उद्यमशील योद्धा

10 Dec 2020 14:19:24

Pradip Peshkar _2 &n
 
 
 
 
उद्योजकांना अडचणीच्या काळात मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या ठायी होती. मदतीची तीव्र आसक्ती आणि दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याची मनी असणारी तळमळ ही पेशकार यांना या काळात स्वस्थ बसू देईना. पेशकार यांनी ‘लॉकडाऊन’ काळात नागरिकांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांचे दु:ख हलके करण्याचा यथोचित प्रयत्न या काळात केला.
 
 
 
 
नाव : प्रदीप पेशकार
राजकीय पक्ष : भाजप
पद : प्रदेशाध्यक्ष, उद्योग आघाडी, भाजप
 
 
 
व्यक्तीच्या मनातील निरपेक्ष भाव जागृत असला की, त्याच्या स्वभावात सहृदयता निर्माण होत असते. निरपेक्ष भावनेने केलेले कार्य हे चिरस्थायी टिकणारे आणि दूरगामी परिणाम साधणारे असते. कोरोनाकाळात जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’काळात उद्योगक्षेत्र हे थंडावले होते. त्यामुळे कामगारवर्गासह औद्योगिक संघटनादेखील काही काळ कार्यमुक्त असल्याचे दिसून आले. केवळ उद्योगक्षेत्राला गतिमान करणे, हेच आपले ध्येय नसून उद्योगक्षेत्रातील व समाजातील इतर नागरिकदेखील आपले आहेत, ही भावना मनी ठेवून प्रदीप पेशकार यांनी मदतकार्य हाती घेतले.
 
 
 
अंगभूत असणारे प्रशासकीय कौशल्य, नेमक्या समस्येची असणारी जाणीव, समस्या निराकरण करण्याकामी आवश्यक त्या उपाययोजनांची असणारी माहिती, दांडगा जनसंपर्क आणि व्यक्तिमत्त्वातील विश्वासार्हता यामुळे पेशकार यांच्या मदतीचा अश्वमेध या काळात सर्वत्र पोहोचला. पेशकार यांनी ‘श्वास फाऊंडेशन’च्या मागील दोन वर्षांत केलेल्या कार्यामुळे दत्तधाम आश्रमचे दत्तदास महाराज, ‘इस्कॉन’ संस्था आदींच्या सहकार्यामुळेच मदतकार्य करण्याची सुरुवात करता आली. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ काळात त्यांनी २५ लाख भोजनथाळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना शिजविलेल्या अन्नाचे वाटप केले. तसेच, तांदूळ, डाळ, भाजीपाला, गव्हाचे पीठ आदी कोरड्या शिध्याचे वाटप करत, सुमारे साडेचार हजार नागरिकांच्या घरातील चूल पेटती राहण्यास मदत केली. याकामी ‘श्वास फाऊंडेशन’चे प्रकल्पप्रमुख मकरंद वाघ यांचे पूर्णवेळ नियोजन हे या कार्याचे वैशिष्ट्य ठरले.
 
तसेच, याकाळात अनेकांच्या घरातील कर्त्यापुरुषांचे रोजगार थांबले होते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण अनेकांना भासत होती. मात्र, नागरिकांच्या स्वाभिमानाला धक्का न पोहोचविता, त्यांना आर्थिक पर्याय उपलब्ध व्हावा, याकरिता ज्यांच्या पतींचे व्यवसाय अथवा रोजगार हे बंद आहेत, अशा ४० महिलांना त्यांनी मास्क शिवण्याचे कंत्राट देऊ केले. या महिलांना १०० मास्कच्या बदल्यात २०० ते २५० रुपये देण्यात येत असत. त्यामुळे या कुटुंबांना किमान किराणा माल खरेदी करून त्यांचे जीवनमान सुसह्य पद्धतीने जगणे सहज शक्य झाले.
 
आपले रहिवासीक्षेत्र असलेल्या नाशिक पश्चिम भागातील सेवावस्त्या, स्वारबाबानगर, चुंचाळे परिसर, प्रबुद्धनगर, पाथर्डीफाटा परिसर, कामटवाडे परिसर आदी भागात पेशकार यांनी मदत करत तेथील नागरिकांच्या चेहर्‍यावर हसू फुलविण्यात मोलाची भूमिका बजाविली. नाशिकमध्ये याकाळात बिहार, उत्तरप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश आदी राज्यातील कामगार हे मोठ्या संख्येने अडकून होते. या कामगारांच्या संबंधित राज्य सरकारमार्फत या कामगारांची यादी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होत होती. उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांच्यामार्फत या कामगारांची यादी प्राप्त होत असे. त्या कामगारांना पेशकार यांनी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांच्यासमवेत कार्य करत मदत केली.
 
 

Pradip Peshkar _1 &n

 
 
"राजकारणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर विराजमान झाले तरी कायम कार्यकर्ता असावे. नागरिकांचे दु:ख हे आपले दु:ख व त्यांचे सुख हेच आपले सुख मानून प्रजाहितदक्ष असावे. आपल्यातील माणूस कायम जागृत ठेवत मानवधर्माची प्रामाणिकपणे जोपासना करावी."
 
 
पेशकार यांना याकामी विजय पाळेकर, संजय दंडगव्हाळ, अरुण निकम, विश्वास पवार, पंकज पवार, दत्तू वाळे आदी कार्यकर्त्यांची मोलाची मदत झाली. विविध कंपन्यांनी या मदतकार्यासाठी पेशकार यांना हातभार लावला, तसेच उद्योग आघाडीचे आजवरचे उद्योगस्नेही कार्य हेदेखील उद्योजकांपुढे असल्याने त्यांची साथ लाभत गेली. या मदतकार्याकामी पेशकार यांचा ३० लाखांच्या आसपास निधी खर्ची झाला. मदतकार्य करण्यात खंड पडू नये, यासाठी आपल्याला व आपल्या कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण होणार नाही याचे मोठे आव्हान या काळात पेशकार यांच्यापुढे होते. तसेच, खरा लाभार्थी शोधणे व त्यांना मदत करणे, हेच मोठे आव्हान असल्याचे पेशकार सांगतात. यासाठी योग्य ती खबरदारी व सुयोग्य नियोजन यावर पेशकार यांनी भर दिला.
 
 
सरकारी पातळीवर उत्तम सहकार्य लाभल्याचे पेशकार सांगतात. मात्र, सरकार दरबारी कर्मचारी कमी असल्याने आपत्ती काळात याची मोठी जाणीव होते, असेही ते सांगतात. तसेच जे अन्नधान्य सरकारने उपलब्ध करून देणे आवश्यक होते. ते सरकारी गोदामात असूनही मदतकर्त्यांना विकत घ्यावे लागले याची खंतदेखील पेशकार व्यक्त करतात. पेशकार यांना या मदतकार्यात पत्नी अश्विनी पेशकार, मुलगी आसावरी यांची मोलाची साथ लाभली.
 
 
भाजप पक्षपातळीवर सिडको मंडल १ व २ चे अध्यक्ष अनुक्रमे शिवाजी बरके व अविनाश पाटील, सातपूर मंडलचे अध्यक्ष अमोल इघे आदी कार्यकर्त्यांची साथ लाभली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रा.स्व.संघाचे विभाग कार्यवाह प्रमोद कुलकर्णी, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, मा. शहर संघचालक विजयराव कदम, विभाग सदस्य संजयराव कुलकर्णी, जनकल्याण समितीचे अनिल चांदवडकर आदींचे मार्गदर्शन व मदत पेशकार यांना प्राप्त झाली. पेशकार यांनी जनसेवा बँकेसमवेत टायअप करत ‘१२ बलुतेदार कर्ज योजना’ कार्यान्वित केली आहे. ज्या माध्यमातून मात्र नऊ टक्के व्याजदरात ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. ‘लॉकडाऊन’काळात रोजगार बंद पडलेल्या हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय पूर्ववत सुरू करणे शक्य होणार आहे.
 
मदतकार्य करत असताना अनेक भावनिक प्रसंग पेशकार यांनी अनुभवले. त्यात एक मुलगा हा त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्याकामी प्रयत्न करत होता. मात्र, त्यावेळी खाटा उपलब्ध नसल्याने त्याला अनंत अडचणी येत होत्या. त्या मुलाने पेशकार यांना हकीकत सांगितल्यावर त्यांनीही प्रयत्न केले. मध्यरात्री जिल्हाधिकारी यांना हकीकत सांगत पेशकार यांनी त्या महिलेस वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली व त्या महिला या कोरोनामुक्त झाल्या. हा प्रसंग अश्रू आणि हसू अशा दोन्ही भावना एकाच वेळी जागृत करणारा असल्याचे पेशकार सांगतात.
 
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पेशकार सांगतात, तसेच आपण मदत करण्यात कमी पडलो असल्याची भावना ते व्यक्त करतात. मदतकार्यात केवळ भाजप व रा.स्व.संघाचे कार्यकर्ते दिसून आल्याची प्रतिक्रिया नागरिक देत असल्याचेही ते सांगतात. उद्यमशीलता अंगी बाळगत उद्योगक्षेत्रातील व्यक्तीने परिघाबाहेर जात केलेली मदत ही नक्कीच नागरिकस्नेही अशीच होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Powered By Sangraha 9.0