वाहने रस्त्यावर, आता वाहनतळांची प्रतीक्षा...

03 Nov 2020 22:21:29

Mumbai Parking_1 &nb
 
टाळेबंदी शिथील झाल्यामुळे मुंबईतील वाहनतळे पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. टाळेबंदीच्या काळात वाहनतळ चालविणे शक्य नसल्याने वाहनतळे चालविणार्‍या कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे.
 
 
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पालिकेच्या वाहनतळ शुल्क न मिळाल्यामुळे, पालिकेला महसुलात प्रचंड घट झाली आहे. दुसरीकडे पालिकेच्या खर्चाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आता सार्वजनिक वाहनतळांवरील शुल्क वसुलीच्या कामासही सुरुवात केली आहे. लोकल सर्वांसाठी सुरु न झाल्याने मुंबईकर सध्या मोठ्या संख्येने त्यांच्या चारचाकी वा दुचाकी वाहनाने कार्यालयात ये-जा करतात. गेल्या काही वर्षांत गाड्यांच्या संख्येतदेखील भरमसाठ वाढ झाली आहे. मुंबईची उपनगरे व लगतच्या शहरांमधून अनेक नागरिक वाहनाने कामानिमित्त मुंबईत येत असतात. पण, वाहने उभी करायला जागा न मिळाल्याने ते वाटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला त्यांची वाहने उभी करून ठेवतात. ही वाहने अव्यवस्थितरित्या उभी केल्याने रस्त्यावरील नेहमीच्या वाहनांच्या वाहतुकीला व पादचार्‍यांना अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहनतळे सुरू केली आणि देखभाल आणि शुल्क वसुलीच्या कामासाठी तेथे कंत्राटदारांची नियुक्ती केली.
 
 
मात्र, वाहनांची संख्या व वाहनतळांमधील वाहने उभी करण्याची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. (वाहनांची संख्या २०१९ मध्ये सुमारे ३५ लाख व वाहने वाहनतळात उभी करण्याच्या जागा सुमारे ३४ हजार म्हणजे १०० वाहनांपाठी एक वाहनजागा.) त्यामुळे मुंबईत वाहनतळे बांधण्यासाठी जागा मिळणेच मुळी कठीण असल्याने काही रेल्वे स्थानकांत, मॉलमध्ये, उड्डाण पुलांखाली (ही वाहनतळे एमएसआरडीसीकडून बांधली जात आहेत), बस आगारांच्या ठिकाणी ही वाहनतळे मोठ्या संख्येने बांधायला हवीत. तसेच जुन्या रहिवासी इमारतीमध्ये वाहनतळास जागा नसल्याने जवळच्या रस्त्यावर रहिवाशांना सोईची वाहनतळे वापरण्यास परवानगी द्यावी लागेल. मुंबई महापालिकाने यासंबंधी एक अ‍ॅपही तयार केले आहे, त्याच्या साहाय्याने जवळची पार्किंग जागा नागरिकांना शोधता येईल.
 
 
टाळेबंदीच्या काळात वाहनतळे चालविणारे कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी गावी निघून गेले होते. टाळेबंदी शिथील झाल्यानंतर कार्यालयातील उपस्थिती वाढली आहे. दुकाने, हॉटेल्स, मॉल्स इत्यादी सुरू झाली आहेत. नागरिकांची वर्दळ आता वाढू लागली आहे. पण, हे नागरिक त्यांची वाहने विनाशुल्क वाहनतळांच्या जागी उभी करून ठेवत असल्यामुळे पालिकेचाही मोठा महसूल बुडत आहे. आता वाहनतळ चालविणारे गावाहून परतू लागले आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांलगतच्या अनेक वाहनतळांपैकी ४० वाहनतळांवर शुल्क वसुली सुरू करण्यात आली आहे. परंतु, कंत्राटदारांनी केलेल्या कराराची मुदत संपल्यामुळे १२ सार्वजनिक वाहनतळांकरिता निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. विभाग कार्यालयांकडून त्यांच्या हद्दीतील सार्वजनिक वाहनतळांची माहिती मागविण्यात येत आहे. या सुरु झालेल्या ४० व्यतिरिक्त इतर वाहनतळे लवकरच कार्यान्वित करण्यात येतील असे पालिका अधिकार्‍यांनी ठरविले आहे.
 
 
पालिकेचे वाहनतळ मंडळ (Parking Authority) स्थापायचे ठरले. हे वाहनतळ मंडळ शहरातील वाहने किती व वाहनतळांकरिता योग्य जागेचा शोध घेईल. या मंडळात २४ प्रभागांकरिता नगर नियोजक नेमले जातील व प्रत्येक प्रभागात वाहतुकीची घनता, सर्व्हेक्षण करून एका आठवड्यात अभ्यासली जाईल. या मंडळात १२ नगर नियोजक, जीआयएस नगरतज्ज्ञ असतील व ‘जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम’ (ॠखड) आराखडे बनविले जातील व सध्याच्या पार्किंग लॉटच्या माहितीच्या आधारे त्यावर विचार केला जाईल. या कामाकरिता रु. ३ कोटींचे बजेट निर्धारित जाईल.
 
 
सध्या कुठे, किती वाहनतळे?
 
 
स्ट्रीट पार्किंग ९१ (१२ हजार जागा), ऑफ स्ट्रीट पार्किंग १०२ जास्त यामधून २० हजारांपेक्षा, सुखसुविधा (आशपळींळशी) असलेली २९. मुंबईत २०१९ मध्ये ३२ लाखांहून जास्त वाहने असतील. विकास आराखडा २०३४ मध्ये वाहनतळ समस्या सोडविण्यासाठी वेगळे वाहनतळ मंडळ स्थापावे असे ठरले होते. असे मंडळ लंडन, टोराँटो व इतर विकसित देशांच्या शहरात स्थापली गेली आहेत. मुंबईत अभ्यासांती ठरले आहे की, वाहनांकरिता २.८० लाख पार्किंग जागा लागतील, तर सध्या फक्त ७० हजार पार्किंग जागा उपलब्ध होऊ शकतील. यामुळे या वाहन मंडळाचा पार्किंग लॉट मिळण्याकरिता अभ्यास सुरू राहील.
 
 
वाहनतळ समस्या काय आहेत?
 
 
पालिकेची जून २०१९ मध्ये १४६ पार्किंग लॉट होती व त्यांची पार्किंग क्षमता ३४,८०८ आहे. ही क्षमता वाढविण्यासाठी वेगाने प्रयत्न व्हायला हवेत, पण ते होत नाहीत. भूमिगत वाहनतळांची घोषणा झाली, पण त्याला गती नाही. पुनर्विकासांतर्गत मिळालेल्या पार्किंगच्या जागा ताब्यात घेण्याबाबतही पालिका उदासीन आहे.
पालिकेद्वारा उपलब्ध करून देण्यात आलेल्या १४६ पार्किंग ठिकाणांलगतच्या एक किमी रस्त्यावर ‘नो पार्किंग’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. या ‘नो पार्किंग झोन’मध्ये अनधिकृत पार्किंग आढळल्यास रु. दहा हजार दंड आकारला जाणार आहे. अनेक तक्रारींनंतर आता तो कमी होऊन तो रु. चार हजार झाला आहे. सदर दंड न भरल्यास वाहन टोईंग मशीनद्वारे उचलून नेले जाणार आहे.
 
 
खासगी वाहनांच्या पार्किंगचा मुख्य पेच
 
 
कोणी गाडी विकत घेतली की चार पार्किंगच्या जागा व्यापल्या जातात. बसगाड्या व टॅक्सी १६ तास वापरात राहतात व आठ तास उभ्या राहतात. खासगी गाड्या दोन तास वापरात राहतात व २२ तास उभ्या असतात. त्यामुळे खासगी गाड्या पार्क करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा लागतात.
 
 
किती ठिकाणी वाहनतळांची सोय झाली आहे?
 
 
मुंबई महापालिकेनी अनेक ठिकाणी (वरच्या परिच्छेदात ९१ ठिकाणी) वाहनतळे बांधली आहेत. या ९१ व्यतिरिक्त पालिका काही रस्त्यावरसुद्धा वाहनतळे सुरु करणार आहे, जेणेकरून वाहनचालकांना वाहने उभी करण्याची सोय होईल.
जास्त गाड्यांच्या सोईकरिता मुंबई महापालिका मुंबई पार्किंग ऑथोरिटीच्या सल्ल्याने आठ सार्वजनिक वाहनतळे केंद्र (झझङ) ठरवित आहे, ज्या ठिकाणी वाहनतळांची मोठी मागणी आहे. ती अशी (कंसातील आकडे वाहतळांची अंदाज क्षमता व वापर दर्शविते) हा वापर १०० ते २०० पर्यंत होऊ शकतो -
 
 
शिवडी (३१५-८७), अल्टमाऊंट रोड (२०४-९४), बूमरँग बिल्डींग साकी - चांदिवली फार्म रोड (१९८-१००), लोधा पीपीएल पवई (१८५ -१००), मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ विकास प्लाझो पीपीएल मुलुंड प (१२५-८०), एसव्ही रोडवरील टोपीवाला सेंटर गोरेगाव प. (११६-९७), ट्रायो फॅशन मॉल वांद्रे (९१-१००), नेपियन सी रोड (५४-१००).
 
 
अशा रस्त्यावरील वाहनतळे केंद्राच्या १४ प्रभागातील मागणीला आता वाढ झाली आहे. कारण, या केंद्राच्या ५०० मी. परिसराच्या आत कोणतेही वाहन उभे केले, तर पालिका दंड वसूल करते. (सुरुवातीला हा दंड रु. दहा हजार होता, तो जुलै २०१९ पासून रु. चार हजार झाला आहे.)
 
 
या दंडवसुलीमुळे सार्वजनिक वाहनतळावरील मागणी वाढायला लागली आहे.
 
 
मुंबईतील प्रभागांमध्ये सध्याचे पार्किंग लॉट असे आहेत. ही स्ट्रीट वाईड पार्किंग सध्या प्रभागांमधून थोडे शुल्क घेऊन वा विनाशुल्क चालवले जात आहेत.
 
 
‘ए’ प्रभाग - फोर्ट, बॅलार्ड इस्टेट, मरिन ड्राईव्ह इत्यादी ३६ ठिकाणी पार्किंग लॉट
 
‘सी’ प्रभाग- चंदनवाडी, जिमखाना इत्यादी दोन ठिकाणी.
 
‘डी’ प्रभाग - ताडदेव, गिरगाव इत्यादी पाच ठिकाणी.
 
‘जी दक्षिण’ प्रभाग- परळ इत्यादी पाच ठिकाणी.
 
‘एच पूर्व’ प्रभाग- विलेपार्ले, माहीम, धारावी इत्यादी एका ठिकाणी.
 
‘के पश्चिम’ विभाग - अंधेरी प. इत्यादी तीन ठिकाणी.
 
‘एम पश्चिम’ प्रभाग - सुमन नगर इत्यादी दोन ठिकाणी.
 
‘एम पूर्व’ प्रभाग- चेंबूर इत्यादी एका ठिकाणी.
 
अशा तर्‍हेने मुंबईत वाहनतळे बांधली जाणार असून पार्किंग समस्या दूर होऊ शकेल. रस्त्यावर कमीतकमी वाहने वाहनतळ करून वाहतुकीचा खोळंबा करणार नाहीत, अशी व्यवस्था होईल असे वाटते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0