पाक-चीन्यांचे भिकार खेळ!

10 Dec 2020 12:33:24

1 _2  H x W: 0


( हा फोटो १४ एप्रिल २०१९ रोजीचा आहे. संबंधित मुलीचे जबरदस्तीने लग्न केले आहे. तिला आता घरातून काढून टाकले. अशा प्रकारे अनेक मुली अत्याचाराचा बळी ठरत आहेत.) 
 
 
 
कधी काश्मीर तर कथित प्रकरणांतील मुस्लिमांवरील अत्याचार यावरून उपदेशाचे डोस देणार्‍या पाकिस्तानची खोड आता अमेरिकेनेच मोडली ते बरे झाले. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ मुद्द्यावरून भारताला घेरणार्‍या इस्लामिक राष्ट्रांनी पाक-चीनमध्ये सुरू असलेली मोगलाई उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे कष्ट घ्यावेत...
 
 
 
 
झाले असे की, पाकिस्तानात सुरू असलेल्या अल्पसंख्याकांवरील अन्यायाबद्दल तर न बोललेलेच बरे. मात्र, आता त्याला साथ देणारा खुद्द चीन असल्याने या प्रकाराची व्याप्ती केवढी मोठी असू शकते याची कल्पना येईल. अमेरिकेच्या एका राजदूताच्या आरोपांवरून पाकिस्तानी हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय मुलींना चीनमध्ये दासी बनवून हिणवण्याचा प्रकार अमेरिकेचे राजदूत सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी उघड केला आहे. ते अमेरिकेचे प्रशासकीय स्वतंत्र विभागाचे बडे अधिकारी आहेत.
नया पाकिस्तानाच्या बढाया मारणार्‍या इमरान खान सरकारच्या कार्यकाळात सुरू असलेले हिंदू व शीख समुदायावरील अत्याचार यापूर्वीच उघड करण्यात आले. मंदिरांवर होणारे हल्ले असो वा जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतर असो या सगळ्याचा बुरखा भारताने वेळोवेळी टराटरा फाडला आहे.
 
 
हिंदू, शीख, बौद्ध यांच्या वंशसंहाराच्या सुरू असलेल्या कारवायांवरून संयुक्त राष्ट्रालाही आरसा भारतातर्फेच दाखवण्यात आला होता. शेतकरी आंदोलनावरून काही विदेशी शक्ती, तर काही राष्ट्रांनीही भारताविरोधात भूमिका घेतली. अर्थात, देश म्हणून सरकार म्हणून शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तत्पर आहे आणि खंबीरही आहे. मात्र, जशी भूमिका शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत घेतली तशीच भूमिका हिंदूंच्या धर्मांतराबद्दल का नाही. केवळ लोकशाही मानणार्‍या भारतासारख्या देशाला हे उपदेशाचे डोस का पाजले जातात? पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, सीमेपलीकडून दहशतवाद पोसण्यासाठी घातले जाणारे खतपाणी, त्यांना पुरवली जाणारी आर्थिक रसद याकडे डोळेझाक करणे आणि मौन बाळगणे संयुक्त राष्ट्राला, उदारमतवाद्यांना जमत आले आहे.
 
 
पाकिस्तानात अल्पसंख्याक मुलींना त्यांच्या इच्छेविरोधात चिनी मुलांशी लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. लग्न झाल्यावर चीनमध्ये त्यांना आजन्म दासी म्हणून राहावे लागते. पाकिस्तानातील अल्पसंख्याक मुलींची ‘मार्केटिंग’ही अशीच केली जात आहे. पाकिस्तानातून हिंदू मुलगी घेऊन या आणि चीनमध्ये तिला दासी बनवा, असा अघोषित कार्यक्रमच चीन-पाकिस्तानने आखला आहे. आधीच पाकिस्तानातील अल्पसंख्याकांशी केला जाणारा भेदभाव संताप आणणारा आहे आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक मुलींची नोकर म्हणून मार्केटिंग करताना नवा पाकिस्तान म्हणवणार्‍यांना शरमही वाटत नाही. इथे अल्पसंख्याकांशी केला जाणारा भेदभाव हा घृणास्पद आहे. त्याला कारणीभूत कोण हे वेगळे सांगण्याची गरज राहत नाही. या सगळ्या गोष्टींना बळजबरीने धर्मांतरणाला बळी पडणारेही काही सुखी नाहीत. इतर धर्मात जाऊन लग्न केल्यानंतरही जाच थांबणारा नसतोच. त्यामुळे आयुष्य अंधार्‍या कोठडीतलेच आहे हे ठरलेलेच.
 
 
 

1 _1  H x W: 0  

( हा फोटो मे २०१९ या वर्षी पाकिस्तानातील एका पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांच्या मते, पाकिस्तानातील गरीब कुटूंब पैशाच्या प्रलोभनांना भुलून चीनी नागरिकांशी त्यांचे विवाह करून देतात. अशी लग्न किती काळ टीकतात याबद्दलही शंका आहे.) 
 
 
 
अमेरिकेने अशा दहा देशांची यादीच जाहीर केली. ज्यात धार्मिक स्वातंत्र्य हिरावणार्‍या चीनचाही सामावेश आहे. उघुर मुस्लिमांवरील अन्यायाचा मुद्दा आणि आता लग्नासाठी मुली मिळवून त्यांना आयुष्यभर आपली दासी बनवण्याचा कट अमेरिकेने उघड केला आहे. ‘एक दाम्पत्य एक मूल’ या धोरणानुसार, चीनमध्ये आता लग्नाच्या वयात आलेल्या मुली शोधणं नवविवाहितांना कठीण जात आहे. चिन्यांची ही अडचण सोडवण्यासाठी आता त्यांचे कंगाल मित्र असलेले पाकिस्तान राष्ट्र पुढे आले. पद्धतशीरपणे अशा मुलींच्या स्थळांची मार्केटिंग कशी करावी हे त्यांना वेगळे सांगायला नको आणि अन्याय-अत्याचार कसे करावेत यात चिन्यांचा हात कुणी धरायला नको. यात भरडल्या जाणार्‍या मुलींच्या आयुष्याच्या खेळखंडोबावरही गप्पच बसणार का? अजूनही ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ काय? हे झापडं लावून बसणार्‍या आणि भारतालाच जाब विचारणार्‍यांना हिंदू अल्पसंख्याकांचा आक्रोश कानावर जाईल का? हा मोठा प्रश्न आहे.

 
 
Powered By Sangraha 9.0