शास्त्रीय नृत्याची शोभा

08 Nov 2020 19:29:43
manasa_1  H x W




भारतातील प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना पद्मश्री शोभा नायडू यांनी कुचिपुडी नृत्यशैलीत केवळ प्रावीण्य न मिळवता ही अभिजात कला पुढच्या पिढीला बहाल केली. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
 
 
 
पद्मश्री शोभा नायडू कुचिपुडी नृत्याच्या सर्वात उल्लेखनीय गाजलेल्या नृत्यांगनांपैकी एक. त्यांची महानता शास्त्रीय पाया असलेल्या उत्कृष्ट नृत्यशैलीसाठी त्यांनी केलेल्या संपूर्णतेतच आढळते. भारताची प्राचीन संस्कृती सांगणार्‍या कुचिपुडी नृत्यशैलीत केवळ प्रावीण्य न मिळवता त्यांनी हा वारसा पुढल्या पिढीतील नर्तकांनाही दिला. आधुनिक काळात अभिजात कला टिकवण्याची जबाबदारी अंतिमत: त्या कलाकारावरच असते, ती त्यांनी चोखपणे निभावली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्यांना गाठलेच आणि वयाच्या ६४ व्या वर्षी शोभा नायडू यांचे १५ ऑक्टोबर, २०२० रोजी निधन झाले.
 
 
गुरु वेंपती चिन्ना सत्यम यांच्या शिष्या असणार्‍या शोभा नायडू यांचा जन्म १९५६मध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनाकापल्ले येथे झाला. साधारण वयाच्या सहाव्या वर्षांपासून गुरू वेंपती चिन्ना सत्यम् यांच्याकडे शोभा शिकू लागल्या आणि १९६९ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी शोभा यांनी पहिले सादरीकरण त्यांनी केले. कुचिपुडी या आंध्र प्रदेशातील पारंपरिक नृत्यनाट्याचा आज भारतीय नृत्यशैली म्हणून बराच विकास झाला आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित ही नृत्यशैली आहे. कुचिपुडी हा भरतनाट्यमच्या जवळचा, परंतु मुद्रांपेक्षा भावदर्शनाशी, ‘यक्षगान’ लोकविधेच्या कथनाशी, ओडिसीच्या लालित्याशी आणि मणिपुरी नृत्यशैलीतील मधुराभक्तीशी नाते सांगणारा नृत्यप्रकार. कुचिपुडी हे मुख्यत: ‘नाट्य’असल्यामुळे यात अभिनयाला अधिक प्राधान्य दिले जाते.
 
 
शोभा यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय ठरलेल्या कलाकृतीत ‘विप्रनारायण’, ‘कल्याणा श्रीनिवासम’, ‘श्रीकृष्णा शरणं मम्’, ‘विजयोस्तु नारी’ यांसारख्या सादरीकरणाचा समावेश होतो. अनेकदा चित्रपट क्षेत्रातूनही संधी चालून आल्या, पण अगदी कमी वेळा, तेही गुरूंनी सांगितले म्हणूनच त्यांनी चित्रपटांसाठी नृत्य केले. यातील सत्यभामा, चंडालिका, देवदेवाकी, पद्मावती, मोहिनी, साईबाबा, देवी पार्वती आणि इतर अनेक अप्रतिम भूमिकांसाठी त्यांचे भरभरून कौतुक झाले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्कृती वाहिनीवरील सिरी सिरी मुव्ह या कार्यक्रमाच्या त्या प्रस्तुतकर्ता होत्या. कला श्रीनिवासममधील पद्मावतीच्या भूमिकेमुळे प्रभावित होऊन तिरुमला तिरुपती देवस्थानमने संपूर्ण भारतभर शोभा यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आणि काही नृत्यांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांना बोलवण्यात आले.
 
 
सनदी अधिकारी अर्जुन राव यांच्याशी विवाहानंतरही आपल्यातील कलेला अंतर न देता शोभा यांनी देशविदेशांत दौरे केले. हाच काळ देशोदेशींच्या ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चा होता. अमेरिका तसेच व्हेनेझुएला, क्युबा, मेक्सिको या दक्षिण अमेरिकी देशांत, ब्रिटन, तुर्कस्तान, हाँगकाँग, दुबईत त्यांचे कार्यक्रम झाले. परदेशातील कलारसिकांनीही शोभा यांना भरभरून प्रेम दिले. गुरु म्हणून त्यांनी भारत आणि परदेशातही दीड हजाराहून अधिक शिष्य घडविले. आज त्यांचे बहुतेक विद्यार्थी भारत आणि परदेशातही स्थायिक झाले आहेत. भारत आणि भारताबाहेरही या विद्यार्थ्यांनी कुचपुडी प्रशिक्षण केंद्रे उभारत शोभा यांनी विश्वासाने सुपूर्द केलेला कलेचा वारसा परदेशातदेखील रुजवण्याचे काम केले आहेत.
 
 
शोभा यांना शक्य होते तोपर्यंत नृत्य-ज्ञानदानाचे कार्य सातत्याने करीत राहिल्या होत्या. शास्त्रोक्त शिक्षणाला सादरीकरणाची जोड देणार्‍या शोभा नायडू, बोलका चेहरा व डोळे यांमुळे नृत्य पाहण्याची सवय नसलेल्या प्रेक्षकांपर्यंत नृत्यातील भाव नेमका पोहोचवत. ‘भामाकलापम’सारखे नृत्यनाट्य समीक्षकांनी विशेष गौरवले असले तरी प्रत्येक सादरीकरणात, अगदी सुरुवातीच्या गणेश वंदनेपासून नृत्त, कलापम या क्रमाने अखेरच्या ‘तरंगम्’पर्यंत प्रेक्षक-श्रोत्यांना अभिजात अनुभव देण्यात त्यांनी कधीही कसूर केली नाही. शोभा यांना कृष्ण गणसभा चेन्नईने ‘नृत्य चूडामणि’ या दक्षिण भारतातील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले. याचबरोबर १९९१ साली ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार, १९९१मध्येच ‘श्रीशृंगार संसद ऑफ बॉम्बे’चा ‘नृत्यविहार पुरस्कार’ तसेच १९९६मध्ये ‘नृत्यकला शिरोमणी’ ही पदवी शोभा यांना दिली.
 
 
यासोबतच त्यांना आंध्रप्रदेश सरकारकडून अनेक सन्मान देण्यात आले आहेत. शोभा यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने २००१ मध्ये शोभा नायडू यांना ‘पद्मश्री’ या सन्मानाने गौरविले. १९८०मध्ये त्यांनी ‘वेम्पटि सत्यम्’ नृत्यालयाची हैदराबाद येथे शाखा उघडली, तिचे प्रमुखपद त्यांनी २०१३ पर्यंत सांभाळले. शोभा नायडू या एक परिपूर्ण कलाकार होत्या. आपल्या कलेच्या सेवेत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शोभा नायडू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, “शोभा यांच्या ‘सत्यभामा’ आणि ‘पद्मावती’ या भूमिका कायम समरणात राहतील.” आपल्यातील नृत्यकलेची साधना करत त्याचे पावित्र्य जतन करून पुढच्या पिढीला ती सुपूर्द करणार्‍या पद्मश्री शोभा नायडू यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भावपूर्ण श्रद्धांजली!






Powered By Sangraha 9.0