कपिल सिब्बल यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. ‘राजा कधी चूक करीत नाही’ अशी मानसिकता असणार्या पक्षात राजघराण्याविषयी प्रश्न उपस्थित करणे, हे धोकादायक असते. सतराव्या-अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये कुणी असे धाडस केल्यास त्याचा शिरच्छेद केला जाई. काँग्रेसमध्ये कुणी असे धाडस केल्यास त्याला पक्षातून काढून टाकण्यात येते अथवा त्याची हकालपट्टी होते.
इंग्लंडच्या राजाविषयी असे म्हटले जाते की, राजा कधी चूक करीत नाही. (king can do no wrong) राजा ईश्वराचा प्रतिनिधी! त्यामुळे तो चुका कसा करणार? ईश्वर कधी चुका करीत नाही. राजाचे मंत्री चुका करतात, त्याचे सल्लागार चुका करतात, म्हणून शिक्षा करायची झाली तर त्यांना करायला पाहिजे. राजा नेहमी निर्दोष असतो. इंग्लंडच्या राजेशाहीत हा मंत्र निष्ठेने जगण्यात येतो. हाच मंत्र काँग्रेसच्या घराणेशाहीत निष्ठेने अंमलात आणला जातो.
नेहरू-गांधी घराण्यातील सर्वोच्च नेता कधीही चुकत नाही. चुका दुय्यम नेते करतात. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्याला काँग्रेसचे अध्यक्ष आणि राजपुत्र राहुल गांधी जबाबदार नसतात. पराभव नेते आणि अनुयायी यांच्यामुळे होतो. नेतृत्वामुळे पराभव होत नाही. यासाठी सर्वोच्च नेत्यावर पराभवाचे खापर फोडता येत नाही, त्याला दोषी ठरविता येत नाही. तो राजा आहे, तो चूक कशी करणार?
बिहारमध्ये निवडणुका झाल्या, मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणुका झाल्या. बिहारमध्ये काँग्रेसने ७० जागा लढविल्या, त्यापैकी फक्त १९ जागा काँग्रेसला जिंकता आल्या, मध्य प्रदेशमध्ये फक्त आठ जागा जिंकता आल्या. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाला जबाबदार कोण? पराभवाला जबाबदार सोनिया गांधी नाहीत, राहुल गांधी नाहीत आणि प्रियांका गांधीदेखील नाहीत, जबाबदार स्थानिक नेते आहेत. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांच्या क्षमतेबद्दल कुणी चर्चा करीत नाहीत. अशी चर्चा करण्याचे धाडस काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केले.
कपिल सिब्बल म्हणतात की, “बिहारमधील मतदार असो, गुजरातमधील असो की मध्य प्रदेशातील असो, तो काँग्रेसला सशक्त पर्याय म्हणून मानतच नाही. गुजरातमध्ये दोन टक्के मते मिळाली. तीन उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले. या पराभवाचे काँग्रेसने आत्मचिंतन करायला पाहिजे.” कपिल सिब्बल पुढे म्हणतात की, “संघटनात्मकदृष्ट्या काय चुकत आहे हे आम्हाला समजतं, काँग्रेस पक्षालादेखील उत्तरे माहीत आहेत, पण ते स्वीकारायला तयार नाहीत. ती जर स्वीकारली नाहीत, तर अपयशाचा हा विषय संपणारा नाही.”
कपिल सिब्बल यांचा संपूर्ण रोष काँग्रेस नेतृत्वावर आणि काँग्रेस वर्किंग कमिटीवर आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीत निर्णय घेणारी सर्वात मोठी समिती आहे. या समितीमध्ये लोकशाही पद्धतीने सभासदांची निवड केली जात नाही. त्यांची नेमणूक केली जाते. नेमणूक केलेले सभासद निवडणुकांमागून निवडणुकांतील पराभवाविषयी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. कपिल सिब्बल यांना असे म्हणायचे आहे की, काँग्रेस वर्किंग कमिटी समितीतील सभासद ‘होयबा’ आहेत, ते स्वतंत्र विचार करू शकत नाहीत. याचा अर्थ असा होतो की, विचार करण्याचे काम फक्त नेहरु-गांधी घराण्याने करायचे आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय कुणी विचार करायचा नाही. आपली स्वतंत्र मते मांडायची नाहीत. त्यांच्यावर टीका करायची नाही.
ऑगस्ट महिन्यात २२ वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले. काँग्रेसच्या दयनीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. काँग्रेसला पूर्णकालीन अध्यक्ष हवा, अशी काहीजणांनी मागणी केली. त्या सर्वांचे आवाज दाबून टाकण्यात आले. कपिल सिब्बल म्हणतात की, “पक्षात काही संवाद होत नसल्यामुळे नाईलाजाने मला माझी मते जाहीरपणे व्यक्त करावी लागतात. मी काँग्रेसचा माणूस आहे आणि काँग्रेसचाच माणूस राहणार. माझी अशी इच्छा आहे की, काँग्रेसने सत्ताधारी पक्षाला समर्थ पर्याय दिला पाहिजे. हे त्यांनी आपली व्यथा व्यक्त करताना म्हटले की, मध्य प्रदेशमधील २८ जागांपैकी फक्त आठ जागा आम्ही जिंकू शकलो आहोत. लोक आम्हाला पर्याय म्हणून स्वीकारायला तयार नाहीत, आता ठोस कृतीची आवश्यकता आहे.”
कपिल सिब्बल यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. ‘राजा कधी चूक करीत नाही’ अशी मानसिकता असणार्या पक्षात राजघराण्याविषयी प्रश्न उपस्थित करणे, हे धोकादायक असते. सतराव्या-अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये कुणी असे धाडस केल्यास त्याचा शिरच्छेद केला जाई. काँग्रेसमध्ये कुणी असे धाडस केल्यास त्याला पक्षातून काढून टाकण्यात येते अथवा त्याची हकालपट्टी होते. कपिल सिब्बल यांचे काय होणार, हे आपल्याला आणखी काही दिवसात समजेल. हा धोका कपिल सिब्बल यांनी पत्करला आहे. मूकदर्शक बनून बसायचे नाही, असे त्यांनी ठरविले, म्हणून त्यांचे अभिनंदन! काँग्रेसचे मुख्य दुखणे समर्थ केंद्रीय नेतृत्वाचे आहे. आज असे समर्थ नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही, ही मुख्य समस्या आहे.
या समस्येवर उपाय कोणता? पर्याय दोन आहेत. पहिला पर्याय राहुल गांधींना पर्यायी नेतृत्व शोधण्याचा आणि दुसरा पर्याय सामूहिक नेतृत्व उभे करण्याचा आहे. पहिला पर्याय अंमलात येणे महाकठीण गोष्ट आहे. नेहरू-गांधी घराण्याने आपल्याला पर्यायी नेतृत्व उभे राहणार नाही, याची भरपूर काळजी घेतलेली आहे. त्याची खूप उदाहरणे आहेत. शरद पवार काँग्रेसमध्ये होते, लोकसभेत ते काँग्रेसचे नेते होते, त्यांना डावलून सोनिया गांधींच्या हातात सर्व सूत्रे देण्यात आली.
शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रणव मुखर्जी हे डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा अनेक पटीने कर्तबगार होते, त्यांना डावलून ‘होयबा’ मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले. दहा वर्षे त्यांचे सरकार होते, पण सर्व सत्ता सोनिया गांधी यांच्या हातात होती. डॉ. मनमोहन सिंग कळसुत्री बाहुलीप्रमाणे नाचत राहिले. त्यांच्या जागी प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते, तर भाजपला केंद्रात सत्ता मिळविणे सोपे गेले नसते.
आज काँग्रेस पक्षात अखिल भारतीय मान्यता असलेला एकही राजनेता नाही. कपिल सिब्बल यांचे म्हणणे कितीही खरे असले तरी आणि ते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असले तरी देशभर त्यांना मान्यता नाही. काँग्रेस पक्षातही त्यांना देशव्यापी मान्यता नाही. तारीक अन्वर, शशी थरूर, विरप्पा मोईली, अशोक गेहलोत इत्यादी काँग्रेस पक्षातील नावे वजनदार आहेत. परंतु, त्यांना देशव्यापी मान्यता नाही. यापैकी कोणीही प्रमाणाबाहेर मोठा होता नये, याची काळजी गांधी घराणे घेत असते. ते दरबारातील हुजरे बनून राहावेत, असा प्रयत्न असतो.
काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वही उभे राहू शकत नाही. राजकीय पक्ष सामूहिक नेतृत्वावर चालत नाही. समूहाचे नेतृत्व करणारादेखील नेता लागतो. १७९५च्या फ्रेंच राज्यघटनेने सामूहिक नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. त्याला ‘डिरेक्टरी’ असे म्हटले गेले. ‘डिरेक्टरी’तील प्रत्येक नेता दुसर्याचे पाय कसे खेचता येतील, याच्यामागे लागला. देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि शेवटी नेपोलियनला सर्व सत्ता आपल्या हाती घ्यावी लागली. सिद्धांत म्हणून सामूहिक नेतृत्व ऐकायला गोड असते, व्यवहारात त्याची उपयुक्तता शून्य असते.
राहुल गांधी देशाला पर्यायी नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांना मी पर्याय आहे, हे लोकांत बिंबविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीवर ते टीका करीत राहतात. मोदींचे चीन धोरण चुकीचे आहे, पाकिस्तान धोरण चुकीचे आहे, आर्थिक धोरणे चुकीची आहेत, कोरोना रोखण्यासाठी मोदी अपयशी झाले आहेत, मोदी सांप्रदायिक आहेत, राज्यघटनेची मूल्ये मोदी काळात धोक्यात येत चालली आहेत, ते मुस्लीमविरोधी आहेत, अशी आरोपांची मालिका लांबलचक आहे.
विरोधी पक्षनेत्याला सत्ताधारी पक्षनेत्याविरूद्ध असे बोलावेच लागते. पण, असे काही बोलताना त्यामागे सबळ तार्किक कारणे द्यावी लागतात. आरोपात जीव निर्माण करण्यासाठी पुरावे द्यावे लागतात. राहुल गांधींकडे यापैकी काहीही नसते. म्हणून त्यांची बडबड लोक गंभीरपणे घेत नाहीत. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग केले जातात, वाचकांना ते माहीत आहेत, त्यामुळे ते येथे देण्याचे कारण नाही.
बराक ओबामा यांचे ’ए प्रॉमिस लॅण्ड’ या नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते त्यांचे आत्मकथन आहे. वेगवेगळ्या देशांचे राजकीय नेते त्यांना कसे वाटले, याबद्दल त्यांनी आपली मते मांडली आहेत. राहुल गांधींविषयी ते म्हणतात, राहुल गांधी हे त्यांना अल्पज्ञानी आणि उदास वाटले. विद्यार्थ्याशी तुलना करताना ते म्हणतात की, आपल्या गुरूला प्रभावी करण्यासाठी विद्यार्थी धडपडतो, पण त्याच्याकडे विषयावर प्रभुत्व मिळवाण्याची आंतरिक शक्ती आणि ओढ याचा अभाव असतो.
ओबामा यांना म्हणायचे आहे की, राहुल गांधी असे आहेत. राजा कधी चूक करीत नाही, या मानसिकतेत वाढलेल्या काँग्रेसी नेत्यांना बराक ओबामा यांचे वक्तव्य आवडले नाही, त्यांनी त्यावर टीका केली. बराक ओबामा यांना राहुल गांधी यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा नरेंद्र मोदी यांनी दिली. या घोषणेची अंमलबजावणी करण्याचे काम गांधी घराणे प्रामाणिकपणे करीत आहे, असा या विषयाचा कुणी अर्थ काढल्यास त्याला दोष देता येणार नाही.