हजारो वर्षांचा वारसा असलेली आपली भारतीय संस्कृती महान आणि तितकीच वैविध्यपूर्ण. मात्र, ब्रिटिशांच्या काळापासून तिचे पतन करण्याचे मनसुबे आक्रमणकारी शासकांनी वारंवार रचले. ‘सोने की चिडीया’ असलेल्या या देशातील संपत्ती, पुरातन वास्तू, मंदिरे वारसा स्थळांचे वैभव आक्रमकांनी लुटून नेले. मोदी सरकारच्या काळात काही ना काही कारणास्तव अशा अमूल्य वस्तूंचा ठेवा पुन्हा जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल.
इतिहास बदलला जाऊ शकत नाही. परंतु, त्या काळात झालेल्या चुकांची सुधारणा करण्यासाठी आणि पुढील पिढीला या चुकांपासून सावरण्याची संधी वर्तमानात मिळत असते. १०० वर्षे जुनी असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात परत येणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी मिळाले आहेत. वाराणसीतील मंदिरातून चोरी करण्यात आलेली ही मूर्ती सन्मानासह कॅनडा विद्यापीठातर्फे भारताला परत मिळणार आहे.
भारतातून एक मूर्तीची चोरी झाली होती. मूर्ती देवी अन्नपूर्णा देवीची होती. चोरी झाल्यानंतर ही मूर्ती कॅनेडियन विद्यापीठात पोहोचली. मात्र, भारताला ही मूर्ती परत मिळणार आहे. कॅनेडियन विद्यापीठाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला ही १०० वर्षांपूर्वीची मूर्ती मिळणार आहे. ही मूर्ती अन्नपूर्णा देवीची आहे. अन्नपूर्णा अर्थात अन्नधान्याची अधिष्ठात्री तसेच वाराणसीची राणी. मूर्तीच्या एका हातात चमचा आणि दुसर्या हातात खिरीची वाटी आहे. १०० वर्षे जुनी असलेली ही मूर्ती पूर्वी वाराणसीतून चोरी झाली होती. तिथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ रिजायना’च्या ‘मॅकेंजी आर्ट गॅलरी’मध्ये ठेवण्यात आली होती.
या संदर्भात विद्यापीठाने एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माहिती दिली. कॅनेडियन कलाकार दिव्या मेहरा यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आणले, याचे श्रेय त्यांचे आहे. ‘जागतिक वारसा सप्ताहा’निमित्त ही मूर्ती मेहरा यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पाठपुरावा केला. यात त्यांना पत्रकार आणि इतिहासकार असलेल्या नॉर्मन मॅकेजी यांच्या नावे असलेल्या गॅलरीमध्ये ही मूर्ती आढळली.
१९१३ मध्ये मॅकेजी भारत दौर्यावर आले होते. त्यांना ही मूर्ती आवडली. स्वतःजवळ हा अमूल्य ठेवा असायला हवा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. एका व्यक्तीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. अर्थात, त्या व्यक्तीने ही मूर्ती चोरी केली. वाराणसीतील गंगेच्या काठावर असलेल्या मंदिरातून ही चोरी झाली होती.
दि. १९ नोव्हेंबर रोजी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये विद्यापीठाचे कुलपती आणि अध्यक्ष डॉ. थॉमस चेस कॅनडा यांनी भारतीय उच्च पदस्थ अधिकारी अजय बिसारिया यांच्याशी चर्चा करून मूर्ती भारतात आणण्याचा मार्ग मोकळा केला. यावेळी कॅनडा बॉर्डर सर्व्हिस एजन्सी, ‘मॅकेंजी आर्ट गॅलरी’ व ‘ग्लोबल अफेअर्स कॅनडा’ आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे, भगवान श्रीराम, माता सीता व लक्ष्मण या देवतांच्या तीन मूर्ती लंडनहून भारतात परत येणार आहेत. २४ नोव्हेंबर १९७८ रोजी तामिळनाडूच्या श्रीराजगोपाल मंदिरातून या चोरी करून लंडनला विकण्यात आल्या होत्या. भारत सरकारला याची माहिती मिळाली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयात हे प्रकरण लावून धरण्यात आले. १५ सप्टेंबर रोजी या मूर्ती त्यांना मिळाल्या.
भारत सरकारच्या निर्देशात लंडनहून दिल्लीत आणल्या गेल्या. कांस्याच्या असलेल्या या तीन मूर्ती सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागातर्फे तामिळनाडू प्रशासनाकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. केंद्रातील सरकारची इच्छाशक्तीदेखील महत्त्वाची आहे. सरकारने दाखवलेले गांभीर्यदेखील महत्त्वाचे ठरले.
भारतात असलेल्या आणि भारताबाहेर असलेल्या अशा संस्कृतीचे, पुरातन वास्तूंचे महत्त्व आपल्याला आपल्या पुढील पिढीला सांगणे, त्याची जपणूक करणे, पर्यटनाच्या, अभ्यासाच्या, संशोधनाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. देशातील प्रत्येक शहराला, राज्याला समृद्ध असा इतिहास आहे, तेथील वास्तू, मंदिरे, शिलालेख, देवळे आदी गोष्टींचे जतनही व्हायला हवे. भारताने आधीच इतिहासात अन्नपूर्णेसारख्या बर्याच गोष्टी परकीय आक्रमणांमुळे गमावल्या आहेत. त्या जतन झाल्या पाहिजेत, त्याचे महत्त्व जगाला सांगायला हवे.