नवी मुंबई महानगराने साधलेल्या आजवरच्या लखलखीत विकासात मागील ३० वर्षे या शहराचे सत्ताधारी म्हणून आ. गणेश नाईक यांच्या दूरदर्शी ध्येय-धोरणांचा निर्विवाद मोठा वाटा आहे. लोकनेता तोच जो खऱ्या अर्थाने संकटकाळी जनसेवेला तत्पर असतो. आ. गणेश नाईक आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते जनसेवेसाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा, नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या कोरोना लढ्यातील योगदानाबद्दल माहिती देणारा हा लेख...
गणेश नाईक
राजकीय पक्ष : भाजप
पद : आमदार
मतदारसंघ : ऐरोली विधानसभा
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग नवी मुंबईपर्यंत पोहोचला. वेळीच या संकटाची चाहूल ओळखून गणेश नाईक यांनी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. या महामारीची भीषणता जेवढी मोठी तेवढीच मोठी मानवताही या काळात उभी राहिलेली दिसली. गणेश नाईक यांच्या माध्यमातून १२०० टन धान्यांचे वाटप नवी मुंबईतील सर्व विभागांत करण्यात आले. तीन लाख फेसमास्कचे वितरण करण्यात आले. झोपडपट्टी, गावठाण, शहरी भाग, एमआयडीसी, खासगी सोसायट्या या सर्वच भागांत सॅनिटायझिंग मशीनचे व सॅनिटायझरचे वाटप झाले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ’आर्सेेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे १११ प्रभागांत वाटप झाले. रोजंदारी कामगार, खाण कामगार, मजूर, कारागीर, निराधार, परप्रांतीय यांच्यासाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले. ‘लॉकडाऊन’च्या काळात आपल्या मूळ गावी जाण्यास निघालेल्या हजारो परप्रांतीय मजुरांना तयार अन्न, औषधे, प्रवासासाठी मदत करून त्यांना दिलासा देणारे मदतकार्य गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संकट काळात नवी मुंबईत मोठे उभे राहिले.
आ. गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना १५ एप्रिल रोजी पत्र पाठवून रेशन कार्ड हे आधार लिंक असो किंवा नसो, सर्वांना रेशनिंग पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार ज्यांचे आधार कार्ड हे रेशन कार्डबरोबर लिंक नाही, त्यांनाही रेशन दुकानांवर अन्नधान्य मिळू लागले. नवी मुंबई विभागातील एपीएमसी मार्केट व एमआयडीसी विभागातून कोरोना संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येताच, एपीएमसी तत्काळ बंद करण्याची सूचना सर्वप्रथम गणेश नाईक यांनीच दिली. त्यानंतर काही काळ एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आल्यावर नवी मुंबईतील कोरोना आकडा आटोक्यात येण्यास मदत झाली. ‘अॅन्टिजेन’ टेस्ट सेंटर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजना एपीएमसी प्रशासनाने सुरू केल्या. एमआयडीसी भागात पालिकेने ‘अॅन्टिजेन’ टेस्ट सेंटर सुरु केली. ‘कोविड-१९’च्या रूग्णांसाठी जीवरक्षक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा आवश्यक साठा करण्याच्या सूचना नाईक यांनी आरोग्य विभागाला केल्या. त्यानुसार पालिकेने आवश्यक तेवढा औषधाचा साठा करून ठेवला. खासगी रूग्णालयांतूनदेखील हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी होणारी परवड थांबली.
"अनेक वेळा कोरोना सेंटरमधून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर आम्ही कोरोना रुग्णांना सातत्याने नजरेखाली ठेवण्याची गरज व्यक्त केली. त्यानुसार कोरोना रूग्णांच्या तब्येतीची दररोज माहिती घेण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी पालिकेने कॉलसेंटर सुरू केले. उपलब्ध खाटांची माहिती मिळण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले. हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले."
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर एप्रिल २०२० पासून गणेश नाईक यांच्या जवळपास २८ पेक्षा अधिक कोरोना नियंत्रण आढावा बैठका नियमितपणे पार पडल्या. या काळात गणेश नाईक यांनी कोविड रूग्णालये आणि कोरोना सेंटरना प्रत्यक्ष भेटी दिल्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत असल्याची खात्रीदेखील त्यांनी वेळोवेळी केली. या सर्वांचा परिपाक म्हणजे नवी मुंबईत कोरोनावर प्रभावीपणे आळा घालण्यात यश आले आहे. सिडको प्रदर्शनी केंद्रात ११०० खाटांचे नवे ‘कोविड सेंटर’ उभे राहिले, बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येत वृद्धी करण्यात आली. महापालिकेकडे ४४३ आयसीयु बेड होते. त्यामध्ये आणखी २०० बेड्सची भर नाईक यांच्या सूचनेनुसार घालण्यात येत आहे.
कोरोना उपचारात जीवरक्षक असलेले ‘रेमडेसिवीर’ व इतर इंजेक्शन्सची उपलब्धता वाढली. प्रत्येक प्रभागात निर्जंतुकीकरणाच्या फेऱ्या वाढल्या. फिव्हर क्लिनिक, कोरोना चाचण्यांची केंद्रे विभागवार स्थापित करण्यात आली. रुग्णांना वेळेवर कोविड रूग्णालयात उपचारासाठी पोहोचता यावे, यासाठी विभागवार रूग्णवाहिका सुरू झाल्या. या सर्व सुविधांमुळे नागरिकांमधील कोरोनाची जागरूकता वाढली, तर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासदेखील मदत झाली. कोरोनाचे लवकर निदान होऊन रूग्णांवर लवकर उपचार झाले, तर रोग बळावण्याचा किंवा जीव जाण्याचा धोका कमी होतो. हे ओळखून गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेकडे मागणी करून दररोज एक हजार कोरोना नमुने चाचणीची क्षमता असणारी प्रयोगशाळा नेरूळ येथे स्थापित करून घेतली.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, नवीन कोरोना सेंटर उभारण्यासाठी नाईक यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ या ठिकाणी नवीन कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे, नाईक यांनी स्वत:च्या आमदार निधीतून ५० लाख रूपयांचा निधी व्हेंटिलेटर आणि कोरोना सुरक्षा साधनांची खरेदी करण्यासाठी दिला आहे. आज संपूर्ण जग आणि देश कोरोनाची लस बाजारात कधी येईल, याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांसाठी स्वखर्चाने ही लस मोफत द्यावी, अशा सूचना गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेला केल्या आहेत. आज राज्यात सर्व ‘अनलॉक’ होत असताना, महत्त्वपूर्ण व्यवहार सुरु झाले असले, तरी अद्याप शाळा-महाविद्यालये बंदच आहे. या काळात कोरोनामुळे नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबले असताना खासगी शाळांप्रमाणेच पालिका शाळांमध्येदेखील हे शिक्षण सुरू करावे. कृती पुस्तिकेच्या माध्यमातून नियमित अभ्यास घ्यावा, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्या आ. गणेश नाईक यांनी केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने पालकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. पालिकेच्यावतीने दरवर्षी शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर वितरीत करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी गणेश नाईक यांनी केली होती. त्यानुसार दिवाळीच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. शुल्कवाढीसाठी जबरदस्ती करणाऱ्या शाळांवर महापालिकेने कारवाई करावी, शाळांनी केवळ शैक्षणिक शुल्कच वसूल करावे. अन्य कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच शैक्षणिक शुल्कदेखील टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत पालकांना द्यावी, अशा सूचना नाईक यांनी केल्या. त्यानुसार पालिकेने परिपत्रक काढून अशा शाळांना केवळ शैक्षणिक शुल्कच आकारावे, अशा सूचना दिल्या.
कोरोना काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे खासगी डॉक्टर हेदेखील कोरोना योद्धे आहेत, महापालिकेने आवाहन केल्यानंतर खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले होते. नवी मुंबईतील तीन डॉक्टरांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेमार्फत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि आणि खासगी डॉक्टरांनादेखील विम्याचे सुरक्षाकवच मिळायला पाहिजे, अशी आग्रही मागणी गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.