गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्य़ा किनाऱ्यांवर आदळणाऱ्या लाटा निळ्या रंगाने प्रकाशित होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू किनाऱ्यावरील लाटांवर देखील निळ्या रंगाचा प्रकाश दिसला. याशिवाय सिंधुदुर्गातील देवगड आणि रत्नागिरीतील आंजर्ले किनाऱ्यावरही स्थानिकांनी असाच काहीसा प्रकार किनाऱ्यांवर आदळणाऱ्या लाटांवर पाहिला आहे. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' या सूक्ष्म जीवांच्या शरीरामधून निघाणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लाटांवर निळा रंग पसरला आहे. मात्र, या जीवांचे दर्शन राज्याच्या किनारपट्टीवर पहिल्यांदा झालेले नाही. गेल्या पाच वर्षांपासून या जीवांचे दर्शन रात्रीच्या वेळी किनारपट्टीच्या भागात होत आहे. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हे जीव मोठ्या प्रमाणात किनाऱ्यापट्टीनजीकच्या भागात येतात. या जीवांना धोका जाणवल्यास ते आपल्या शरीरातून चकाकणारा निळा प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळल्यामुळे या जीवांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते निळा प्रकाश उत्सर्जित करत असल्याने लाटांवर निळा प्रकाश पसरतो.