दीपोत्सवाची वाट पाहणारा महाराष्ट्र

15 Nov 2020 00:14:22

dipostav_1  H x


ज्ञानदेवांपासून एक एक ज्योत लावण्याचा आपला इतिहास आहे. ज्ञानदेवादी ज्ञानज्योतींनी हा महाराष्ट्र प्रकाशित केला. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, महादजी शिंदे आदी शूरांनी, क्षात्रज्योतींनी महाराष्ट्र तेजस्वी केला. त्या तेजाचा अनुभव महाराष्ट्राने घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि सत् प्रवृत्त जनतेने एक कौल दिला. त्याचा विश्वासघात महाराष्ट्रातील काही लोकांनी केला. आज विश्वासघाताचा अंधकार निर्माण केला आहे. म्हणूनच संकल्पज्योतींचा निर्धार करून परिवर्तनाचा प्रकाश पुन्हा एकदा प्रज्वलीत करावा लागेल.



दिवाळीला ‘सणांचा राजा’ म्हणतात. दिवाळी म्हणजे आनंदोत्सवच. दिव्यांची आरास, देवतांचे पूजन, पारिवारीक नातेसंबंधांतील स्नेहमय दिवस, विविध प्रकारचा फराळ, फटाके, अशी दिवाळीची मजा काही औरच असते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या अंगात या काळात ‘दिवाळी’ संचारलेली असते. या दिवाळीचा आनंद शतगुणित करणारे काही विषय झालेले आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिराचे काम सुरू झाले आहे. त्याला समांतर राष्ट्र मंदिर उभे करण्याचे काम सर्वस्तरातून सुरू झाले आहे. रामजन्मस्थानाची भूमी रामभक्तांना देण्याचा निर्णय दिवाळीचा आनंद निर्माण करणारा होता आणि ऑगस्टमधील भूमिपूजनाचा कार्यक्रम दिवाळीपूर्वीच दिवाळी निर्माण करणारा होता. आज अयोध्या लक्ष लक्ष दीपांनी नाहून निघते आहे. अयोध्येतील दीपोत्सवाच्या प्रकाशाच्या लहरी सर्व देशात संचार करीत आहेत. बिहारच्या निवडणुकांचे निकाल आले. त्याचवेळी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल आले आणि ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ अशी स्थिती झाली. दिवाळीपूर्वीच पुन्हा एकदा फटाक्यांची आतशबाजी झाली, मिठाईचे वाटप झाले. पण, हा विजय काय सांगतो?


दिवाळीच्या संदर्भात विचार करायचा तर आपण नरकासुर वधाचा आनंद साजरा करतो. म्हणजे ‘असत्’ प्रवृत्तीवर ‘सत्’ प्रवृत्तीचा आनंद साजरा करतो. या देशात दोन विचारधारा चालतात. एक राष्ट्रवादाची आणि दुसरी राष्ट्राला तोडण्याची. या दुसर्‍या विचारधारेला ‘तुकडे तुकडे गँग’ असे नाव पडले आहे. ही ‘तुकडे तुकडे गँग’ समाजाची जातीत विभागणी करते. समाजाची धर्मगटात विभागणी करते. या गँगला ‘३७० कलम’ हवे आहे. घुसखोरी करणार्‍या मुसलमानांना नागरिकत्वाचा अधिकार दिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. चीनविषयी त्यांना ममत्व आहे आणि पाकिस्तानबद्दल सहानुभूती आहे. रामाबद्दल आदर नाही आणि अन्य महापुरुषांबद्दल सन्मानाची भावना नाही. ही ‘तुकडे तुकडे गँग’ पराभूत झाली. लोकांनी त्यांना जवळ केले नाही. त्यांच्या प्रचाराला बळी पडले नाहीत. ही चांगली लक्षणे आहेत. या ‘तुकडे तुकडे गँग’चा एक आविष्कार महाराष्ट्रातही दिसतो. या ‘समाजतोडू गँग’ने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाला शत्रू ठरवून टाकले आहे. काही नेते ब्राह्मणांविषयीचा भयानक द्वेष मनात ठेवून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वकील कुलकर्णी याला ठार मारले, ही कथा ते रंगवून रंगवून सांगतात. अफजल खानाचा वध त्यामानाने दुय्यम घटना आहे, असे ते सांगतात. तेवढाच द्वेष ते दलित समाजाचा करतात. ते फार जवळ येणार नाहीत याची काळजी घेतात. त्यांच्यातील नेत्यांना वापरायचे आणि फेकून द्यायचे, हेच त्यांचे राजकारण. महाराष्ट्रात ते बर्‍यापैकी पाय रोवून आहेत. त्यांचे काम ‘ज्ञानदेव ते शिवाजी’ ही परंपरा मातीत मिळविण्याची आहे.ही प्रवृत्ती बिहार आणि मध्य प्रदेशमध्येही होती. बिहार आणि मध्य प्रदेशमधील जनतेने या प्रवृत्तीचा ‘नरकासुर’ करून टाकला.


दिवाळीचा आनंद शतगुणित करणारा हा विजय भाजपच्या नेतृत्वाचा आहे. उमेदवारांचा आहे आणि निवडणूक व्यूहरचनेचा आहे. निवडणूक ही लोकशाहीतील लढाई असते. लढाई जिंकण्यासाठी सेनापती कुशल असावा लागतो. व्यूहरचना विजय मिळवून देणारी करावी लागते. लढणार्‍या सैनिकांत आत्मविश्वास आणि निर्धार निर्माण करावा लागतो, यात चूक झाली तर ‘पानिपत’ होते. नेतृत्वाने ज्याला ‘रामविजय’ किंवा ‘कृष्णविजय’ म्हणता येईल, तो प्राप्त केलेला आहे.त्याहूनही अधिक हा विजय विचारधारेचा आहे. ही विचारधारा राष्ट्रवादाची आहे. हे सनातन राष्ट्र आहे. त्याची एक जीवनपद्धती आहे आणि सर्वत्र चैतन्य पाहण्याची या संस्कृतीची शिकवण आहे. या राष्ट्रवादी विचाराचा अधिक आविष्कार सर्वत्र बघायला मिळतो. कोरोनाचे संकट आहे. कुणालाही फोन केला की अगोदर सरकारी संदेश येतो. घराच्या बाहेर पडू नका, सामाजिक अंतर ठेवा, मास्क लावा वगैरे वगैरे. प्रत्येक जण हा संदेश ऐकतच असतो. दिवाळीचा आनंद शतगुणित करण्यासाठी तो तशीच गर्दी बाजारात करतो. जर हा सण केला नाही, तर आयुष्यातील खूप काही आपण घालवून बसू, आपल्या सांस्कृतिक मूल्यांची आस्था हीच राष्ट्रवादाची मोठी शक्ती आहे. तिचा अनुभव सर्व देशांत सारखाच घेता येतो.


ही राष्ट्रवादाची विचारधारा लोकांना समजेल, अशा भाषेत सांगावी लागते. सर्वांचा विकास करायचा आहे. न्यायावर आधारित समाजाची बांधणी करायची आहे. आपल्याला ‘आत्मनिर्भर’ व्हायचे आहे. संरक्षणसिद्ध व्हायचे आहे. घराणेशाही नाही, तर लोकशाही रुजवायची आहे. बळीराजाला आनंदी करायचे आहे. युवकांना संधी देणारी वेगवेगळी क्षेत्रे उपलब्ध करायची आहेत. स्त्रियांना त्यांच्या प्रगतीच्या वाटा मुक्त करायच्या आहेत. असे सर्व काही करणे म्हणजे राष्ट्रवाद. भाजपने तो स्वीकारलेला आहे. संघ विचारधारेतील सर्व संस्थाजीवनांचा हाच विषय आहे.लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाहीचा आहे. ती काँग्रेसमध्ये आहे आणि महाराष्ट्रात सत्ता भोगणार्‍या वर्गात आहे. घराणेशाही ही राजेशाहीसारखी असते. राजाचा मुलगा, राजा होणार. घराणेशाहीचा नेतादेखील हेच सांगतो की, माझ्यानंतर माझा मुलगा, नसेल तर मुलगी आणि त्यांची संतान हेच राजगादीचे वारस असतील. सर्वोच्च स्थानावर माझ्याच घराण्याचा वारस असेल. त्या स्थानावर जाण्याचा विचार कुणी करता कामा नये. केला तर त्याची हाकालपट्टी होईल. ही घराणेशाही आम्ही भारताचे सार्वभौम लोक संविधानाच्या या भाषेत बसत नाही. या घराणेशाहीतून मुक्तता हीच खरी दिवाळी आहे.


हा राष्ट्रवाद २४ तास जागा असणे हीच निरंतर दिवाळी आहे. दिवाळीतील एक पणती बाहेरचा अंधार कमी करते, राष्ट्रवादाची एक पणती स्वतःच्या मनातील अंधकार दूर करते. आपली आपल्याला ओळख करून देते. ही ओळख जातीची नसते, उपासना पंथाची नसते, पक्षाची नसते, ही ओळख असते, मी भारतमातेची संतान आहे याची. ही ओळख हीच आपली शक्ती आहे. या ओळखीचा अनुभव घेणारी एक शक्ती उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांत उभी राहिली आहे. या शक्तीची कर्मभूमी आणि ज्ञानभूमी महाराष्ट्र आहे. ज्ञानदेवांपासून एक एक ज्योत लावण्याचा आपला इतिहास आहे. ज्ञानदेवादी ज्ञानज्योतींनी हा महाराष्ट्र प्रकाशित केला. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, महादजी शिंदे आदी शूरांनी, क्षात्रज्योतींनी महाराष्ट्र तेजस्वी केला. त्या तेजाचा अनुभव महाराष्ट्राने घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि सत् प्रवृत्त जनतेने एक कौल दिला. त्याचा विश्वासघात महाराष्ट्रातील काही लोकांनी केला. आज विश्वासघाताचा अंधकार निर्माण केला आहे. संकल्पज्योतींचा निर्धार करून परिवर्तनाचा प्रकाश पुन्हा एकदा प्रज्वलीत करावा लागेल. पंचागाप्रमाणे दरवर्षी दिवाळी तिच्या ठरलेल्या तिथींना येते. त्यासाठी आपल्याला काहीही करावे लागत नाही. परिवर्तनाची दिवाळी अशी तिथींना येणार नाही, त्यासाठी पणतीमध्ये कष्टाचे तेल घालावे लागेल, परिश्रमाची वात लावावी लागेल, संकल्पाची ज्योत पेटवावी लागेल. दिवाळीचा उत्सव साजरा करीत असताना या संकल्पाच्या दिवाळीची पहाटही आपण आपल्या स्वपराक्रमाने आणूया. त्या दिवाळीसाठी लाख लाख शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0