'भांडुप पम्पिंग स्टेशन'ला पक्षी बघायला जायचंय ? आजपासून आकारले जातील इतके पैसे !

06 Nov 2020 10:38:43
bps_1  H x W: 0


'कांदळवन कक्षा'कडून 'भांडुप पम्पिंग स्टेशन' येथील पर्यटन विकास कामांचे उद्घाटन 

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून ५ ते १२ नोव्हेंबरपर्यत 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून 'कांदळवन कक्षा'कडून (मॅंग्रोव्ह सेल) दि. ५ नोव्हेंबर २०२० रोजी 'भांडुप पम्पिंग स्टेशन' येथे विकसित करण्यात आलेले पर्यटन विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या ऐरोली येथील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'त भरविण्यात आलेल्या पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन पार पाडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) श्री. सुनिल लिमये उपस्थित होते. सोबतच 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. विरेद्र तिवारी, उपवनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, विभागीय वन अधिकारी डी.आर.पाटील, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती गीता पवार, श्री. राजेंद्र मगदुम, उपवनसंरक्षक (ठाणे), वन्यजीव डाॅ. श्री. भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक भूमीअभिलेख श्रीमती अनिता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक (फणडसाड अभयारण्य) श्री. नंदकिशोर खुप्ते, मच्छीमार नंदकुमार पाटील आणि पर्यावरणवादी डी. स्टॅलिन उपस्थित होते.
 

bps_1  H x W: 0 
 
कार्यक्रमाची सुरुवात 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'त भरविण्यात आलेल्या पक्षी छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. यावेळी श्री. सुनिल लिमये आणि श्री. विरेद्र तिवारी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि इतर मान्यवरांसोबत प्रदर्शनाची पाहणी केली. 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभायरण्य' पर्यटकांसाठी खुले झाल्याने हे छायाचित्र प्रदर्शन येत्या १२ नोव्हेंबरपर्यंत पर्यटक आणि पक्षीप्रेमींना पाहण्यासाठी खुले असेल. यानंतर याठिकाणी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात 'कर्नाळा पक्षी अभयारण्या'तील वनरक्षक श्री. युवराज मराठे यांनी 'तिबोटी खंड्या' पक्ष्यावर तयार केलेल्या लघुपट प्रसिद्ध करण्यात आला. तसेच 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चे वनक्षेत्रपाल श्री.एन.डी.कोकरे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यावरील लघुटपटही प्रसिद्ध झाला. 
 
 
bps_1  H x W: 0 
मुंबईतील पक्षीनिरीक्षणासाठी महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या 'भांडुप पम्पिंग स्टेशन' येथील विकास कामांचे उद्घाटनही करण्यात आले. 'कांदळवन कक्षा'कडून 'भांडुप पम्पिंग स्टेशन' येथे प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जागेचे संरक्षण, संवर्धन आणि स्थानिकांना रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार याठिकाणी उभारण्यात आलेल्या 'कांदळवन कक्षा'च्या कुटीचे श्री. लिमये यांनी उद्घाटन केले. यावेळी 'कांदळवन कक्षा'ने घेतलेल्या या निर्णयाचे स्थानिक मच्छीमारांनी स्वागत करून श्री.लिमये आणि श्री. तिवारी यांना पुष्पगुच्छ आणि पारंपारिक कोळी टोपी देऊन त्यांचे आभार मानले. प्रसंगी यापरिसरात स्थानिक तरुण प्रतिक कोळी, धीरज देशमुख, मयुरी कोळी, गौरेश कोळी, अभय पाटील, रिद्धी कोळी यांनी काढलेल्या भित्तीचित्रांचेही श्री. लिमये आणि श्री.तिवारी यांनी कौतुक केले. यापुढे 'भांडुप पप्मिंग स्टेशन' येथे प्रवेशासाठी ५० रुपये शु्ल्क आकरण्यात येईल. तसेच दुचाकीसाठी ५० रुपये, चारचाकीसाठी १०० रुपये आणि कॅमेऱ्य़ासाठीही १०० रुपये शुल्काची आकारणी करण्यात येईल. याविषयीची सर्व माहिती https://mangroves.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0