ट्रम्प हरले, बायडन जिंकले... अमेरिका दुभंगली

08 Nov 2020 19:38:26
Trump_1  H x W:
 
 



अमेरिकेतील निवडणुकांमध्ये २८ वर्षांनंतर पहिल्यांदा अध्यक्षावर पराभूत होण्याची वेळ आली आहे तसेच अनेक वर्षांनी विजयी पक्षाला एका सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याची घटना घडली आहे. बायडन यांचा विजय अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय असला तरी लोकांमधील दरी आजही कायम आहे.
 
 
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे जो बायडन जिंकले आहेत. अमेरिकेत निवडणूक आयोग नसल्यामुळे बायडन यांच्या पेनिसिल्विनिया राज्यातील घोषणा असोसिएटेड प्रेसकडून करण्यात आली आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. ५३८ पैकी २९० इलेक्टोरल मतं त्यांनी आपल्या खिशात घातली असून जॉर्जियाचा निकाल घोषित झाल्यावर हा आकडा ३००च्या थोडा वर जाऊ शकतो. अर्थात, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल मान्य करायला नकार दिला असून ९ नोव्हेंबरपासून विविध राज्यांतील आपल्या पराभवाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी केली आहे.
 
 
असे असले तरी ते पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहाता जो बायडन यांनी उपाध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या आपल्या सहकारी कमला हॅरिस यांच्यासह भाषण करुन आपल्या विजयाचा स्वीकार केला. आपण डेमोक्रेटिक पक्षाचे नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून काम करणार असून दुभंगलेल्या अमेरिकेला मलम लावून बरे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कमला हॅरिस यांच्या विजयामुळे पहिल्यांदाच एक महिला, एक आफ्रिकन आणि भारतीय वंशाची व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर बसणार आहे. कमला हॅरिस यांनी आजवरच्या आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम तोडले आहेत.
 
 
असे असले तरी या निकालांनी अमेरिकेच्या पुरोगामी आणि उदारमतवादी वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे. गेली चार वर्षं विजयासाठी रशियाशी संधान बांधलेले, व्यक्तीकेंद्री, वंशवादी, धोरण सातत्य नसलेले, धोरणात्मक आकलन नसलेले, शीघ्रकोपी, भ्रष्ट असे अनेक आरोप झेललेले डोनाल्ड ट्रम्प या वर्षी आलेल्या ‘कोविड-१९’चे संकट आणि त्याच्या आर्थिक फटक्याने जायबंदी झाले होते. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्यूला सर्वस्वी ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला जबाबदार धरण्यात अमेरिकेतील पुरोगामी माध्यमांनी कोणतीही कसर सोडली नाही. असे असूनही ट्रम्प यांना जवळपास ४८% मतं मिळाली. २०१६ सालच्या निवडणुकीत ट्रम्प यांना ३०४ जागा मिळाल्या असल्या तरी केवळ ४६ टक्के मतं मिळाली होती.
 
 
गेल्या वेळी चार-पाच राज्यांत काठावर विजयी होऊन ट्रम्प अध्यक्ष झाले होते. यावेळी चार-पाच राज्यांत काठावर पराभूत झाल्यामुळे ते पराभूत होत आहेत. बायडन यांच्या बाजूने निळी लाट (त्यांच्या पक्षाचा रंग) येईल आणि रिपब्लिकन पक्षाला साफ करेल ही अपेक्षा साफ चुकीची ठरली आहे. या निवडणुकांसोबत अमेरिकेच्या काँग्रेसच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेटची मध्यावधी निवडणूकही पार पडली असून त्यात विजय मिळवण्यात डेमोक्रेटिक पक्षाला अपयश आले. सिनेटमध्ये पब्लिकन पक्षाच्या बाजूने ५३-४७ अशी विभागणी होती. ती आता ५०-४८ अशी झाली आहे. जॉर्जियातील दोन्ही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पुढे असले तरी ५० टक्के मतं न मिळाल्यामुळे तिथे ५ जानेवारीला पुन्हा मतदान होणार आहे.
 
 
या दोन्ही जागा जिंकल्या तर डेमोक्रेटिक पक्ष सिनेटचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रमतींच्या मतावर कारभार करु शकेल. जर रिपब्लिकन पक्षाने जॉर्जियात एक जरी जागा मिळवली तरी पुढची किमान दोन वर्षं जो बायडन यांच्या सरकारला लंगडत वाटचाल करावी लागेल. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा सरकारचे अनेक निर्णय फिरवले. बायडन यांना ते निर्णय पुन्हा एकदा फिरवायचे असतील तर त्यांना सिनेटमध्ये बहुमत आवश्यक आहे. याशिवाय ओबामा केअर लागू करणे, ‘कोविड-१९’ संकटाचा सामना करण्यासाठी ३.४ लाख कोटी डॉलरचे पॅकेज मंजूर करवून घेणे, सर्वोच्च न्यायालयातील रिपब्लिकन विचारांच्या न्यायमूर्तींचे ६-३ बहुमत तोडण्यासाठी न्यायमूर्तींची संख्या ९ वरुन १५ करणे, जागतिक पर्यावरण करारात सहभागी होणं, ट्रम्पनी रद्द केलेल्या इराणसोबतच्या अणुकरारावर नव्याने वाटाघाटी करणे अशा महत्त्वाच्या निर्णयांसाठी सिनेटमध्ये बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे बायडन यांनी म्हटल्याप्रमाणे दुभंगलेल्या अमेरिकेला सांधण्यासाठी त्यांना स्वपक्षीयांच्या अपेक्षांच्या तोंडाला पानं पुसावी लागतील.
 
 
रिपब्लिकन पक्षामध्ये दोन-तीन मोठे मतप्रवाह आहेत जे एकमेकांना पूरक आहेत. डेमोक्रेटिक पक्ष एकसंध नाही. रिपब्लिकन विचारसरणीला विरोध असणार्‍या अनेक छोट्या छोट्या मतप्रवाहांना एकत्र करुन तो बनला आहे. त्यामुळे त्याचे स्वरुप इंद्रधनुष्यी आघाडीसारखे असते. त्यात कृष्णवर्णीय, ज्यू, भारतीय, गरीबवादी, श्रमिकवादी, महिलावादी, अल्पसंख्यांकवादी, उच्चशिक्षित, नवश्रीमंत, उदारमतवादी, बाहेरील देशांतून स्थायिक झालेले अशा अनेक गटांचा समावेश आहे. किनारी राज्यांमध्ये आणि अंतर्गत राज्यांतील डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांमध्येही फरक आहे. जसे भारतात काँग्रेसला केरळमधील निवडणुकांत गोहत्येचे समर्थन करावे लागते तर मध्य प्रदेशात कपाळाला टिळा आणि जानवे परिधान करुन टेम्पल रन खेळावे लागते तशीच परिस्थिती अमेरिकेतही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डेमोक्रेटिक पक्षात उदारमतवादाच्या नावाखाली अमली पदार्थांचे सेवन, इस्लामिक मूलतत्त्ववाद, बेकायदेशीर लोकांना संरक्षण इ.चे समर्थन करणारे नेते समोर आले आहेत.
 
 
आर्थिकदृष्ट्या डाव्या आणि समाजवादी विचारांच्या नेत्यांचे प्राबल्यही वाढले आहे. ट्रम्प यांना हरवण्यासाठी बायडन यांच्यासारखा सर्वमान्य चेहरा देण्यात आला आणि त्यासाठी टोकदार विचारांच्या नेत्यांना पडद्यामागे ठेवण्यात आले होते. कदाचित सत्ता मिळाल्यास त्यांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावण्याचे आश्वासन देण्यात आले असावे. बायडन अध्यक्ष होणार हे स्पष्ट झाल्यावर बर्नी सँडर्स आणि अलेक्झांड्रा ओकाशिओ कार्टेझसारख्या नेत्यांनी आपली धोरणे रेटायला सुरुवात केली आहे. नवीन अध्यक्ष सुमारे चार हजार उच्चपदस्थांची नेमणूक करतात. त्यात मंत्रिमंडळ, सल्लागार, महत्त्वाच्या देशांतील राजदूत आणि संस्थांच्या अध्यक्षांचा समावेश असतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र सचिव, आरोग्य सचिव, शिक्षण सचिव आणि श्रम सचिव या पदांवर बायडन कोणाची निवड करतात त्यावर त्यांच्या प्रशासनाची दिशा ठरणार आहे.
 
 
डोनाल्ड ट्रम्प जरी पराभूत झाले असले तरी ट्रम्पीझमला लोकांनी पाठिंबा दिला आहे. जगातील सर्वात जुनी लोकशाही, सर्वात बलाढ्य सैन्यदलं आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला तिची मित्रराष्ट्रं मूर्ख बनवत असून तिला आवळा देऊन कोहळा काढून घेत आहेत. जागतिक नेतृत्व करण्याच्या नादात पर्यावरण, सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि रोजगारांच्या क्षेत्रात अमेरिका स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे ही भावना अनेक लोकांच्या मनात घर करुन होती. ट्रम्प यांनी या भावनेला लाटेचे स्वरुप देऊन त्यावर ते स्वार झाले. ट्रम्प पराभूत झाले असले तरी ही लाट तशीच आहे. ट्रम्प येण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या दीर्घकालीन भविष्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. पक्षाचा पाया आकुंचित होत होता. या निवडणुकीत उपनगरांतील श्वेतवर्णीय महिला आणि लॅटिनो लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्पना मतं दिली आहेत.
 
 
आजवर अमेरिकेच्या राजकारणात स्त्रियांचे प्रमाण कमी होते आणि असले तरी मुख्यत्त्वे स्त्रीवादी-पुरोगामी होते. पण आता रिपब्लिकन पक्षातही पारंपरिक धर्मपालनावर विश्वास असणार्‍या पण त्याचसोबत करिअर आणि राजकारणात यशस्वी होण्याची जिद्द असलेल्या महिला पुढे येत आहेत. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये २८ वर्षांनंतर पहिल्यांदा अध्यक्षावर पराभूत होण्याची वेळ आली आहे तसेच अनेक वर्षांनी विजयी पक्षाला एका सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याची घटना घडली आहे. बायडन यांचा विजय अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय असला तरी लोकांमधील दरी आजही कायम आहे.



Powered By Sangraha 9.0