भारतीय लोकशाहीत अन्यायाविरोधात दाद मागण्याकामी आंदोलन छेडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्याचा उपयोग हा कधी सद्मार्गाने, तर कधी चुकीच्या माध्यमाने होताना दिसून येत असतो. सध्या नाशिकमध्ये शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अहमदाबाद येथे असलेल्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून गुजरात येथे निर्यात होणारा माल हा सध्या पडून आहे. त्यामुळे मागणी कमी आणि आवक जास्त, अशी अवस्था नाशिकमध्ये भाजीपाल्याची झाली आहे. त्यातच यंदा सर्वत्र पाऊस समाधानकारक झाला. त्यात कांदा बियाणेटंचाई निर्माण झाल्याने बहुतांशी शेतकर्यांनी भाजीपाला उत्पादित करण्याला पसंती दिल्याने, सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शेपू चार रुपये, मेथी आठ रुपये, कोथिंबीर सहा रुपये प्रतिजुडी विक्री होत आहे. भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने, काही संतप्त शेतकर्यांनी बुधवारी नाशिक बाजार समितीच्या आवारात भाजीपाला फेकून दिल्याचे दिसून आले. इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये भाजीपाला हा उत्पादित केला जातो. परंतु, यंदा समाधानकारक पावसामुळे येवला, नांदगाव, देवळा, सटाणा, पेठ, कळवण तालुक्यांमध्येही फळपिकांप्रमाणेच भाजीपाला उत्पादित करण्यात आला. त्यामुळे नाशिक बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. ही विपरीत स्थिती उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मोसमात होती. त्या काळात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते. तेव्हा एकही रुपया कमी करून भाजीपाला विक्री करावा, असे सौहार्द दाखविले गेले नाही. बळीराजा शेतातील पिकाला आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळ करत वाढवत असतो. त्यामुळे काही काळ भाव कमी मिळाला म्हणून शेतमाल चक्क फेकून देणे, हे किती संयुक्तिक आहे, याचा विचार होणे नक्कीच आवश्यक आहे. शेतमालाचे भाव हे कमी-जास्त होत असतातच. फायदा नाही म्हणून मालच फेकून देणे, हे केवळ उद्दामपणा दर्शविणारे लक्षण असल्याचेच या कृतीवरून वाटते. तेव्हा बळीराजाने आपले गाऱ्हाणे मांडण्याकामी इतर मार्गांचा अवलंब आगामी काळात करावा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
हौसेला आवर घाला!
हौशी आणि अप्रशिक्षित गिर्यारोहकांचे गिर्यारोहण हे कायमच संकटांना आमंत्रित करत असते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा नाशिकमध्ये अनुभवास आली. पांडवलेणीच्या माथ्यावर बुधवारी दुपारी रस्ता भरकटल्याने तीन तरुण अडकले होते. मागील बाजूने हे तरुण माथ्यापर्यंत पोहोचले खरे; पण उतरता येत नसल्याने अडकून पडले. यामुळे पोलिसांसह अग्निशमन दल आणि जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) पाचारण केल्यावर दीड तासाने या तरुणांची पांडवलेणीवरून सुटका करण्यात आली. या तीन तरुणांनी सकाळी ९ च्या सुमारास डोंगर चढण्यास सुरुवात केली. ११ च्या सुमारास तिघेही माथ्यापर्यंत पोहोचले. त्या वेळी माघारी फिरण्याचा रस्ता त्यांच्या लक्षात आला नाही. त्यांनी आरडाओरड सुरू केली. ही बाब डोंगरावरील एका व्यक्तीच्या लक्षात आल्यावर त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ११.३० च्या सुमारास पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सिडको उपकेंद्राच्या अग्निशमन विभागाला पोलिसांनी माहिती देताच बचाव पथक दाखल झाले. दुपारी १२ च्या सुमारास तरुणांना वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू झाले. तरुणांशी संपर्क होत नसल्याने भोंग्याच्या माध्यमातून बोलत त्यांना धीर देण्याचे कार्य पोलिसांनी केले. दुपारी २:३० च्या सुमारास तिघांची पथकातील जवानांशी भेट झाली. केवळ रस्ता समजत नसल्याने हे तरुण अडकल्याची बाब यावेळी उजेडात आली. त्यामुळे सर्व फौजफाटा व तिघेही तरुण व्यवस्थित पायथ्याशी आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना घरी पोहोचविले. हौशी ट्रेकर्सच्या उत्साहापायी पोलिसांसह यंत्रणेला किती त्रास होतो, याचे आणखी एक उदाहरण पांडवलेणी परिसरात घडले. तीन तरुणांना सुखरूप खाली आणणे यंत्रणेला शक्य झाले; अन्यथा भयंकर घटना घडली असती. यापूर्वीही पांडवलेणी व चामरलेणी तसेच इतरत्र अशा घटना घडल्या आहेत. मात्र, त्यातून तरुणाई काहीही बोध घेत नाही. कोरोना निर्बंधामुळे बंद असलेले ट्रेकिंगसह सर्व प्रकारचे पर्यटन नुकतेच सुरू झाल्याने उत्साहाच्या भरात ही कृती घडली असली तरी यापुढे अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे शक्य होईल का, याचा विचार प्रशासनाने करायला हवा.