उंच झेप घेणारी अंजू

13 Nov 2020 21:53:16

anju borby jorge_1 &


जागतिक स्तरावर भारतीयांची मान उंचावणारी आणि नुकतेच भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्ष पदावर निवड होणार्‍या माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांच्याबद्दल...
 
 
भारतामध्ये क्रिकेट, हॉकी आणि कबड्डीशिवाय ‘अ‍ॅथलेटिक्स’ हा खेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक शाळांमध्ये लहानपणापासूनच याबद्दल विशेष प्रशिक्षण दिले जाते. जागतिक स्तरावर अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक, कॉमनवेल्थसारखे खेळ लोकांचे विशेष आकर्षण ठरतात. भारतीय संघ हा या खेळामध्ये तसा नवीन नाही.
 
 
मात्र, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकून देणे हे निश्चित सोपे नाही. त्या दर्जाचा खेळाडू घडवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. भारताच्या कानाकोपर्‍यातून अनेक खेळाडू वर्षानुवर्षे या स्पर्धांसाठी तयारी करतात. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय अ‍ॅथलिट्सनी अनेक पदकांची कमाई केली आहे. भारतातील अ‍ॅथलेटिक्समध्ये तरुण आणखी प्रगल्भ व्हावे, यासाठी भारतामध्ये ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
 
 
यामुळे अ‍ॅथलेटिक्स या प्रकारामध्ये भारताने अनेक पदकांची लयलूट केली आहे. आपल्या देशात अनेक कर्तृत्ववान अ‍ॅथलेटिक्स खेळाडू आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे अ‍ॅथलेटिक्समध्ये जागतिक स्तरावर पदकांची कमाई करणारी माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज. अंजू जॉर्ज यांनी अनेक स्पर्धांमध्ये भारतासाठी पदक पटकावून देशाचे नाव मोठे केले. तसेच, निवृत्ती स्वीकारूनही त्यांनी या खेळासाठी योगदान देणे सुरूच ठेवले आहे. नुकतेच त्यांची भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) उपाध्यक्षपदी निवड झाली.
 
 
तसेच, या पदावर निवडून येणार्‍या त्या पहिला महिला ठरल्या आहेत. तेव्हा, जाणून घेऊया त्यांच्या या कारकिर्दीबद्दल.... अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म केरळमधील कोट्टयममध्ये १९ एप्रिल १९७७ साली झाला. त्यांना लहान वयातच अ‍ॅथलेटिक्समध्ये आवड निर्माण झाली होती. त्याचे कारण म्हणजे, के. टी. मार्कोसे यांनी त्यांना लहानपणीच अ‍ॅथलेटिक्स या प्रकाराची ओळख करून दिली होती. त्यांचे वडील पेशाने व्यायसायिक असले, तरीही खेळांमध्ये त्यांना विशेष रस होता.
 
 
कोट्टयममधील सीकेएम कोरुथोडे स्कूलमध्ये त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण झाले. अ‍ॅथलेटिक्समध्ये आवड असल्याने शालेय स्तरावर त्यांनी चांगली कामगिरी केली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. त्यांची अ‍ॅथलेटिक्समधील रुची बघून कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळू लागले आणि पुढचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अंजू जॉर्ज यांना संधी मिळावी म्हणून त्यांच्या शाळेने अनेकवेळा लांब उडी आणि धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले.
 
 
पुढे त्यांनी कोरथोडो येथील सी. के. केश्वरन मेमोरियल हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. इथे प्रशिक्षक थॉमस यांनी यांची कला हेरली आणि खेळाला आणखी चकाकी यावी, यासाठी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी अंजू जॉर्ज यांनी शाळेसाठी खेळताना अनेक विजय मिळवून पदकांची कमाई केली. भारताच्या माजी धावपटू पी. टी. उषा यांना आदर्श मानून त्यांनी उंच उडी, लांब उडी, धावण्याची शर्यत, हॅथेलॉन इत्यादी खेळांचा सराव केला. यामध्ये शाळेसह प्रशिक्षकांचाही चांगला पाठिंबा लाभला.
 
 
अंजू जॉर्ज यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात हॅथेलॉनपासून केली होती. मात्र, काही काळानंतर लांब आणि उंच उडी या प्रकारामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. याचा असा फायदा झाली की, १९९६ मध्ये झालेल्या दिल्ली ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत लांब उडी प्रकारात चषक स्वतःच्या नावावर केला. १९९९ मध्ये अंजू जॉर्ज यांनी बंगळुरू फेडरेशन चषकमध्ये तिहेरी उडी मारण्याचा राष्ट्रीय विक्रम केला. नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले.
 
२००१ मध्ये त्यांनी तिरुवनंतपुरम येथे आयोजित राष्ट्रीय सर्किट मेळाव्यात ६.७४ मीटर लांब उडीची नोंद केली. त्याच वर्षी लुधियाना येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये त्याने तिहेरी उडी आणि लांब उडीमध्ये सुवर्णपदक जिंकले. सप्टेंबर २००३ मध्ये झालेल्या पॅरिसमध्ये आयोजित जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी लांब उडीमध्ये कांस्यपदक जिंकले आणि प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्तरावरील स्पर्धेत भारताला बक्षीस दिले.
 
 
‘वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरल्यानंतर जागतिक पातळीवर त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. पुढे, २००३च्या आफ्रो-एशियन गेम्समध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. २००४ मध्ये अथेन्स येथे आयोजित ऑलिम्पिकमध्ये ६.८३ मीटर उडी मारत सहाव्या स्थानावर झेप घेतली.
 
सप्टेंबर २००५ मध्ये त्यांनी दक्षिण कोरियाच्या इंचियन सिटी येथे झालेल्या १६व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या लांब उडीमध्ये ६.६५ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या जागतिक कामगिरीची दखल म्हणून २००४ मध्ये त्यांना ’राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता त्यांची भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, यासाठी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...


Powered By Sangraha 9.0