मार्क्सवादी नेत्याच्या मुलाकडे प्रचंड बेहिशोबी संपत्ती!

09 Nov 2020 22:28:51

vicharvimarsh_1 &nbs



केरळमधील एका ज्येष्ठ मार्क्सवादी नेत्याचा मुलगाच अमली पदार्थ तस्करी आणि बेहिशोबी संपत्तीच्या प्रकरणात अडकला आहे. मार्क्सवादी नेते आपण म्हणजे तत्त्वाशी एकनिष्ठ असल्याचा आणि आपल्याकडून कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा करीत आले आहेत. पण, तो दावा किती खोटा आहे, हे केरळमधील दोन प्रकरणांवरून दिसून आले आहे. पाहूया केरळ सरकार या प्रकरणी काय कारवाई करते ते!


केरळमधील सोन्याच्या तस्करीचे प्रकरण अजून ताजे असतानाच, सत्तारूढ आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश चिटणीस बालकृष्णन कोडियारी यांचा मुलगा बिनीश कोडियारी याने केलेले प्रताप उघडकीस आले असून, पैशाचा प्रचंड गैरव्यवहार आणि अमली पदार्थ तस्कर मोहम्मद अनुप यांच्याशी असलेल्या संबंधांवरून त्यास अंमलबजावणी संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने बिनीश कोडियारी यांच्या घराची जवळजवळ २४ तास झडती घेतली. बिनीश कोडियारी सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून, त्याच्या कोठडीची मुदत बुधवारपर्यंत वाढविण्यात आली आहे. केरळमध्ये अलीकडेच घडलेल्या सोन्याच्या तस्करीमुळे, केरळमधील डाव्या सरकारची बदनामी झाली असतानाच, आता मार्क्सवादी नेते बालकृष्णन कोडियारी यांचा मुलगाच पैशाचा गैरव्यवहार आणि अमली पदार्थ तस्करीशी संबंधित प्रकरणात सापडला आहे. या बिनीश कोडियारी याने प्रचंड बेहिशोबी माया गोळा केली असल्याचेही अंमलबजावणी संचालनालयास आढळून आले आहे, या बिनीश कोडियारी याच्या खात्यात गेल्या सात वर्षांमध्ये पाच कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी रक्कम जमा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयास आढळून आले आहे. साधारण २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून २०१८-१९ या वर्षापर्यंत अशी बेहिशोबी रक्कम त्याच्या खात्यांमध्ये भरली गेली आहे. बिनीश कोडियारी याचे घोषित उत्पन्न आणि त्याच्या खात्यांमध्ये प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम यांचा हिशोब करता, बिनीश कोडियारी यांनी बरीच बेहिशोबी संपत्ती जमा केल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील काही आकडेवारी पाहिल्यास कशाप्रकारे बेहिशोबी रक्कम जमा केली याची कल्पना येते.




बिनीश कोडियारी याचे २०१२-१३ या वर्षामध्ये घोषित उत्पन्न ६.७ लाख रुपये असल्याचे प्राप्तीकर विवरण पत्राद्वारे घोषित करण्यात आले आहे. पण, याच कालावधीत त्यांच्या खात्यामध्ये रोख ५१.३ लाख रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांमध्ये घोषित उत्पन्न ५.४ लाख रुपये, तर याच कालावधीत खात्यामध्ये ६५.६ लाख रुपये जमा करण्यात आले होते. २०१४-१५ या वर्षात घोषित उत्पन्न ५.३ लाख रुपये, तर खात्यामध्ये ५३.५ लाख रुपये जमा झाले होते. २०१५-१६मध्ये ५६.३ लाख रुपये, २०१६-१७मध्ये 1.2 कोटी रुपये जमा झाले होते. त्या वर्षीचे घोषित उत्पन्न होते अवघे २५.४ लाख रुपये! २०१७-१८ या वर्षामध्ये घोषित उत्पन्न होते १६.३ लाख रुपये, तर खात्यामध्ये १.२ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळले, तर २०१८-१९या वर्षामध्ये घोषित उत्पन्न १३.२ लाख रुपये आणि खात्यामध्ये जमा ५४.९लाख रुपये जमा झाल्याचे आढळून आले. बिनीश कोडियारी याच्या तीन बँक खात्यांमध्ये ही सर्व बेहिशोबी रक्कम आढळली. बिनीश कोडियारी याच्याविरुद्ध बंगळुरू येथील न्यायालयात ज्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, त्यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने ही सारी आकडेवारी सादर केली. ही एवढी रक्कम कोठून आली, याचे समाधानकारक उत्तर बिनीश कोडियारी यास देता आले नाही, अशी माहितीही न्यायालयासमोर आली आहे. बिनीश कोडियारी यांच्याकडे अमली पदार्थ तस्कर मोहम्मद अनुप याचे डेबिट कार्डही सापडले आहे. तसेच बंगळुरूमध्ये जे ‘हॉटेल अनुप’ आहे, ती बिनीश कोडियारी याची बेनामी संपत्ती आहे, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.
केरळमध्ये हे जे अमली पदार्थ तस्करीचे आणि बेहिशोबी रकमेचे प्रकरण उजेडात आले आहे, ते लक्षात घेता केरळमधील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने राज्यातील मार्क्सवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याआधी केरळमध्ये संयुक्त अरब अमिरातीमधून जे १५ कोटी रुपयांचे सोने गैरमार्गाने आणण्यात आले होते, त्यामुळे मुख्यमंत्री पिनारायी विजयन सरकारची पुरती नाचक्की झाली होती. या सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुख्यमंत्री विजयन यांचे निकटचे सहकारी आणि माजी मुख्य सचिव पी. शिवशंकर यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. सध्या शिवशंकर हे अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. केरळमधील एका ज्येष्ठ मार्क्सवादी नेत्याचा मुलगाच अमली पदार्थ तस्करी आणि बेहिशोबी संपत्तीच्या प्रकरणात अडकला आहे. मार्क्सवादी नेते आपण म्हणजे तत्त्वाशी एकनिष्ठ असल्याचा आणि आपल्याकडून कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा करीत आले आहेत. पण, तो दावा किती खोटा आहे, हे केरळमधील दोन प्रकरणांवरून दिसून आले आहे. पाहूया केरळ सरकार या प्रकरणी काय कारवाई करते ते!


काँग्रेसचे ‘नोटाबंदी’चे तुणतुणे!


दोनच दिवसांपूर्वीं म्हणजे ८ नोव्हेंबर रोजी, नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यास चार वर्षे पूर्ण झाली. पण, मोदी सरकारने हा जो निर्णय घेतला, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खूपच मागे गेली आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, दुसरीकडे “‘नोटाबंदी’मुळे काळ्या पैशास लगाम बसला असून, कराद्वारे मिळणार्‍या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच “‘नोटाबंदी’च्या निर्णयामुळे पारदर्शकता आली आहे,” असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, ‘नोटाबंदी’चा निर्णय घेऊन अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप मोदी सरकारवर केला केला आहे, तर काही मोजक्या व्यावसायिकांना लाभ व्हावा, यासाठी ही ‘नोटाबंदी’ करण्यात आली, असा आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी वरील भाष्य केले. “जे आतापर्यंत विवरणपत्रे भरत नव्हते, अशांनी विवरणपत्रे भरण्यास प्रारंभ केला असून त्यांच्याद्वारे १३ हजार कोटी रुपये कररूपामध्ये जमा झाले आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. “५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने, तीन लाख खातेदार असे आढळले, ज्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दहा लाख रुपये पडून असल्याचे आढळून आले. पण, त्यांच्याकडून विवरणपत्रे भरली गेली नव्हती. अशी संपत्ती उघड झाल्याने अशा खातेदारांनीही विवरणपत्रे भरली आणि त्यांच्याकडून कररूपात कोट्यवधी रुपये जमा झाले. तसेच ‘नोटाबंदी’च्या आधी अशा पैशांचा वापर ‘राष्ट्रविरोधी कारवायांसाठी’ आणि डाव्या दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता. त्यास लगाम बसला,” अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. पण, काँग्रेसच्या नेत्यांना ‘नोटाबंदी’मुळे जे चांगले लाभ झाले ते दिसत नाहीत. केवळ भाजप सरकारवर आणि मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांवर टीका करणे, या व्यतिरिक्त अन्य कोणता कार्यक्रम काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडे असल्याचे दिसत नाही. त्यातूनच ‘नोटाबंदी’च्या निर्णयावरही टीका होत आहे. ‘नोटाबंदी’मुळे देशातील काळा पैसा कमी होण्यास मदत झाली असताना आणि कररूपाने महसुलात वाढ झाली असताना हा निर्णय घेऊन सरकारने जनतेचा कसला ‘विश्वासघात’ केला, हे काँग्रेसचे नेते समजावून सांगतील का?
-दत्ता पंचवाघ
Powered By Sangraha 9.0