वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारे सच्चे कलाकार व चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणारे हे बहारदार अभिनेते म्हणजेच रवि पटवर्धन...
आपला भारदस्त आवाज व नैसर्गिक अभिनय यामुळे ते रसिक प्रेक्षकांना खूप भावले. अनेक मराठी नाटकं, मालिका व चित्रपट सोबतच हिंदीमध्येही ‘तक्षक’, ‘तेजाब’, ‘सलाखें’, ‘अंकुश’, ‘तेजस्विनी’, ‘यशवंत’, ‘हफ्ता बंद’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘युगपुरुष’ व ‘चमत्कार’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
गावचा पाटील, प्रेमळ व कडक शिस्तीचा बाप, बेरकी राजकारणी, खडूस सासरा, पोलीस अधिकारी, वकील आदींच्या भूमिकेत त्यांनी जीव ओतून काम केले होते, म्हणूनच सध्याची त्यांची ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील बबड्याच्या आजोबांची भूमिकाही खूप गाजली होती. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील, अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या, तरी त्यांनी नाटकांमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणारे हे बहारदार अभिनेते म्हणजेच रवि पटवर्धन...
रवि पटवर्धन यांचा जन्म दि. ६ सप्टेंबर, १९३७ रोजी झाला. मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर रवि पटवर्धन यांनी छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटविला. पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी २०० हून अधिक चित्रपट केले आहेत. रवि पटवर्धन यांनी ‘आरण्यक’ हे नाटक पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२व्या वर्षीही ते या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.
वयपरत्वे येणार्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरविलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवि पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवि पटवर्धन पहिले आले. रवि पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
१९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो. म. पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’ हे नाटक सादर झाले. त्यात पटवर्धन होते. रिझर्व्ह बँकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची त्यांनी लेखक पारखी यांच्याकडे परवानगी मागितली, त्यांनी ती दिली आणि हा प्रयोग झाला. यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता. पण, काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान, नुकताच या नाटकाचा प्रयोग केला असल्याने “तुम्ही आमच्या नाट्यसंस्थेतर्फे प्रयोग सादर कराल का,” अशी विचारणा पगार यांनी केल्यावर बँकेचाच कलाकार संच घेऊन पटवर्धनांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले.
रवि पटवर्धन या नाटकात ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका करत होते. यशवंत पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’ या व्यावसायिक नाटकातही रवि पटवर्धन यांनी काम केले. १९७० मध्ये ‘नाट्यनिकेतन’च्या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आणि मो. ग. रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत शांता जोग होत्या. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवि पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेन्री’ करायचे. या नाटकानंतर वि. वा. शिरवाडकर यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या.
रवि पटवर्धन यांनी विजया मेहता यांनी बसविलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकात ‘अमात्य राक्षस’, जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात ‘पोलीस अधिकारी’ या भूमिका केल्या. ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’, ‘तुघलक’, ‘अपराध मीच केला’ आदी नाटके केली. १९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ नाटकात रवि पटवर्धन यांना काम मिळाले. त्यांना या नाटकामुळे नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, मा. दत्ताराम, दाजी भाटवडेकर, दुर्गा खोटे या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले. दूरदर्शनवरच्या ‘आमची माती, आमची माणसं’ या कार्यक्रमात ‘गप्पागोष्टी’ नावाचा एक २२ मिनिटांचा उपकार्यक्रम असे. ‘गप्पागोष्टीं’मध्ये रवि पटवर्धन ‘वस्ताद पाटील’ असत.
शिवाजी फुलसुंदर हे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. मनोरंजनाबरोबरच शेतकर्यांचे प्रबोधन होईल, असा हा ‘गप्पागोष्टी’ नामक कार्यक्रम होता. पटवर्धनांचा रेडिओसाठी प्रायोजित कार्यक्रम करणारा एक चमू होता. त्यातले मानसिंग पवार हे माया गुजर, राजा मयेकर, वसंत खरे, जयंत ओक, पांडुरंग कुलकर्णी आणि रवि पटवर्धनांना घेऊन गप्पागोष्टी सादर करीत. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की ‘बीबीसी’ या जगविख्यात वृत्तवाहिनीकडूनही त्याची दखल घेतली गेली. १०० भाग प्रसारित झाल्यानंतर तो कार्यक्रम थांबविला. हा कार्यक्रम ‘वन शॉट, वन टेक’ व्हायचा. चित्रीकरणापूर्वी थोडा वेळ तालीम करून थेट सादरीकरण व्हायचे.
रवि पटवर्धन एक रांगडा माणूस म्हणूनच शोभले. त्यांना त्यामुळे भूमिकादेखील तशाच मिळाल्या. अनेक चित्रपटांत, नाटकांत, आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यात काही खलनायकी भूमिकादेखील होत्या. मला त्यांचा अभिनय आवडायचा, सहज असा केलेला तो अभिनय असायचा, आणि मुख्य म्हणजे, त्यांची डायलॉग बोलण्याची पद्धत मला आवडायची. त्यात कुठे आक्रस्ताळेपणा नव्हता. ‘महाभारत’ आपल्या सर्वांना माहिती आहे. पण, त्या युद्धानंतरच्या धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या मनःस्थितीवर आधारित ‘आरण्यक’ नाटक सर्वांनी बघितले असेल की नाही, याची शंका आहे. त्यात अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे ते नाटक आलं, तेव्हादेखील धृतराष्ट्राची भूमिका केलेले आणि नंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षीदेखील धृतराष्ट्र साकारणार्या या अभिनेत्याची मेहनत बघण्यासारखी आहे.
शेवटी शेवटी त्यांना चालताना शरीराला कंप व्हायचा, या गोष्टीचा त्यांनी ‘आरण्यक’मध्ये भूमिका प्रभावी व्हावी म्हणून वापर करून घेतला आहे. शारीरिक व्याधींचा एखाद्या भूमिकेसाठी अशा वयात वापर करणारा दुसरा अभिनेता माझ्या पाहण्यात नाही. मला पुस्तक, कादंबरी वाचताना त्यातील पात्रांच्या जागी वेगवेगळ्या व्यक्तींना ‘कास्ट’ करून तो प्रसंग एखाद्या मूव्हीसारखा बघण्याची सवय आहे. अनेक वेळा असं होतं, एखादं पात्र करणारी व्यक्ती कालांतराने बदलते. पण, माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी वाचलेल्या ‘छावा’ या कादंबरीतील हंबीरराव मात्र तेच राहिले, रवि पटवर्धन!
सन १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात रवि पटवर्धन यांनी वयाच्या साडेसहा वर्षांच्या वयात भूमिका साकारली होती. बालगंधर्व हे या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे काम केले. चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणार्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आपल्यातून गेला. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो; रवि पटवर्धन यांनी प्रत्येक लहान -मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला.
असा चतुरस्र कलाकार आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली. वयाची ८० वर्षे पार करूनही त्यांनी अविरत काम केले. रवि पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनाच्या तिन्ही क्षेत्रांतील मोठे नुकसान झालेले आहे. एकाच साच्याच्या भूमिका न करता, त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. अष्टपैलू अभिनेते रवि पटवर्धन यांचे ६ डिसेंबर २०२० रोजी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. अशा हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा...
- आशिष निनगुरकर