नाशिक जिल्ह्यातील १,४६९ दुकाने रेशनच्या प्रतिक्षेत आहेत. कारण, पंजाबमधील किसान आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील धान्य वितरण यंत्रणेला सध्या बसला आहे. त्यामुळे दरमहा धान्य घेऊन येणार्या रेल्वे जिल्ह्यात येऊ शकलेल्या नाहीत. जिल्ह्यातील २,६०९ पैकी १,१४० दुकानांत धान्य पोहोचले आहे. १,४६९ दुकानांना जिल्ह्यात धान्याची अजूनही प्रतीक्षाच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरिबांना हक्काच्या अन्नधान्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. पंजाबमध्ये नवीन कृषी विधेयकाविरोधात शेतकर्यांनी चक्काजाम केला आहे. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पंजाबवरुन येणार्या अन्नधानाच्या वॅगन तेथेच अडकून पडल्या आहेत. त्यांचा परिणाम महाराष्ट्रातील रेशन अन्नधान्य वाटप साखळीवर झाला आहे. त्यामुळे गोरगरिबांना ऐन दिवाळीत हक्काच्या धान्य मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. दिवाळीत गरीब आणि गरजू नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा पुरवठा विभागाने मनमाड येथील अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्य मिळविण्याची व्यवस्था केली आहे. परंतु, जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये २,६०० दुकाने असून या दुकानांपर्यंत ट्रकद्वारे नियमितचे धान्य वितरीत करण्यास वेळ जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २,६०० पैकी १,१४० दुकानांमध्ये धान्य पोहोच झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे. शहरात २३० रेशन दुकाने असून सोमवारी सायंकाळपर्यंत त्यापैकी १७५ दुकानांपर्यंत धान्य पोहोचले आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकसह मालेगाव शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत धान्य पोहोच करण्यात येणार आहे. हे मोफतचे धान्य नाही, तर अंत्योदय आणि प्राधान्य क्रमातील लाभार्थींना हे नियमित स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नरसीकर यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सर्व लाभार्थींना स्वस्त धान्य मिळेल, असेही पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तरीही जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पंजाबमध्ये असणारे काँग्रेस सरकार आणि राज्यात सत्तेत असणारे काँग्रेसी यांच्या समन्वय साधण्याचे काम करण्यात मंत्र्यांना अपयश येत आहे काय? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
एक अभिनव प्रयोग
नाशिक शहरात असलेला १२० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आणि अद्यापही कार्यरत असलेल्या अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरिया) पुलाच्या सुरक्षेचा विचार करता, ‘नाशिक स्मार्ट सिटी कंपनी’अंतर्गत ‘स्मार्ट ब्रीज सर्वेलन्स सिस्टिम’ हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सायरन वाजत धोक्याची सूचना नागरिकांना तत्काळ मिळणार आहे. नाशिक शहरातील युवक अरविंद जाधव व त्यांचे सहकारी यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट ब्रीज सर्वेलन्स सिस्टिम’ हा शहरातील होळकर पुलाकरिता पायलट प्रकल्प म्हणून राबविला जात आहे. याकरिता होळकर पुलाखाली संवेदक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनांचे मापन होऊन त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षास तत्काळ समजणार आहे. त्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये येथे लावण्यात आलेले सायरनही वाजणार असून धोक्याची सूचना नागरिकांना तत्काळ समजणार असून यामुळे संभाव्य दुर्घटना टाळता येणे शक्य होणार आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर जाधव याने या संकल्पनेवर काम सुरू केले आणि आता त्याच्या पायलट प्रकल्पाची सुरुवात जानेवारी २०२० मध्ये होऊन आता प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. महाड पूल दुर्घटनेनंतर पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि स्ट्रक्चरल ऑडिट या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. अशा दुर्घटना टाळता येणे किंवा त्याबाबत पूर्वसूचना मिळणे शक्य आहे का, यासंदर्भात अरविंद जाधव आणि त्याच्या सहकार्यांनी हे संवेदक बनवले आणि खर्या अर्थाने जानेवारी २०२० मध्ये सुरू करण्यात आलेले काम पूर्ण झाले आहे. हा पायलट प्रकल्प व त्याद्वारे उपलब्ध होणार्या माहितीचा पुढील दोन ते तीन महिने आढावा घेण्यात येणार आहे. तद्नंतर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनी व सार्वजनिक बांधकाम विभाग तथा राष्ट्रीय राजमार्ग विभाग यांच्या महत्त्वपूर्ण पुलांवर अंमलबजावणी करण्याकामी या स्तरावर विचार होणार आहे. होळकर पूल हा नाशिकच्या दोन भागांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे या पुलाचे महत्त्व नाशिककर नागरिकांसाठी अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली ही उपाययोजना नक्कीच महत्त्वाची आहे. हा अभिनव प्रयोग इतर महत्त्वपूर्ण पुलांवर करण्यात आल्यास नक्कीच संभाव्य दुर्घटनांना आळा बसण्यास मदत होईल.