गाझियाबादमध्ये मोदीनगर उपविभागीय दंडाधिकारी म्हणून तैनात असलेल्या सौम्या पांडे यांनी आई झाल्याच्या अवघ्या १४ दिवसांत कोरोनाविरोधातील लढ्यात उतरत आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
कोरोना कालावधीत आपल्या तीन आठवड्याच्या बाळाला घेऊन कार्यालयात हजर झालेल्या मोदीनगर (गाझियाबाद)च्या उपविभागीय दंडाधिकारी आयएएस सौम्या पांडे यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील भारावून गेले. त्याचबरोबर सौम्या पांडे यांची मुख्य विकास अधिकारी (सीडीओ) कानपूर या पदावर बढतीदेखील झाली. गाझियाबादमध्ये मोदीनगर उपविभागीय दंडाधिकारी म्हणून तैनात असलेल्या सौम्या पांडे यांनी आई झाल्याच्या अवघ्या १४ दिवसांत कोरोनाविरोधी लढ्यात उतरत आपले कर्तव्य पार पाडले.
सौम्या मुलीला कार्यालयात सोबत आणत, फाईल्स निकाली काढण्यात व्यस्त असतानाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाली. सौम्यासारख्या कर्तव्याप्रति एकनिष्ठ असणार्या आईच्या कुशीत अनमोल क्षण अनुभवणारे हे बाळ नक्कीच अधिक भाग्यवान आहे. आई समोर येणार्या प्रत्येक समस्येपासून आपल्या बालकाचे संरक्षण करतेच, परंतु याचवेळी आपल्या बालकाला त्या समस्यांशी लढण्याचे बळ देते. याचेच उत्तम उदाहरण ठरल्या मोदीनगर तहसील (गाझियाबाद, उत्तर प्रदेश)च्या उपविभागीय दंडाधिकारी सौम्या पांडे.
प्रयागराजमध्ये वास्तव्यास असणार्या सौम्या पांडे या २०१७च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीच्या (मसुरी, उत्तराखंड) सुवर्णपदक विजेत्या सौम्या यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधीदेखील मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयात साहाय्यक सचिव पदाच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात सौम्या पांडे यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
ऑक्टोबर २०१९मध्ये, सौम्या यांना गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये उपविभागीय दंडाधिकारी हे पद मिळाले. कोरोना संकटाच्यावेळी, जुलै २०२० मध्ये सौम्या यांना गाझियाबाद जॉईंट मॅजिस्ट्रेटची जबाबदारी देऊन संपूर्ण जिल्ह्यातील कोविड मॉनिटरिंग सेलचे प्रभारीदेखील बनविण्यात आले होते. आई होणार त्याचवेळी त्यांच्यावर ही जबाबदारीदेखील आली. यावेळी सौम्या पांडे यांनी जिल्हा दंडाधिकारी व अन्य अधिकार्यांशी समन्वय साधत आपली जबाबदारी चोखपणे पार पडली.
एएनआयशी बोलताना सौम्या म्हणतात की, मी आयएएस अधिकारी आहे. म्हणूनच मला माझी सेवा सांभाळावी लागेल. ‘कोविड-१९’च्या काळात आम्हा सर्वांवर सर्वात मोठी जबाबदारी आली. देवाने स्त्रीला मूल जन्माला घालण्याची आणि त्याचा सांभाळ करण्याची क्षमता दिली आहे. ग्रामीण भारतात स्त्रिया बाळंतपणच्या शेवटच्या दिवसांत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात, जन्मानंतर मुलाची काळजी घेतात. यावेळी त्यांचे काम व घरही सांभाळतात. ही तर देवाची कृपा आहे.
मी माझ्या तीन आठवड्यांच्या मुलीबरोबर प्रशासकीय काम करण्यास सक्षम आहे. संपूर्ण जग ‘कोविड-१९’ साथीच्या रोगास सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत मुले, वृद्ध आणि गर्भवती स्त्रिया कमीत कमी बाहेर पडावेत, यासाठी सरकार व डॉक्टरांकडून मार्गदर्शक सूचना आहेत, पण सौम्या पांडे यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी पूर्ण काळजी घेतली. काम आणि सुरक्षितता यामध्ये त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
सौम्या या केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळात व नृत्य कलाप्रकारातदेखील पारंगत आहेत. ‘प्रयाग संगीत समिती प्रयागराज’मधील भरतनाट्यम आणि कथ्थक यामध्येदेखील त्या सिनिअर डिप्लोमाधारक आहेत. पंडित बिरजू महाराजांची शिष्या ऊर्मिला शर्मा यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. लहानपणी सौम्या यांना चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांची नृत्ये वारंवार पाहायला आवडायचे. सौम्या पांडे यांना कथ्थकमध्ये अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मूळच्या अलाहाबाद जॉर्ज टाऊन येथील रहिवासी असणार्या सौम्या आपल्या यशाचे श्रेय आई डॉ. साधना पांडे आणि वडील डॉ. आर. के. पांडे यांना देतात.
कथ्थकबरोबरच सौम्या यांना भरतनाट्यम आणि मणिपुरी नृत्याचीही संपूर्ण माहिती आहे. अलाहाबाद संग्रहालयाने त्यांना या कलागुणांसाठी अनेक सन्मान दिले आहेत. सौम्या यांनी गुरु संजय धिंग्रा यांच्याकडून दोन वर्षे बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी बिरजू महाराजांची शिष्या ऊर्मिला शर्मा यांच्याकडून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली. प्रयाग संगीत समितीतर्फे आयोजित अखिल भारतीय स्पर्धा, युपी संगीत नाट्य अकादमी, राष्ट्रीय बालश्री असे अनेक पुरस्कार यांना प्राप्त झाले आहेत. ‘लाल बहादूर शास्त्रीय अकादमी नृत्य स्पर्धा २०१८’ मध्येही त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांनी युथ बास्केटबॉल खेळाडू म्हणून पदकही मिळविले आहे.
सौम्या या शालेय व जिल्हा पातळीवर बास्केटबॉल कर्णधारदेखील राहिल्या आहेत. एनसीसी कॅडेट म्हणून ’बी प्रमाणपत्र’ही त्यांना प्राप्त झाले आहे. सीबीएससी बोर्डाकडून हायस्कूल व इंटर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सौम्या यांनी एनआयआयटी अलाहाबादमधून बीटेक पदवीचे शिक्षण घेतले आहे. येथेही सौम्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. सौम्या पांडे म्हणतात की, “ जीवनात काहीही अशक्य नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असल्यास ती सर्व काही करु शकते.” आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्याचा योग्य अर्थ त्यांना उमगला आहे. आपल्या कर्तव्याप्रति एकनिष्ठ असणार्या या एका महिला अधिकार्याचे कर्तृत्व समाजासाठी उत्तम उदाहरण आहे.