दहशतवाद्यांचा स्वर्ग असलेल्या पाकिस्तानच्या उलट्या बोंबा...

21 Nov 2020 21:53:58

df_1  H x W: 0
 
 
 
पाकिस्तानात हिंसाचार भारतीय पुरस्कृत गुप्तहेर संस्थांच्या एजंट्सनी केला की, पाकिस्तानमधल्या असंतुष्ट नागरिक गटांनी केला, याचे उत्तर शोधावे लागेल. दुसऱ्या देशांमध्ये दहशतवाद वाढविणे हे भारताच्या धोरणांमध्ये बसत नाही. भारताने पाकिस्तानमधील असलेल्या वेगवेगळ्या गटांना दिलेला सपोर्ट, दिलेली मदत ही नैतिक स्वरूपातली आहे आणि त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांना जगाच्या समोर आणण्याचा भारताचा प्रयत्न असतो.
 
 
पाकिस्तानला जोरदार तडाखा
 
‘एलओसी’वर विविध ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने जोरदार तडाखा दिला आहे. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात आठ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, त्यामध्ये पाकच्या एसएसजीच्या कमांडोंचाही समावेश आहे. त्याचवेळी भारतीय सैन्याचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत, ज्यातील दोन महाराष्ट्राचे आहेत. पाक सैन्याने मॉर्टर आणि रणगाडे विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाक सैन्याचे बंकर, इंधन डेपो आणि लॉन्च पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
 
 
दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकारच
 
 
गेल्या वर्षी फेब्रुवारीत पुलवामामध्ये ‘सीआरपीएफ’वर झालेला आत्मघातकी हल्ला हे इमरान सरकारचे आणि संपूर्ण देशाचे यश असल्याचे सांगत, पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी आजवरच्या साऱ्या दहशतवादी कारस्थानांची कबुली दिली आहे. आजही जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकारच असल्याचे मान्य केले आहे. ‘पुलवामामध्ये आम्ही घुसून मारले,’ अशी शेखी मिरवत त्यांनीच दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली. नुकतेच मच्छील आणि केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावले, ज्यामध्ये २४ वर्षीय कॅप्टन आशुतोष यांनी तीन दहशतवाद्यांना मारताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. भारतीय लष्कराने ‘ठोशास ठोसा’ न्यायाने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला ‘सळो की पळो’ करून सोडले आहे.
 
पाकिस्तानात दहशतवादी कारवायांना पाठबळ
 
दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांनी आणि पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’विरोधात गरळ ओकली. एक पत्रकार परिषद घेऊन भारतच कसा पाकिस्तानात दहशतवादी कारवायांना पाठबळ देत आहे आणि त्याचे आपल्यापाशी कसे पुरावे आहेत, त्यासंबंधीच्या वल्गनाही त्यांनी १५ नोव्हेंबरला केल्या. अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीतील भारतीय सैन्याच्या गुप्तहेर संघटना ‘डीआयए’ व ‘रॉ’चे अधिकारी पाकिस्तानातील विविध दहशतवादी संघटनांना शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षण पुरवत आहेत, त्यांचे एकत्रीकरण करीत आहेत, पाकिस्तानमध्ये एक दहशतवादी हल्ला करण्यासाठी ‘रॉ’कडून एक कोटी रुपये दिले जात आहेत. भारताकडून पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायाला देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी आरोप केला की, भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या मदतीने ‘दायश-ए-पाकिस्तान’ ही दहशतवादी संघटना तयार केली आहे. भारतातील २० दहशतवाद्यांना पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर दाखल करण्यात आले आहे. त्यांना ‘दायश’चे कमांडर शेख अब्दुल रहीम उर्फ अब्दुल रहीम मुस्लीमकडे सोपविण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरपासून अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत दहशतवाद्यांची शिबिरे चालविणाऱ्या पाकिस्तानने भारतावर ८७ दहशतवादी शिबिरे चालवत असल्याचा आरोप केला आहे.
 
अफगाणिस्ताच्या जमिनीचा वापर
 
भारताने बलुचिस्तानमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी एक गट स्थापन केला असून, यामध्ये ७०० दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ने चीनचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर’ उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय अफगाणिस्ताच्या जमिनीचा वापर करून भारत दहशतवाद फैलावत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची भीती कुरैशी यांनी व्यक्त केली. भारताच्या ८७ दहशतवादी शिबिरांपैकी ६६ शिबिरे अफगाणिस्तानमध्ये आहेत. भारताकडून आत्मघाती हल्ले आणि आयईडी स्फोटासाठी, महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी ‘रॉ’कडून मोठे बक्षीस दिले जात आहे.
 
अंतर्गत असंतोष उफाळून आला
 
 
पाकिस्तानच्या बलुचिस्तान, गिलगिट- बाल्टिस्तान, खैबर पख्तुनख्वा, पाकव्याप्त काश्मीर या सर्व प्रदेशांमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याला पाकिस्तान सैन्य आणि सरकारची आजवरची धोरणे आणि कारवायाच कारणीभूत आहेत. बलुचींवरील अनन्वित अत्याचार, गिलगिट-बाल्टिस्तानातील हैदोस, पाकव्याप्त काश्मीरमधील स्वातंत्र्याच्या मागणीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न हे सगळे पाकिस्तान सतत करीत आला आहे. परिणामी, या दडपशाहीविरुद्ध तेथील तरुणांनी शस्त्रे हाती घेतली. या सगळ्या असंतोषामागे भारतच आहे, असा दावा पाकिस्तानने करणे मुळातच हास्यास्पद आहे. स्वतः भारत धगधगत ठेवण्याचे प्रयत्न करायचे, शहरा-शहरांतून बॉम्बस्फोट घडवायचे, काश्मीर आणि पंजाबमधील फुटीरतावादी प्रवृत्तींना सतत खतपाणी घालायचे, नक्षलवाद्यांशी संधान बांधायचे आणि एवढे सगळे करून भारताने हे सगळे निमूट सोसायची अपेक्षा बाळगायची. आता भारताची संरक्षणनीती बदलली आहे. आता भारत निमूट मार खाणार नाही, हा संदेश पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘बालाकोटची कारवाई’ या सगळ्यातून कृतीद्वारेही स्पष्टपणे पोहोचविला गेला आहे. एवढे असूनही जर पाकिस्तान सुधारणार नसेल, तर भारताने जशास तसे, असे उत्तर दिले तर पाकिस्तानने तक्रार का करावी? भारताने ‘ठोशास ठोसा’ लगावला असे जरी मानले, तरी पाकिस्तानने कांगावा का बरे करावा?
दाऊद इब्राहिमपासून हाफीज सईद आणि मसुद अजहरपर्यंतच्या दहशतवाद्यांना आसरा आणि पाठबळ देणारा, भारतामध्ये सतत घातपात घडवणारा, भारताने सबळ पुरावे देऊनही कारवाई न करणारा पाकिस्तान आता तक्रार करत आहे. मात्र, याच वेळी मुंबई २६/११ हल्ल्यातील आरोपी आणि दहशतवादी हाफीज सईदला, ‘जमात-उद-दवा’च्या प्रवक्त्याला, पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ३२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
 
 
पाकिस्तान ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ ‘ग्रे लिस्ट’मध्ये 
 
 
दरम्यान, ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) या संस्थेच्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर येण्यासाठी धडपड करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. मागील महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या ‘एफएटीएफ’च्या ऑनलाईन बैठकीमध्ये पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्येच ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दहशतवाद्यांची आर्थिक मदत पूर्णपणे रोखण्यात पाकिस्तानी सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे आगामी फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्येच राहावे लागणार आहे, असे ‘एफएटीएफ’चे अध्यक्ष मार्कस प्लीयर यांनी सांगितले.
 
 
भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील दोन दहशतवादी मौलाना मसूद अझर आणि हाफीज सईद यांच्यावर कारवाई आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत यादीतील चार हजारांहून अधिक दहशतवादी अचानक गायब होणे, याचीही नोंद घेण्यात आली. ‘एफएटीएफ’ने दिलेल्या सहा प्रमुख जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. काळ्या यादीत समावेश न होता ‘ग्रे’ यादीत स्थान राहणे, हीच बाब पाकिस्तानसाठी दिलासादायक ठरली. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळविण्यास पाकिस्तानला अडचणी येणार आहेत. यामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
भारताने काय करावे?
 
भारत, पाकिस्तानात दहशतवादी व असंतुष्ट घटकांना मदत करत आहे, याचे पुरावे आंतरराष्ट्रीय संस्थांपुढे मांडण्याची धमकी पाकिस्तानने दिली आहे. २००१ ते २०२०च्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये १९ हजार १३० दहशतवादी हल्ले झाले होते. यामध्ये २३ हजार नागरिक आणि नऊ हजारांहून जास्त सैन्य आणि पोलीस कर्मचारी मिळून ३२ हजार लोक मारले गेले. यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान हे १२६ कोटी डॉलर एवढे झालेले आहे, अशी आकडेवारी पाकिस्तानने दिली आहे.
 
 
आधी पाकिस्तानचे ८५ टक्के सैन्य हे भारत-पाकिस्तान सीमेवरती असायचे.आता ५० टक्के सैन्य हे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेच्या वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्याकरिता वापरले जाते. याशिवाय बरेचशे सैन्य हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सीमेवर तैनात आहेत. कारण, पाकिस्तानला वाटते की, अफगाणिस्तानमधून अनेक दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये प्रवेश करतात.
 
 
मात्र, पाकिस्तानात हिंसाचार भारतीय पुरस्कृत गुप्तहेर संस्थांच्या एजंट्सनी केला की, पाकिस्तानमधल्या असंतुष्ट नागरिक गटांनी केला, याचे उत्तर शोधावे लागेल. दुसऱ्या देशांमध्ये दहशतवाद वाढविणे हे भारताच्या धोरणांमध्ये बसत नाही. भारताने पाकिस्तानमधील असलेल्या वेगवेगळ्या गटांना दिलेला सपोर्ट, दिलेली मदत ही नैतिक स्वरूपातली आहे आणि त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांना जगाच्या समोर आणण्याचा भारताचा प्रयत्न असतो.
 
 
अर्थात पाकिस्तानला जर असे वाटत असेल की, भारताने तेथील युवकांना शस्त्रे पुरवली, प्रशिक्षण दिले, तिथे दहशतवाद वाढविण्याचा प्रयत्न केला, तर त्याकरिता त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाला हे पुरावे देऊन सिद्ध करावे लागेल. तोपर्यंत जगातला कुठलाही देश पाकिस्तानी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांवर लक्ष देणार नाही. मात्र, जर पाकिस्तानने भारतात दहशतवाद वाढविणे थांबविले नाही, तर ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत त्यांचा समावेश होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0