येत्या दिवाळीत सोने खरेदी करावे का?

06 Nov 2020 10:41:03
Gold_1  H x W:

युरोपीय खंडातील बऱ्याच देशांत कोरोनाची आलेली दुसरी लाट, भारतात येणार की नाही, हा अनुत्तरित प्रश्न. भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी व माणसाच्या जीवनाबद्दल नसलेली निश्चितता या पार्श्वभूमीवर सोन्यासारख्या धातूत गुंतवणूक करावी का, याचा आजच्या लेखात घेतलेला हा आढावा...



जागतिक पातळीवर ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा औन्सचा दर २०५० युएस डॉलर इतका होता तो घसरून औन्सचा दर ऑक्टोबरमध्ये १,८८० युएस डॉलर इतका झाला. भारतात ऑगस्टमध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर ५६ हजार रूपये होता. तो गेल्या गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी सुमारे ५१ हजार रूपये होता. दिल्लीत ५० हजार, ३६० रूपये होता. या युरोपातील दुसऱ्या लाटेचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. २१ ऑक्टोबरचा बंद निर्देशांक ४० हजार, ७०० होता. तोच २९ ऑक्टोबर रोजी ३९ हजार, ७४९.८५ इतका झाला.
 
 
मे २०१९ पासून सोन्याच्या भावाने मे २०१९ पासून उसळी घ्यायला सुरुवात केली व त्याच्यानंतरच्या एका वर्षाच्या काळात सोन्याच्या भावात सुमारे दुप्पट वाढ झाली. मे २०१९ मध्ये एक औन्स सोन्याचा दर १ हजार, २२५ युएस डॉलर होता. तो ७ ऑगस्ट रोजी २ हजार, ८० युएस डॉलर इतका वधारला होता. सध्या १८८० युएस डॉलरला एक औन्स सोने उपलब्ध आहे.
 
 
गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करावयाची असेल तर ती दीर्घकाळासाठी करावी. सध्याच्या महामारीच्या दिवसात लोकांचा दीर्घकालीन गुंतवणुकीकडे कल कमी झाला आहे. तसेच ज्येष्ठ माणसेही दीर्घकालीन गुंतवणूक टाळतात. आज ५० हजार रुपये देऊन १० ग्रॅम सोने देणे महाग ठरत असले तरी दशकांनंतर या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकेल. १५ वर्षांपूर्वी सोन्याचा १० ग्रॅमचा दर जो सात हजार रूपये होता, तो आज सातपट वाढ होऊन ५० हजार रूपयांच्या घरात आहे. ज्यांची दीर्घकालीन गुंतवणुकीची क्षमता आहे, अशांनी या दिवाळीत सोने खरेदी करावे.
 
 
 
दागिन्यांसाठी सोने घ्यावयाचे असेल, तर तो वेगळा विषय आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या रकमेच्या पाच ते दहा टक्क्यांपर्यंत रक्कम सोन्यात गुंतवावी. दिवाळी असो वा नसो, सोन्यात जर गुंतवूणक करावयाची असेल तर एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक न करता, ठरावीक कालावधीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात त्या त्या वेळच्या सोन्याचा दर बघून गुंतवणूक करावी. सोन्याचे भाव शेअरसारखे रोजच्या रोज बदलत असतात.
 
 
दागिने करावयाचे नसतील आणि सोन्यात गुंतवूणक करावयाची असेल तर ‘फिजिकल’ सोन्यात गुंतवणूक न करता, केंद्र शासनाच्या ‘सोव्हरिन गोल्ड बॉण्ड’ योजनेत गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीवर दरवर्षी अडीच टक्के दराने व्याज मिळते. प्रत्यक्ष सोनेखरेदी केली, तर ती ‘डेड’ गुंतवूणक होते, व्याज मिळत नाही आणि सुरक्षिततेसाठी ते जर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले, तर लॉकरचे भाडे भरावे लागते. मुदतीअंती त्यावेळचा सोन्याचा दर मिळतो. समजा, एखाद्याने या ५० हजार दराने गुंंतवणुकीवर केली असेल आणि मुदतीपूर्वीच्या वेळी समजा जर दर ६५ हजार रूपये असेल तर गुंतवणूकदाराला ६५ हजार रूपये दराने रक्कम परत केली जाते.
 
 
 
हे बॉण्ड गुंतवणूकदाराच्या नावे पेपर स्वरूपात गुंतवणूकदाराला दिले जातात. याच गुंतवणूक कालावधी आठ वर्षे आहे, पण पाच वर्षांनंतर गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज प्राप्ती करपात्र आहे. मुदतीअंती कॅपिटल गेन्स मात्र करमुक्त आहे. शेअर विकल्यानंतर मात्र कॅपिटल गेन्स भरावा लागतो. गुंतवणुकीचा दुसरा पर्याय म्हणजे, ‘गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स’ (ईटीएफ) हा फंड म्युच्युअल फंड कंपन्या राबवितात. या वर्षी गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळावा.
 
सोन्याची नाणी खरेदी केल्यास, त्यासाठी ८ ते १५ टक्के दराने घडणावळ खर्च आकारला जातो. १० ग्रॅम गोल्ड बारची सध्याची सरकारी किंमत सुमारे ५६ हजार, ४०० रुपये आहे. सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाही अखेरीस देशात सोन्याची मागणी ८६.६ टन इतकी होती. यात सप्टेंबर २०१९च्या तुलनेत ३० टक्के घट झाली. त्यावेळच्या मागणीचे प्रमाण १२३.९ टन होते. सप्टेंबर अखेर ३९ हजार, ५१० कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी होती, यात सप्टेंबर २०१९ अखेरच्या तुलनेत चार टक्के घट झाली. त्यावेळचे मागणीचे मूल्य ४१ हजार, ३०० कोटी रुपये इतके होते.
 
एकूण दागदागिन्यांच्या मागणीत सप्टेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीत ४८ टक्क्यांची घट झाली. सप्टेंबर २०२० अखेरची मागणी ५२.८ टन होती, तर सप्टेंबर २०१९ अखेरचे प्रमाण १०१.६ टन होते, पण गुंतवणुकीत मात्र ५२ टक्के वाढ झाली. सप्टेंबर २०१९ अखेरच्या तिमाहीत सोन्यात २२.३ टन गुंववणूक झाली होती. ती वाढून सप्टेंबर २०२० अखेर ३३.८ टन इतकी झाली. मार्च २०२० अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताब्यात ६५३.०१ टन सोने होते. भारतात आज घरोघरी आणि देवळांत २५ हजार, २७० टन सोने आहे. हे सोने जर अर्थव्यवस्थेत आणले गेले तर आपली अर्थव्यवस्था बरीचशी दणकट होईल. पण, कोणतेही सरकार हा भावनेचा विषय असल्यामुळे यात ढवळाढवळ करणार नाही.
 
सध्याच्या महामारीतून देशाला आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी देवळांकडे असलेले सोने सोडा, पण देवळांकडे जो कोट्यवधी रुपयांचा निधी आहे तो जरी सरकारने देशासाठी वापरला तरी आपली आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारु शकेल. ‘गोल्ड इटीएफ’ योजनांत २२.१ सोने आहे, देशाच्या लोकसंख्येचा विचार करता यात वाढ व्हावयास हवी, या व्यवसायातील उद्योजकांच्या मते, लोकांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती आता कमी झाली असून लोक बाहेर पडू लागले आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवरही होणार. लोक या दिवाळीत नक्कीच सोने खरेदी करतील. ही दिवाळी सुवर्णकारांसाठी वाईट जाणार नाही. कारण, भारतीयांना सोन्याची एक वेगळीच ‘क्रेझ’ आहे. भारतात एखाद्या कुटुंबाकडे किती सोने आहे, यावरुन त्या कुटुंबाचा सामाजिक दर्जा ठरविला जातो.
 
सोने शुद्धीकरण करणाऱ्या ‘रिफायनरिज अॅक्रेडीटेड’ अशा भारतात फक्त २० असून या सर्व सध्या कार्यरत आहेत. आधुनिक गोल्ड रिफायनरी अस्तितवात आणण्यासाठी सुमारे २० ते १५० कोटी खर्च येतो, पण असंघटित क्षेत्रात ५० हजार रुपयांत ‘रिफायनरी’ कार्यान्वित केली जाते, या असंघटित क्षेत्रातील ‘रिफायनरिज’मुळे सोन्याच्या शुद्धतेत फसवाफसवी होऊ शकते. त्यामुळे असंघटित ‘रिफायनरिज’ वर शासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
 
सध्या इतर सर्व गुंतवणूक पर्यायांमध्ये परतावा फार कमी दराने मिळत असला, तरी सोन्याबाबत तितकी वाईट परिस्थिती नाही. डिसेंबर २०१५ पासून सोने तेजीतच आहे. यावर्षी सोन्याच्या दरात युएस डॉलर २६ टक्के, तर चांदीच्या दरात ३३ टक्के वाढ झाली. स्विस येथील एक मोठे गुंतवणूकदार मार्क फाबेर यांनी २० वर्षांपूर्वी तेल व कमॉडिटी मार्केटमध्ये तेजी येणार, असे मत वर्तविले होते व तसे घडलेही. हेच मार्क फाबेर आता सोन्याबद्दल आशावादी असून सोन्याच्या किमती वाढणारच, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यांच्या मते, सोन्यात गुंतवणूकही वाढेल, तसेच सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे प्रमाणही वाढेल.
 
भारतात सोन्याच्या खाणी फार कमी आहेत. भारतात सोने फार कमी तयार होते, पण भारतात सोन्याची मागणी फार प्रचंड आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर सोने आयात करावे लागते. भारत इंधन व सोने फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो. इंधनाची आयात कमी व्हावी म्हणून केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. एखाद्या देशाची निर्यात-आयातीपेक्षा जास्त असेल, तर ‘बॅलन्स ऑफ पेमेंट’ परिस्थिती चांगली व जर निर्यातीपेक्षा आयात जास्त असेल, तर ‘बॅलन्स ऑफ पेमेंट’ परिस्थिती वाईट जर भारताची इंधन सोन्याची आयात कमी झाली, तर भारताची ‘बॅलन्स ऑफ पेमेंट’ परिस्थिती सुधारु शकेल.
 
 
 
भारत स्वित्झर्लंडकडून त्याच्या गरजेच्या ५० टक्के सोने आयात करतो. दक्षिण आफ्रिकेकडून पाच टक्के, युएईकडून दहा टक्के, पेरुकडून पाच टक्के, डोमिनिकन रिपब्लिककडून एक टक्का, घानाकडून सहा टक्के व अन्य देशांकडून १८ टक्के, अशा प्रमाणात सोने आयात करतो. लोकांचा सोन्यांच्या दागिन्यांचा हव्यास कमी झाला तर तो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगला ठरू शकेल. गुंतवणुकीच्या बऱ्याच पर्यायांपैकी एक पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करावी. यंदाची दिवाळी सोने बाजारपेठेला फार चांगलीही नसेल व फार वाईटही नसेल. मध्यम स्वरुपाची असेल, असा अंदाज आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0