भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत सर्वच कार्यकर्त्यांना मदतीची दिशा दाखविणे, मदतकार्य करणे, ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या नात्याने सर्व रिकाम्या जागा भरण्याचे काम नाशिक शहरात पार पडले. त्यासाठी अग्रभागी होते ते भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे. तेव्हा, कोरोनाकाळातील गिरीश पालवे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरामध्ये केलेल्या एकूणच मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
कोविड योद्ध्याचे नाव : गिरीश पालवे
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
जबाबदरीचे पद : शहर अध्यक्ष, भाजप, नाशिक
‘परिवेशाशी समायोजन साधण्याच्या व्यक्तीच्या मानसभौतिक यंत्रणेच्या गतिशील संघटनेस व्यक्तिमत्त्व म्हणतात.’ व्यक्तिमत्त्वाची मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशी व्याख्या केली जाते. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ काळात परिवेशाशी समायोजन साधण्याची प्रत्येक व्यक्तीला नितांत आवश्यकता होती. तरच, मदतीचे संघटन गतिशील होणे शक्य होते. तसेच, चहुबाजूला असणारी स्थिती व परिस्थिती यांचे आकलन करून आपले मानसिक खच्चीकरण न होऊ देण्याचेदेखील आव्हान या काळात नेतृत्व करणार्या नेत्यांपुढे होते.
या सर्व गुणांचा मिलाफ साधत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत सर्वच कार्यकर्त्यांना मदतीची दिशा दाखविणे, मदतकार्य करणे, ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या नात्याने सर्व रिकाम्या जागा भरण्याचे काम नाशिक शहरात पार पडले. त्यासाठी अग्रभागी होते ते भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे.
पालवे यांनी गरजू नागरिकांना डाळ, गहू, तांदूळ, भाजीपाला आदी कोरडा शिध्याचे वाटप करत त्यांच्या घरातील चूल विझू दिली नाही. तसेच, शिजवलेल्या अन्नाचे वाटप करत त्यांनी सुमारे ५०० पेक्षा जास्त कुटुंबांची क्षुधातृप्ती या काळात केली. त्यात विशेष करून परप्रांतीय नागरिक, सेवावस्तीमध्ये वास्तव्यास असणारे नागरिक यांच्या कुटुंबाचा समावेश होता.
नाशिक येथील कालिका मंदिराच्या मागील परिसर, पोलीस प्रशिक्षण अकादमी समोरील वस्त्या, राजदूत हॉटेल परिसर, मायको सर्कल, वेद मंदिर परिसर, ट्रक टर्मिनल्स आदी भागांत अन्नवाटपाचे कार्य पालवे यांच्यामार्फत करण्यात आले. पाच किलो भाजीपाल्याच्या पिशव्यांचे वाटप करत त्यांनी अनेकांना या काळात मदतीचा हात देऊ केला. मदतीचे हे कार्य करण्यासाठी प्रशांत जाधव, संतोष नेरे, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, अमोल इघे देवदत्त जोशी, पवन भगुरकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी पालवे यांचे साहाय्यकारी कर म्हणून पुढे आले. नारीहर्ष फाऊंडेशन, भाजपचे नगरसेवक, गोवर्धन येथील दत्तधाम संस्था, शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी आदींचे मोलाचे सहकार्य या मदत कार्यात पालवे यांना लाभले.
मदतकार्याची दिशा उत्तम असल्यास स्थितीदेखील उत्तमच असते. त्यामुळे आर्थिक भार हा लोकसहभागातून सहज उचलला जातो. सुमारे दोन कोटी रुपयांच्या पुढे यासाठी निधी खर्ची आल्याचे पालवे सांगतात. पालवे यांचे या काळातील कामाचे वर्णन हे ‘पेपर वर्क’ ते ‘फिल्ड वर्क’ अशा सर्वच पातळीवर सुरु होते आणि आजही सुरु आहे.
‘लॉकडाऊन’ काळात कोरोना हेच एक मोठे आव्हान असल्याचे पालवे सांगतात. या काळात सर्वच नागरिक हे अडचणीत होते. त्यामुळे मदत तरी कोणाकडे मागणार, हाच मोठा प्रश्न होता. अशावेळी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला, तर नक्कीच सिंहाचा वाटा होऊ शकतो, असे आवाहन पालवे यांनी केले. त्यामुळे नागरिक व संस्था या मदतीसाठी पुढे सरसावल्या. यातूनच पालवे यांनी मदतीची लोक चळवळ सुरु केली.
भाजपचे आवाहन हे नागरिकांना विश्वासार्ह वाटले आणि आजही वाटत आहे. त्यामुळे शहर अध्यक्षांच्या शब्दाला वजन असल्याने लोकांचा सहभाग हा वाढत गेला. मात्र, सुरुवातीला मदतीसाठी कमी-जास्त प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याने पालवे यांचे मन खट्टू होत होते. अशावेळी भाजप पक्षाचा आजवरचा संघर्ष पालवे यांच्या समोर उभा ठाकत असे व त्यांना उभारी मिळत असे.
सरकारी यंत्रणेला मदत करण्याचे भाजप व पालवे यांचे सुरुवातीपासून धोरण होते. त्यातूनच त्यांनी पोलिसांना, रूग्णालयातील कर्मचारी वर्गाला जेवण, मास्क पुरविण्याचे कार्य केले. नेमकी कोणाला मदत हवी आहे, याची माहिती सरकारी यंत्रणेमार्फत प्राप्त होत असल्याचे पालवे आवर्जून सांगतात.
पालवे कुटुंबातील मंजिरी, वंदना, केतन यांनी त्यांना मोलाची साथ या काळात दिली. बातम्या वाचून घडणार्या घडमोडींबद्दल ते पालवे यांना अवगत करत असत. तसेच, मदतकार्याची माहिती जाणून घेत नागरिकांना अधिकाधिक मदत केली जावी, यासाठी हे कुटुंब आग्रही भूमिका बजावत होते.
पक्षपातळीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विजयराव पुराणिक आदी वेबिनारच्या माध्यमातून मदतीची माहिती जाणून घेत. तसेच सुयोग्य मार्गदर्शन करत आगामी दिशा व धोरण निश्चित करण्यात मार्गदर्शन करत असे.
"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घराबाहेर पडले व त्यांनी मदतकार्यात स्वतःला झोकून दिले. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री हे ‘मातोश्री’ बाहेर आले नाहीत. मदतीसाठी इच्छाशक्ती असावी लागते. भाजप हा जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे जनतेचे दु:ख भाजप जाणतो. आगामी काळातदेखील पक्ष व आम्ही कार्यकर्ते अविरत कार्यरत असणार आहोत."
तसेच, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे जातीने कायम चौकशी करत असे व परदेशस्थ भारतीयांना स्वगृही आणण्यासाठी कायम मार्गदर्शन करत असल्याचे पालवे आवर्जून नमूद करतात. नागरिकांना आपलेपणाची व मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे आपणच ते करणे आवश्यक आहे. कोणीही मदतीपासून वंचित राहता नये. हाच या काळात भाजपचा निर्धार असल्याचे पालवे नमूद करतात.
गरिबांपर्यंत अजून वैद्यकीय सुविधा पोहोचलेल्या नाहीत, त्या पोहोचणे आवश्यक आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेत असलेल्या अडचणी दूर करून नागरिकांपर्यंत दवाखाना पोहोचणे आवश्यक आहे. राज्यात आरोग्य सुविधा कमकुवत असून धान्यवितरणातदेखील सुसूत्रता येणे आवश्यक आहे. तसेच, औषध वितरणात असणारा काळाबाजार दूर करणेदेखील आवश्यक आहे. आगामी काळात याच दिशेने कार्य करणार असल्याचे पालवे नमूद करतात.
‘लॉकडाऊन’ काळात ट्रकचालक हे अडकलेले होते. रस्ते बंद असल्याने हे ट्रकचालक त्यांच्या घरीदेखील जाऊ शकत नव्हते. त्यांची ही अवस्था पाहून पालवे यांचे हृदय हेलावले होते. “भारतीय जनता पक्ष हा जर या काळात सत्तेत असता, तर आपल्या सुयोग्य नियोजनामुळे आणि कार्य करण्याच्या उमेदीमुळे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यास मोठी साहाय्यता झाली असती,” असे पालवे यांचे स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे.
भाजपने नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना त्यांचे जीवन सुसह्य व्यतीत करता यावे, यासाठी भाजपने प्रयत्न केले. लोकांचे दु:ख हलके केले. अनेकांचे अश्रू पुसले. त्यामुळे लोकांचा भाजपच्या मदतकार्यास उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला. अनेकांनी भाजपला धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोना काळात अनेकांनी मदत केली. मात्र, संघटित मदत ही सर्वसमावेशक अशीच असते. संघटित मदतीसाठी सटीक नेतृत्व आणि सुयोग्य नियोजन आवश्यक असते. त्यामुळेच दात्यांच्या मनात विश्वास निर्माण होत असतो. हेच कार्य पालवे यांनी या काळात केले. त्यामुळे भाजपच्या मदतकार्याचा परिघ विस्तारण्यास मदत झाली. समायोजित नेतृत्व लाभले तर सर्वंकष मदत करता येते, हेच पालवे यांनी सिद्ध केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.