इतरांच्या व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सेवा देण्याचे ठरविले. उद्योग छोटा असो किंवा मोठा, तिच्या आर्थिक मार्गदर्शनाचा कंपन्यांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या त्या कंपन्यांची भरभराट होत आहे. दुसर्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी ही उद्योजिका म्हणजे ‘माय अॅब’ या आर्थिक संस्थेची संचालिका निवेदिता कांबळे होय.
ज्या घरातील स्त्री आर्थिक व्यवहार पाहते, त्या घराची आर्थिकदृष्ट्या भरभराट होते. आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक महिलाच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक प्रगती साधत आहे. काही अपवाद सोडल्यास पुरुषांना बचत करणे जमत नाही, असे म्हटले जाते. किंबहुना, घरावर काही आर्थिक संकट ओढवले तर आपली आई घरातल्या कुठल्या तरी डब्यातून पैसे काढून आपल्या बाबांच्या हातावर टेकवते. त्यावेळची ती निकड दूर होते. हे चित्र अनेकांनी अनुभवलं असेल. कदाचित यामुळेच स्त्रीला ‘लक्ष्मी’ म्हटले जाते. तिनेसुद्धा इतरांच्या व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सेवा देण्याचे ठरविले. उद्योग छोटा असो किंवा मोठा, तिच्या आर्थिक मार्गदर्शनाचा कंपन्यांना फायदा होत आहे. आर्थिकदृष्ट्या त्या कंपन्यांची भरभराट होत आहे. दुसर्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी ही उद्योजिका म्हणजे ‘माय अॅब’ या आर्थिक संस्थेची संचालिका निवेदिता कांबळे होय.
मूळ बेळगावचे असणारे वसंतराव परशुराम होनखांडे आणि लिला वसंतराव होनखांडे हे दाम्पत्य सातार्याला कामानिमित्त आले. वसंतराव हे न्यायालयात ‘सुपरिटेंडेंट’ म्हणून कार्यरत होते. सरकारी नोकरीमुळे विंचवाच्या बिर्हाडासारखं त्यांना संसार पाठीवर घेऊनच फिरावं लागत असे. होनखांडे दाम्पत्यांना एकूण पाच मुलं. चार मुली आणि एक मुलगा. त्यातील सर्वात लहान मुलगी म्हणजे निवेदिता. वडिलांच्या या सरकारी नोकरीमुळे मुलांच्या शाळादेखील स्थिर नव्हत्या. सतत बदलाव्या लागायच्या. निवेदिताचं चौथीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. पाचवी ते सातवी कोरेगावच्या सरस्वती विद्यालयात झालं. आठवी ते दहावी ती सातार्याच्या कन्याशाळेत शिकली. शाळेत असताना एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती.
निवेदिताला लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तिचे आदर्श. बाबासाहेबांचं शिक्षण हिमालयाएवढं झालेलं. एवढा विद्वान, प्रकांडपंडित वंचित समाजात झालाच नव्हता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याकाळात बाबासाहेब एवढे शिकले. खिशात दमडी नसताना शिष्यवृत्तीच्या बळावर परदेशात गेले. तिथे त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या. त्यांनी मिळवलेल्या काही पदव्यांचा विक्रम तर गेली कित्येक दशके अबाधितच होता. अशीच अर्थशास्त्रातील एक पदवी त्यांनी मिळवली होती जी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या या पदवीचा विक्रम पुढे जाऊन डॉ. नरेंद्र जाधव यांनी मोडला. जवळपास १०० वर्षांनी त्यांनी तीच पदवी प्राप्त केली होती. बाबासाहेबांच्या एवढ्या भल्या मोठ्या पदव्यांचे निवेदिताला लहानपणापासूनच अप्रूप होते. आपणदेखील असंच शिकायचं. एवढ्या पदव्या मिळवायच्या हे कुठेतरी तिने निश्चित केलेलं.
पुण्याच्या हुजूरपागा महाविद्यालयातून बारावी झाल्यावर निवेदिताने पुण्याच्याच गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. साधारणत: मुली कला शाखेत प्रवेश घेतात, असा एक सर्वसाधारण अंदाज आहे. निवेदिताने मात्र वाणिज्य शाखेची निवड केली. गरवारेतून तिने बी.कॉम पूर्ण केले. पुढे बहिस्थ: शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून तिने एम. कॉम केले. त्यानंतर ‘टॅक्सेशन लॉ’मध्ये पदविका मिळवली. एवढंच नव्हे, तर ‘फायनान्स’ या विषयात एमबीएसुद्धा केले. अशाप्रकारे शिक्षण घेत असतानाच तिने काही ठिकाणी अर्धवेळ नोकरीसुद्धा केली. वाणिज्य शाखेच्या दुसर्या वर्गात असतानाच तिने एका क्रीडासाहित्याशी संबंधित कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली होती. दोन तास ती त्या कंपनीत अकाऊंट तपासण्याचे काम करायची. त्यानंतर एका चार्टर्ड अकाऊंटंटच्या फर्ममध्ये चार तास काम करायची. बी. कॉम पूर्ण झाल्यावर ती पूर्णवेळ सीए फर्ममध्ये काम करु लागली.
काही महिने तिथे काम केल्यानंतर काही संस्था या थेट निवेदितासोबत संपर्क साधू लागल्या. काहीजणांचं बजेट सीएकडे जाण्याइतपत नसायचं. त्यांना ते परवडण्यासारखं नव्हतं. ते निवेदिताला त्यांचे अकाऊंट्स हाताळण्याची विनंती करु लागले. निवेदिताने तिला जेव्हा सुट्टी असायची त्या कालावधीत ही कामे करण्यास सुरुवात केली. कोणत्याही कंपनीसाठी अकाऊंट हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा घटक असतो. एखाद्या कंपनीचं वर्तमान आणि भविष्य हे अकाऊंटवर अवलंबून असतं. अनेक उद्योजक असे आहेत जे अकाऊंटकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली कंपनी प्रगती करत आहे की, डबघाईस चालली आहे हे त्यांना कळतच नाही. परिणामस्वरुप अनेक कंपन्या बंद पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या कंपन्यांना तटस्थपणे आणि आरसा दाखविणार्या खर्या अकाऊंटंटची गरज असते. अनेक कंपन्यांसाठी निवेदिता आरशाची भूमिका बजावत होती.
‘माईंडिंग युअर अकाऊंटिंग बिझनेस’ अर्थात ‘माय अॅब’ या व्यावसायिक संस्थेची याच गरजेतून निवेदिताने स्थापना केली. एखाद्या नवीन कंपनीच्या स्थापनेपासून ते तिचं अकाऊंट सांभाळण्यापर्यंत सगळी सेवा ‘माय अॅब’ देऊ लागली. तसेच शासकीय धोरणे व शासकीय सवलती संदर्भात मार्गदर्शन करते. ‘डॉक्युमेंटेशन अकाऊंट्स’, ‘फायनान्स अॅण्ड टॅक्सेशन’, ‘कंपनी मॅनेजमेंट आणि कम्प्लायन्सेस’ आदी सेवांचादेखील यात समावेश आहे. अल्पावधीत निवेदिताने या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. पुण्यामध्ये कंपनीचं मुख्य कार्यालय तर मुंबईमध्ये ‘माय अॅब’ची शाखा सुरु झाली. ‘स्टॅण्ड अप इंडिया’साठी सिडबीकरिता मदतनीस संस्था म्हणून ‘माय अॅब’ सध्या कार्यरत आहे. ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ आणि ‘स्टॅण्ड अप इंडिया’ व इतर शासकीय धोरणे या विषयावर पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, मिरज, बारामती आदी ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिले आहेत. दरम्यान, निवेदिता ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’ अर्थात ‘डिक्की’मध्ये कार्यरत झाली. ‘डिक्की’चे मुख्यालय पुणे येथे आहे. त्याचा फायदा निवेदिताला झाला. तिने ‘डिक्की’च्या माध्यमातून वंचित उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्य सुरु केले. सध्या ती ‘डिक्की’च्या महिला विभागाची समन्वयक म्हणून कार्यरत आहे.
पुढे निवेदिताची सुजित किर्दकुडे आणि नितीन संतोश्वर या दोन युवा उद्योजकांशी ओळख झाली. सुजितची स्वत:ची ब्रॅण्ड डिझाईनची कंपनी आहे. अनेक छोट्या-मोठ्या उद्योगासाठी त्याने ब्रॅण्डिंगचे काम केलेले आहे. निवेदिता, सुजित आणि नितीन यांनी एकत्र येऊन नवीन व्यवसायाची उभारणी केली. ‘बिझबर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ असं या संस्थेचे नामकरण केले. या संस्थेअंतर्गत कंपनीच्या नोंदणीपासून ते ब्रॅण्डिंग आणि जाहिरातीपासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व काही सुविधा पुरवल्या जातात. नव उद्योजकांसाठी ही संस्था सर्वार्थाने साहाय्यभूत ठरत आहे. ही संस्था निव्वळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे निवेदिताचे स्वप्न आहे.
निवेदिता कांबळेला १८ वर्षांच्या यशस्वी उद्योजकीय वाटचालीसाठी एनएसआयसी राज्यस्तरीय उद्योजकीय परिषदेत ‘यशस्वी उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तिला गौरविले होते. महिलांना स्वयंरोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणे हा तिचा मानस आहे. एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते असं म्हटलं जातं. पण एक स्त्री जर उद्योजिका झाली, तर अन्य स्त्रियासुद्धा उद्योजिका म्हणून घडतात. पर्यायाने तो समाज उद्योगशील समाज म्हणून घडतो असं नजीकच्या काळात म्हणावं लागेल.