संप्रदायाची यशस्विता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020
Total Views |

Swami Ramdas _1 &nbs
 
 
संप्रदायातील शिष्यांच्या संदर्भात विचार करायचा तर शिष्य चारित्र्य संपन्न तर असला पाहिजेच. परंतु, त्यापुढे जाऊन माया, ब्रह्म समजून वागणार्‍या शिष्याच्या हातून लोकोद्धाराचे काम अधिक चांगले होईल. कारण, शिष्य चांगला वागत असला तरी समुदायात गेल्यावर तो मायेच्या पसार्‍यात कसा अडकत जाईल ते सांगता येत नाही.
 
 
प्रसमुदायात जाऊन लोकोद्धाराचे काम करण्यासाठी ज्या शिष्याची निवड होत असे, त्याचे चारित्र्य सर्वदृष्ट्या स्वच्छ व निर्मळ असेल, तरच त्याला समर्थ संप्रदायात प्रवेश मिळत असे, हे आपण मागील लेखात पाहिले. शिष्यामुळे संप्रदायाला कुठल्याही प्रकारे कमीपणा येणार नाही, याची दक्षता समर्थ घेत असत. सर्व शिष्यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, ही अट सांप्रदायिक स्वखुशीने पाळत रामोपासनेची अट कोणत्याही परिस्थितीत पाळली जात असे.
 
 
 
तथापि रामदास हे शिष्यांच्या अंगच्या गुणांवर अवलंबून असे. त्या गुणांचा उत्कर्ष साधून संप्रदाय यशस्वी कसा करता येईल, याकडे स्वामींची सदैव दृष्टी असे. ‘तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य’ ओळ असलेले स्फूट समर्थांनी शिष्यांच्या ठिकाणी कोणत्या गुणांचा उत्कर्ष झाला पाहिजे, हे सांगण्यासाठी लिहिले. त्यातील पहिल्या तीन कडव्यांची चर्चा आतापर्यंत झाली आहे. आता त्यापुढील कडव्यात कोणते गुण सांगितले आहेत ते पाहू.
 
 

जैसें मुखें बोलणे तैसी क्रिया चालणे।
तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य॥४॥
 
 
आपण स्वत:ला ‘रामाचे दास’ म्हणून घ्यायचे तर बोलल्याप्रमाणे वागले पाहिजे. श्रीरामांचा आदर्श पाहिला तर वडिलांनी कैकयीला जी वचने दिली होती, त्यांचे पालन करण्यासाठी श्रीरामांनी राज्यत्याग करुन १४ वर्षे वनात जायचे ठरवले आणि त्याप्रमाणे ते वागले. मध्यंतरी भरताने व इतरांनी कितीही आग्रह केला तरी श्रीराम परत फिरले नाहीत. तथापि काही जण नुसते मोठमोठ्या गप्पा मारतात, पण त्याचप्रमाणे वागत नाहीत. असले बोलघेवडे कृतिशून्य शिष्य समर्थांना संप्रदायात नको होते. संप्रदायात सर्वांनी जसे बोलावे तसेच वागले पाहिजे, आपला शब्द खाली पडू देऊ नये, असे समर्थांचे सांगणे असे. आपल्याकडील सर्व संतांनी ‘बोले तैसा चाले’ यावर भर दिला आहे.
 
 
संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की,
 

बोले तैसा चाले। त्याची वंदीन पाउले॥
अंगे झाडीन अंगण।त्यांचे दास्यतव करीन॥
त्याचा होईन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर।
तुका म्हणे देव। त्याचे चरणी माझा भाव।
 
 
बोलल्याप्रमाणे जो वागतो त्याचे महत्त्व तुकाराम महाराजांनी या अभंगात स्पष्ट केले आहे. समर्थांनीही दासबोध ग्रंथात हेच सांगितले आहे.
जैसे बोलणे बोलावें। तैसेचि चालणे चालावें।
मग महंतलीला स्वभावें। आंगी बाणे॥ (दा.१२.९.२३)
बोलण्यासारखे चालणें। स्वयें करुन बोलणे।
तयाची वचने प्रमाणे। मानिती जनी॥ (दा.१२.९.२३)
 
 
माणसाने विचार करुन बोलावे हे खरे. परंतु, एकदा बोलले की त्याप्रमाणे वागले पाहिजे, तरचं लोक आपला मान ठेवतील आणि आपले ऐकतील. संप्रदायातील महंतांना जनसमुदायात जाऊन काम करायचे असल्याने हा गुण त्यांच्यासाठी आवश्यकच होता. बोलण्याप्रमाणे वर्तन ठेवले तर महंताला शोभेल असे वागणे सहजच अंगी बाणते. जो बोलेल तसा वागतो आणि आधी स्वत: कृती करुन मगच लोकांना सांगतो, अशा पुरुषांच्या शब्दाला समाजात मान असतो. रामदास्य करणार्‍या माणसाने जसे बोलू तसे वागले पाहिजे, स्वामी या स्फुटात पुढे सांगतात-
 
मायानिवर्तक ज्ञाने। ज्ञेयचि पैं होणे।
तरीच श्लाघ्यवाणे। रामदास्य॥५॥
रामदास म्हणे। निर्गुण सुख लक्षणे।
तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य॥६॥
मायेचे सर्व विश्व व्यापून टाकले असले तरी ज्ञानाचा साहाय्याने मायेचे निवारण करता येते, परब्रह्म जाणण्यासाठी ते स्वत:च झाल्याशिवाय त्याचा अनुभव घेता येत नाही, या ब्रह्मज्ञानाने माया वेगळी काढता येते व मायेचे मिथ्यत्व समजता येते. इंद्रियांद्वारा दिसणार्‍या बाह्यवस्तूचे ज्ञान इंद्रियाद्वारा मिळवण्याची मनाला सवय झालेली असते. त्यामुळे दृश्य वस्तू खरी आहे, असे आपण धरून चालतो. हाच मायेचा पसारा आहे, असे वर्णन अध्यात्मशास्त्रात येते. मायेमुळे दृश्यवस्तू असत्य असून ती खरी आहे असे वाटते आणि आत्मवस्तू म्हणजे ब्रह्म हे अविनाशी व खरे असूनही ते असत्य आहे, असे वाटते. आपल्याला आत्मस्वरुपाचा विसर पडल्याने इंद्रियांद्वारा अनुभवाला येणारे चराचर विश्व आपण शंभर टक्के खरे आहे, असे धरुन चालतो. त्यामुळे मायेच्या पसार्‍याखाली ब्रह्म झाकले गेले, असे म्हणण्याचा प्रद्यात आहे. परंतु, साधुपुरुष मात्र मायेचा पसारा दूर सारुन ब्रह्मस्वरुपाची प्राप्ती करुन घेतात.
 
 
सकळ माया विस्तारली। ब्रह्मस्थिती अछयादली ।
परी ते निवडून घेतली। साधुजनी॥
मायेला सारून ब्रह्मस्थिती अनुभवली तर ‘जन्ममरण’ यातून सुटका होते. पण हे कसे करायचे हे संत जाणतात. त्यामुळे त्यांना शरण गेल्यावर ही ब्रह्मस्थिती अनुभवून तुम्ही मोक्षाचे धनी व्हाल.

माया ब्रह्माचे विवरण। करिता चुके जन्ममरण।
संतास गेलिया शरण। मोक्ष लाभे॥
माया आणि ब्रह्म यांचा अभ्यास अधिकारी व्यक्तींच्या, संतांच्या हाताखाली राहून त्यांना शरण जाऊन केल्यास जीवनाचे कोडे उलगडते. संप्रदायातील शिष्यांच्या संदर्भात विचार करायचा तर शिष्य चारित्र्य संपन्न तर असला पाहिजेच. परंतु, त्यापुढे जाऊन माया, ब्रह्म समजून वागणार्‍या शिष्याच्या हातून लोकोद्धाराचे काम अधिक चांगले होईल. कारण, शिष्य चांगला वागत असला तरी समुदायात गेल्यावर तो मायेच्या पसार्‍यात कसा अडकत जाईल ते सांगता येत नाही. शिष्याने प्रथम स्वतःचा उद्धार करुन घेऊन मग लोकोद्धाराच्या कामाला लागावे. समर्थ रामदास स्वामी स्वतः पूर्ण, ब्रह्मज्ञानी होते.
त्यामुळे आपले शिष्यही प्रथम ब्रह्मज्ञानी झाले पाहिजे, अशी त्यांची तळमळ होती. परब्रह्म जाणण्याच्या प्रक्रियेत खरी अडचण आपल्या देहबुद्धीची असते. देहबुद्धी, अहंकार वृथाभिमान बाजूला सारून आत्मबुद्धीचा आश्रय केल्यावर जीवनात परिवर्तन घडून येते. त्यातून निर्गुण परब्रह्म जाणता येते. निर्गुण जाणणे ही सुखाची लक्षणे आहेत. त्यातून निर्भयता अंगीकारता येते. कसलीही भीती न बाळगता असा आत्मसुखी निर्भय माणूस चारित्र्यसंपन्न तर असतोच, पण लोकाद्धाराचे काम करताना कसल्याही अडचणींना तो सहज सामोरा जातो. एकदा शाश्वत निर्गुण जाणल्यावर साधकाची अवस्था अशी होते की परिणामांची तमा न बाळगता तो आपले काम करीत असतो. स्वामी त्याचे वर्णन असे करतात-
आता होणार ते होतेना कां।
आणि जाणार ते जायेना कां।
तुटली मनातील आशंका। जन्ममृत्यांची॥ (दा-६.२.४४)
संप्रदायातील काम करणार्‍या महंतांची अवस्था अशी झाली पाहिजे. तरी समुदायात काम करणार्‍या महंतांसाठी काही बारीकसारीक सूचनाही स्वामींनी दिल्या आहेत. त्या पाळल्या पाहिजेत. कारण, त्यावर संप्रदायाची यशस्विता अवलंबून असते.

- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@