सध्या ठाणे-नवी मुंबई?च्या खाडीमधील डवरलेली कांदळवने एकाकी सुकलेली आढळून येत आहेत. ही झाडे मृत झाल्याचा समज अनेक लोकांना होत आहे. मात्र, त्याला पर्यावरणाचे एक चक्र कारणीभूत असून त्याचे गुपित उलगडणारा हा लेख....
मुंबई (डॉ. शीतल पाचपांडे) - हिरवी गर्द दिसणारी कांदळवने अशी एकाएकी करड्या-तपकिरी रंगाची का बर दिसू लागली आहेत? सगळी झाडे सुकली की काय ? असा विचार अनेकांच्या मनात सध्या येत असेल. वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांचेदेखील या समस्येने लक्ष वेधून घेतले आहे. दि. १ ते ७ ऑक्टोबर हा आठवडा ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. म्हणून मनात विचार आला की, सध्याच्या स्थितीमध्ये कांदळवनांमधला प्रामुख्याने आढळून येणार्या बदलांवर काही लिहावे. म्हणून घातलेला हा घाट....
तीन ते चार सेंटिमीटर असलेला छोटासा ‘हायबलिया’ पतंग पावसाळा संपत आला की, प्रचंड संख्येने कांदळवनांकडे आकर्षित होतो. कांदळवनांमध्ये प्रामुख्याने ज्याठिकाणी ‘तीवर’ प्रजातीची झाडे आढळतात, त्या झाडांची पाने खायला या पतंगाच्या सुरवंटाला खूप आवडतात. कांदळवनांमध्ये सापडणार्या इतर प्रजाती जसे की, कांदळ, किरकिरी, चिप्पी त्यांना रुचत नाहीत. त्यामुळे करड्या तपकिरी रंगात परिवर्तन झालेल्या कांदळवनांच्या जंगलात केवळ या प्रजाती हिरव्या रंगाच्या दिसतात.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड येथील किनारपट्टी ‘तिवर’ प्रजातींच्या झाडांनी समृद्ध आहे. त्यामुळेच ‘हायलिया’ पतंगांचा प्रादुर्भाव या भागांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. एक पतंग सुमारे ४०० ते ४५० अंडी तिवराच्या पानाच्या खालच्या बाजूला घालतो. अंडी घालायला हे पतंग झाडाच्या फांद्यांच्या टोकाला असलेली कोवळी पाने निवडतात. कारण, अंड्यातून बाहेर पडणार्या सुरवंटाला जुन्या पानांपेक्षा ही कोवळी पाने सहज खाता येतात. सुरुवातीला हे सुरवंट हिरव्या रंगाचे असतात व त्यांना काळे तोंड असते. त्यामुळे ही सुरवंट पानांवर दिसत सुद्धा नाहीत. एकदा अंड्यांमधून सुरवंट विकसित झाल्यावर, ते भरा भरा कोवळ्या फांदीच्या टोकाला असलेल्या तिवरांच्या पानांवर ताव मारतात. हे सुरवंट मोठे होऊ लागल्यानंतर जुनी पानेदेखील गट्टम् करून टाकतात. एका वेळेला हजारो, लाखो सुरवंट या तिवरांच्या झाडांवर निवास करतात. त्यांचा पाने खाण्याचा वेग इतका असतो की, अवघ्या काही दिवसांच्या कालावधीतच ते संपूर्ण तिवरांच्या झाडांची पाने नाहीशी करतात आणि कांदळवनांमधला हिरवा रंग अदृश्य होतो. त्यानंतर दिसू लागतात ते फक्त करड्या- तपकिरी रंगाचे, सुकलेले पर्ण?हीन कांदळवनांचे जंगल.
‘हायलिया’चे सुरवंट स्वतःचा बचाव उत्तम रित्या करतात. झाडाचे पान वळवून त्यामध्ये निवास करतात. वळवलेल्या पानांच्या अवती भवती रेशीमसारख्या धाग्याचे कुंपण तयार करतात. ज्यामुळे ते शिकार करणार्या पक्ष्यांच्या नजरेआड राहू शकतात. या सुरवंटांच्या विकसित होण्याच्या प्रकियेतील पुढच्या टप्यात त्यांना निळसर काळा रंग येतो. मग ते स्वतः भोवती काळपट चॉकलेटी रंगाचे कोश तयार करतात. काही दिवसातच पुन्हा लाखोंच्या संख्येने पतंग जन्माला येतात आणि पुन्हा त्यांची जीवन साखळी सुरू होते. न खाता पिता हे पतंग जवळ जवळ दहा दिवस प्रवास करत असल्याचे काही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. हे पतंग हळूहळू मुंबई? कडून दक्षिणेकडे प्रवास करतात आणि पार किनारपट्टीच्या टोकापर्यंत पोहोचतात, असे म्हणायला हरकत नाही. कारण, महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यात हे पतंग दिसून येतात तर, केरळमध्ये फे्रुवारी महिन्यात. या पतंगांचे स्थलांतर नक्की कशा प्रकारे होते हे अजूनही गूढ आहे. परंतु, भारतातच नाही तर जागतिक पातळीवर जिथे तिवरांची झाडे दिसून येतात, तिथे हे ‘हायबलिया’ पतंगही आढळून आले आहेत. आतापर्यंत मेक्सिको, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, थायलंड अशा अनेक देशांमध्ये या पतंगांच्या वाढत्या प्रसारामुळे जे बदल होऊ शकतात त्यावर अनेक शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर अभ्यासदेखील सुरु आहे.
या पतंगाचे अस्तित्व जवळजवळ ३०० वर्षांपासून पृथ्वीवर आहे. सर्वप्रथम शास्त्रज्ञ पीटर कर्रिस यांनी १७७७ साली यांची ’हायबलिया पियुरा’ नावाने नोंद केली होती. उत्तम प्रतीचा लाकूड मिळणार्या सागाचे झाड या पतंगाचे आवडते खाद्य होते. पर्यावरणात होणार्या बदलांचा परिणाम हा प्रत्येक जीवावर होत असतो आणि त्याप्रमाणे सगळे जीव आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत असतात. असेच गेल्या काही वर्षांमध्ये या पतंगानेदेखील आपले खाद्य बदलून किनारपट्टीजवळील तिवरांच्या झाडांवर ताव मारू लागले आहेत. कदाचित या पतंगांना भरपूर प्रमाणात खाद्य एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे अनुकूल परिस्थितीत त्यांची वाढ छान होत असेल. ही तिवरांची झाडे त्यांना चांगलीच मानवली आहेत. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव हा दरवर्षी वाढताना दिसून येत आहे. पूर्वी हे पतंग दोन वर्षांनी एकदा दिसायचे. आता दरवर्षीच ते दिसू लागले आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असणार्या गावांजवळ या सुरवंटांनी थैमान घातले आहे. त्यांची संख्या इतकी असते की, असतील नसतील तेवढी तिवरांची झाडे त्यांना कमी पडतात आणि अन्नासाठी स्पर्धा निर्माण होते. अन्नाच्या शोधात ते इकडे तिकडे जवळपासच्या भागात पसरू लागतात. भरतीच्या पाण्यासोबत कितीतरी सुरवंट वाहून जातात. वाहून गेलेली सुरवंट मरतात का ? पाण्यामध्ये तग धरून नवीन तिवरांची झाडे शोधतात का ? यावरदेखील संशोधन होणे आवश्यक आहे. या निळसर काळ्या चरबट दिसणार्या सुरवंटाच्या अंगावर विरळ अशी लव असते. त्यावर एक विशिष्ट असे रासायनिक द्रव्य तयार होते. ज्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यास अंगाला खाज येऊ लागते. पण ही खाज आल्यास घाबरण्यासारखे काहीच नसते. कारण, काही वेळातच त्या खाजेची तीव्रता कमी होते.
कांदळवनांचे जंगल ही अत्यंत महत्त्वाची परिसंस्था आहे. कारण, त्यांचे अनेक फायदे हे पर्यावरणाला आणि मानवाला होतात. त्यामुळे असे होणारे दल आणि त्याद्दलची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. अशा समस्या योग्यरित्या हाताळाव्या म्हणून म्हणून महाराष्ट्र शासनांतर्ग?त चालवण्यात येणार्या ‘कांदळवन प्रतिष्ठाना’मार्फत (मँग्रोव्ह फाऊंडेशन) ‘इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्टरी रिसर्च अॅण्ड एज्युकेशन’च्या ‘इन्स्टिटयूट ऑफ वूड सायन्स अॅण्ड टेकनॉलॉजी’ या संस्थेला अभ्यास करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभ्यासात त्यांनी जवळपास कांदळवनांच्या २० प्रजातींमध्ये सापडणार्या कीटक प्रजातींची माहिती दिली आहे. त्यावर उपाययोजनादेखील सांगितल्या आहेत. ‘हायलिया’ या पतंगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा नियंत्रणासाठी नैसर्गिकरित्या मेलेल्या ’हायलिया’ पतंगाच्या सुरवंटामधून सापडणार्या जैविक घटकांपासून औषध तयार होऊ शकते का ? तसेच ‘हिदनोकार्पस’ नावाच्या झाडापासून तयार केलेले औषधदेखील वापरता येऊ शकते का ? ज्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात ठेवता येऊ शकेल, यावर अधिक अभ्यास अजूनही चालू आहे.
याबरोबरच जागतिक पातळीवर ‘हायबलिया’ पतंगांमुळे पर्णहीन होणार्या कांदळवनांच्या जंगलावर काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. ज्यामध्ये कांदळवनांमधल्या अन्नसाखळीवर याचा काय परिणाम होऊ शकतो, यावर विचार मांडले आहेत. कारण, कांदळवनांमध्ये सतत होणारी पानगळ अनेक खेकड्यांना पाणथळ प्रदेशात आकर्षित करते. तिथूनच इथल्या अन्नसाखळीची सुरुवात होते. खेकडे पानांचा भुगा करतात आणि हा भुगा सडण्यास सुरुवात झाल्यावर अनेक इतर छोटे मोठे जीव जसे की, किडे, मासे, पक्षी आणि आपण या अन्न साखळीतील प्रमुख भाग होतो. खेकड्याच्या हालचालींमुळे अनेक महत्त्वाची प्रथिने जमिनीच्या आतापर्यंत जाऊन पोहोचतात. कारण, खेकडे खाली पडलेली पाने त्यांच्या बिळात खोल घेऊन जातात. बरं! हा सुरवंट जो लाखो-कोट्यवधींच्या संख्येने पसरतो, त्याची विष्ठा खाली जमिनीवर पडते तेव्हा कांदळवनांमधली जमीन अजून सुपीक बनत असेल असे, काही शास्त्रज्ञांचे निदान आहे. परंतु, या सगळ्याचा नक्की कोणत्या प्रकारे दुष्परिणाम होतो? मासेमारीवर याचे काय परिणाम होऊ शकतील किंवा झाले आहेत का? जेव्हा ही जंगले पूर्ण?पणे पर्ण?हीन होतात तेव्हा या खेकड्यांचे काय होते, त्यांना पुरेसे खाद्य मिळते का ? यावर अजून तितकासा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे जरी जागतिक पातळीवर अभ्यास चालू असला तरी, नेमका या सगळ्याचा कांदळवनांवर काय परिणाम होतो यावर ठोस असे काहीही कोणीच अजूनतरी सांगू शकत नाही.
(लेखिका वन विभागाच्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’मध्ये साहाय्यक संचालक, प्रकल्प म्हणून कार्यरत आहेत)