पूर्ण केली. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद 1984 आणि 1985 अशी सलग दोन वर्षे भूषविण्याचा बहुमान पणशीकरांना लाभला. 50 वर्षे रंगभूमीची सेवा करणार्या पणशीकर यांचा महाराष्ट्र शासनाने ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरव केला. त्यानंतरच्या वर्षीपासून हा पुरस्कार प्रभाकर पणशीकर ‘जीवनगौरव पुरस्कार’ म्हणून प्रदान केला जाईल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती. महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेत अजरामर झालेल्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचा प्रयोग नागपुरात रंगला होता. रंगमंचावर काशीनाथ घाणेकर (संभाजी महाराज) आणि प्रभाकर पणशीकर (औरंगजेब) यांची जुगलबंदी रंगली होती. संवादागणिक प्रभाकरपंतांचा आवेश वाढत गेला आणि प्रसंगाच्या शेवटी त्यांनी अचानक ‘निकल जाओ यहां से’ अस म्हणण्याऐवजी ‘गेट आउट’ असे वाक्य उच्चारले... त्या रात्री पंतांना क्षणभरही झोप लागली नाही. रघुनंदन पणशीकर यांनी ही आठवण नागपूरच्या कार्यक्रमात सांगितली. प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. प्रभाकर पणशीकरांचे रंगभूमीला मिळालेले योगदान, चेहर्यावरची रंगरंगोटी उतरली की साधा माणूस म्हणून वावरण्याची त्यांची सवय, त्यांना लाभलेली विलक्षण स्मरणशक्ती, असे पंतांचे विविध पैलू सांगता येतील. ‘रंगमंचावर अनेकदा चुका होतात. नागपूरच्या प्रयोगातही बाबांकडून ती चूक झाली, पण त्यानंतर त्यांना रात्रभर झोप लागली नाही. त्या प्रयोगाचा ऑडिओ टेप तयार केला जाणार होता. एका तंत्रज्ञाने त्यांना विचारले, “तेवढा संवाद काढून त्या ऐवजी दुसरा रेकॉर्ड करूयात.” तेव्हा पंतांनी ‘नाही’ म्हणून सांगितले. ‘चूक झाली ती तशीच राहायला हवी,’ असा त्यांचा आग्रह होता. नुसताच अभिनेता म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही प्रभाकरपंत किती प्रगल्भ होते, याचा प्रत्यय या घटनेवरून येतो, असे रघुनंदन पणशीकर यांनी सांगितले. पंतांची स्मरणशक्ती अफाट होती. त्यांना तारीख, वार आणि वर्षासह घटना लक्षात राहायच्या.
त्यांचा नम्र, हसतमुख स्वभाव आणि हजरजबाबीपणा. भूतकाळातील कोणतीही घटना ते इतक्या तपशिलवार सांगत होते की जणू त्या घटना कालपरवाच घडल्या असाव्यात. बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे अशी पंतांची ख्याती आहे. जवळजवळ ५० वर्षे नाटकांच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आहे. याशिवाय बेळगाव, दिल्ली, इंदौर, धारवाड येथे खेड्यापाड्यांतूनही पंतांनी नाटकांकरिता भ्रमंती केली आहे. या सर्व ठिकाणांची ते तपशिलवार माहिती पुरवू शकतात. तिथे कसं जायचं, तेथील राहण्या-जेवण्याची व्यवस्था याशिवाय आयत्यावेळी स्टेजवर उभा राहण्याकरिता कलाकार कुठून मिळेल याचीही ते इत्थंभूत माहिती देतात. वसंत कानेटकरांचं ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक त्यांनी संभाजीला न्याय मिळावा याकरिता लिहिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते रंगभूमीवर उभं राहिलं, तेव्हा मात्र नाटकाचा पूर्ण प्रकाशझोत औरंगजेबाच्या भूमिकेतील पंतांवर स्थिरावला. संभाजीपेक्षाही त्या नाटकात औरंगजेब प्रभावी ठरू लागला. औरंगजेबाची भूमिका करताना त्या भूमिकेचा प्रत्येक पैलू समजून घेऊन तो लोकांसमोर यावा, याकरिता पंतांनी अथक प्रयत्न केला होता. ज्या काळी नाटकांचे दौरे करणं आजच्याइतकी सुखाची बाब नव्हती, तेव्हापासून आतापर्यंत पंतांनी ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे तब्बल १,१११ प्रयोग केले आहेत. प्रा. विद्यानंद याची मानसिक द्विधावस्था खूप चांगल्या प्रकारे सादर केली होती. तसेच ‘कट्यार काळजात घुसली’च्या निमित्ताने संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन हेही पंतांचं रंगभूमीला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन. मराठी नाट्यसृष्टीत भरीव कार्य करणार्या या नटवर्याने १३ जानेवारी, २०११ रोजी जगाचा निरोप घेतला. पंत मराठी रंगभूमीवरील जाणकार हुशार अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. अशा हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा.
- आशिष निनगुरकर
9022879904