'कोविड-१९' महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वाफ घेण्याचा उपाय सूचविण्यात आला आणि त्याची रुग्णालयांत देखील अंमलबजावणी करण्यात आली. घरोघरीही अशाप्रकारे वाफारे अजूनही सुरुच आहेत. तेव्हा, वाफ घेण्याचे नेमके फायदे काय आणि वाफ घेताना कशी काळजी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
'कोविड-१९' पासून प्रतीकात्मक जे उपाय केले जातात, त्यात वाफारा (Stream Inhalation) हा एक महत्त्वाचा भाग आहे. आयुष मंत्रालयाने जे प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत, त्यात नस्याचा उल्लेख आहे. नस्य हे पंचकर्मांपैकी एक कर्म आहे. नस्य म्हणजे दोन्ही नाकपुड्यांमध्ये औषधी सिद्ध तेल, तूप, द्रव इ. घालणे होय. त्याच्या मात्रेनुसार त्याचे विविध प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. नस्याची पूर्वतयारी करताना चेहऱ्याला हलक्या हाताने कोमट तेल चोळणे व औषधी काढ्याची अथवा पाण्याची वाफ घेणे (म्हणजेच स्नेहन-स्वेदन करणे) हे येते. हल्ली घराघरातून वाफारा घेतला जातो, पण काही वेळेस त्याचे अपाय होताना दिसतात. त्वचा भाजते, लाल होते. (Burn & scalding) याची काही कारणे आहेत. या संदर्भात आजच्या लेखात जाणून घेऊया...
वाफारा घेतल्याने नाकापासून घशापर्यंतचा भाग जर कफाने, सर्दीने भराला असेल, तर मोकळा होतो. श्वसन प्रक्रियेत साहाय्यता मिळते. दाट कफ पातळ होऊन वाहून जातो आणि नासा(नासिका विवर) (Nasal Cavity) मोकळी व स्वच्छ होते. पण, वाफ घेताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. लहान मुलांना शक्यतो थेट वाफ देऊ नये (२ वर्षांपर्यंत) गरम कापडाने शेकावे किंवा थोडीच वाफ द्यावी. पण, मोठ्यांच्या देखरेखीखाली द्यावी. गॅस सुरु असताना पातेल्यातून वाफ घेणे खूप धोकादायक आहे. वाफ घेताना गरम पाणी छोट्या तोंडाच्या भांड्यात (तांब्यासारखे निमुळते तोंड असलेले) घ्यावे. ते भांडं व वाफ घेणाऱ्याचे डोकं (मानेपर्यंत) सुती कपड्याने झाकावे व वाफ घ्यावी. वाफ घेताना खूप जवळून घेऊ नये. खूप कालावधीसाठीही घेऊ नये. वाफ घेताना दरदरुन घाम येणे, अपेक्षित नाही. रोमरंध्रे मोकळी होऊन हलका घाम आला तरी पुरेसा असतो. वाफ घेताना मान हळूहळू सतत हलवावी. म्हणजे एक जागी सतत वाफ घेऊ नये. कपाळावर गालांवर, नाकातून-कानातून-तोंडातून वाफ घ्यावी. मानेवरही वाफ घ्यावी. पण, डोळ्यांना वाफेपासून वाचवावे. (डोळ्यांवर थेट वाफ घेऊ नये, दृष्टीसाठी ते हितकर नसते.) सहसा वाफ घेताना कपाळापासून सुरु करुन मानेपर्यंत वाफ घ्यावी व पुन्हा मानेपासून कपाळापर्यंत घ्यावी. हलकीशी हालचाल कायम असावी अन्यथा त्वचा भाजते, जळते. डोकं व वाफारा ज्यातून घेतला जातो, ते भांड दोन्ही नीट झाकले जाईल इतके मोठे सुती कापड असावे, नाहीतर काही वेळेस कापडाचे टोक पाण्यात बुडूनही चटका लागतो. वाफ घेताना चेहऱ्याचे अंतर व वाफ ज्यातून येते, त्या पात्राचे अंतर साधारणपणे ८-१० इंच इतके असावे. खूप जवळून वाफ घेऊ नये. संवेदनशील त्वचा असलेल्यांना खूप वेळ वाफ घेतलेली सहन होत नाही. त्यांची त्वचा लाल होऊन बारीक पुरळही येतात, तसेच रोज वाफही उन्हाळ्यामध्ये घेऊन अशा व्यक्तींना त्रास होऊ शकतो. वाफ घेण्यापूर्वी जर चेहऱ्याला हलक्या हाताने खोबरेल तेल लावले, हलके जिरवले तर अधिक फायदेशीर ठरते, तेलामुळे त्वचा लगेच तापत नाही व भाजत नाही. एक सुरक्षेचा थर चेहऱ्यावर निर्माण होतो. थंडीत तीळ तेल व उन्हाळ्यात खोबरेल तेल लावले तर चांगले.
वाफ घेताना नुसत्या पाण्याची वाफ न घेता, त्यात निलगिरी तेलाचे एक-दोन थेंब घातले, तर नासा (nasal cavity) अधिक मोकळी झालेली जाणवतात, तसेच ओव्याचा अर्क घालून वाफ घेतली तरी फायदा होतो. भीमसेनी कापूर घालून पाणी उकळावे व ते गाळून त्या पाण्याची वाफ घ्यावी. साध्या पाण्यापेक्षा वरील प्रकारचे उपाय केल्यास अधिक गुणकारी ठरतात. वाफ सहसा दिवसातून एकदाच घ्यावी. हाय रिस्क कर्मचाऱ्यां नी कामावरुन घरी आल्यावर नक्की वाफ घ्यावी. इतरांनी सकाळी अंघोळीपूर्वी किंवा सायंकाळी/झोपेपूर्वी घ्यावी. दुपारच्या उन्हात सहसा वाफ घेणे टाळावे. वाफारा घेताना पातेल्यातून/उघड्या भांड्यातून उकळत्या पाण्याची वाफ घेण्यापेक्षा इलेक्ट्रिक स्टिमरने घ्यावी किंवा पातेल्यावर जाळी ठेवून वाफ घेतल्यास वाफेने भाजण्याची शक्यता कमी होते. सध्या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांमधील वाफारा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. बरेच लोक हे नित्यनियमाने करतातही, पण काहींना त्याचा अंदाज येत नाही आणि चेहरा भाजतो. काही वेळेस ते पाणी उकळते, अंगावर उडते/ सांडते आणि छाती पोट, मांडी जननेन्द्रिये इ. भाग भाजला जातो. तेव्हा हे टाळण्यासाठी उघड्या तोंडाचे भांडे वापरणे टाळावे, याबरोबरच वर नमूद केलेली खबरदारीही पाळावी. (आठ-दहा इंच अंतर, एकाच जागी सतत वाफ घेणे, कोरड्या त्वचेवर वाफ घेणे इ. टाळावे.)
जर वाफाऱ्याने त्वचा लाल झाली, झोंबू लागली तर सर्वप्रथम वाफारा थांबवावा. गुलाबजल लावावे. त्यावर खोबरेल तेल लावावे. (खोबरेल तेलात व्रणरोपक गुणधर्म असल्याने उपयोगी पडते. तसेच गुलाबजलाने चेहऱ्याची होणारी आग आणि लाली कमी होते.) जर त्वच्या भाजली, तर त्यावर शतधौत घृत लावावे. जात्यादी तेलाचाही चांगला उपयोग होतो. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी केळीच्या सालीची आतली बाजू भाजलेल्या त्वचेचर लावावी. केळीचे पान बांधले तरी गुण येतो. केळ्यामध्ये 'Anti Burn Poperties' आहेत, पण भाजलेली त्वचा कोरडी असल्यास बांधून (ड्रेसिंग) करून ठेऊ नये. त्यावर तेल लावून ती उघडी सोडावी. ती जखम लवकर भरून येते, पण त्यावर धूळ व अन्य मातीचे कण लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ओली वाहणारी जखम असल्यास ती वाळेपर्यंत वरील औषधांनी ड्रेसिंग करावे. हे ड्रेसिंग नियमित बदलावे. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अन्य औषधी चिकित्सा सुरू करावी. त्वचा भाजलेली भरली, पण त्याचा डाग राहिला असे बऱ्याचदा होते. हे डाग लगेच जात नाहीत. (काही वेळेस ते अस्पष्ट होतात, पण पूर्ण जात नाहीत.) अशा डागांसाठी जात्यादी तेल, जुनं तूप आणि मध इ. खूप उपयोगी ठरते, तसेच रक्तचंदनाचा लेपही गुणकारी ठरतो. वाफारा(वाफ) घेणे, नेती, नस्य हे उपक्रम 'कोविड- १९' पासून प्रतिबंध व्हावा म्हणून नित्य दिनचर्येत अवलंब करावा, असे आहेत. 'कोविड-१९' होऊ नये म्हणून तर या उपक्रमांचा फायदा होतोच, पण Asymptomatic, mild to moderate symptoms असतानाही ते लवकर कमी होऊन आटोक्यात येण्यास उपयोगी ठरतात. आयुष मंत्रालयाने जे आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत, त्याबद्दल पुढील लेखांमधून अधिक जाणून घेऊया. (क्रमशः)