ग्रॅण्ड इथिओपियन रिनायसान्स डॅम

30 Oct 2020 22:12:54

map_1  H x W: 0
 
 
‘ग्रॅण्ड इथिओपिया रिनायसान्स डॅम’ ‘जीइआरडी’ या नावाचं हे महाकाय धरण इथिओपिया हा आफ्रिकन देश उभं करीत आहे. हा प्रकल्प आता झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे. पण, कदाचित त्यामुळेच इजिप्त देश फार अस्वस्थ आहे.
 
 
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. ३ नोव्हेंबर २०२० या दिवशी पहिल्या फेरीचं मतदान होईल आणि तरीही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या नेहमीच्या बिनधास्तपणे अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपली मतं ठासून मांडतातच आहेत. नुकतंच म्हणजे २४ ऑक्टोबरला त्यांनी सुदानचे पंतप्रधान अब्दल्ला हमदोक आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवर बोलणं केलं. “ही फार धोक्याची स्थिती आहे बरं का! कारण, इजिप्त तसा ऐकणार नाही,” ट्रम्प म्हणाले,“मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, इजिप्त काहीतरी करणार बघा. तो कदाचित ते धरण उडवूनसुद्धा देईल,” ट्रम्प पुढे म्हणाले. आता इथिओपिया, सुदान आणि इजिप्त यांनी एकत्र बसून या समस्येवर काहीतरी निर्णय घ्यायला हवा, तो त्यांनी न घेतल्यामुळे सप्टेंबर २०२० पासून अमेरिकेने या ६.३५ गिगावॅट्स विद्युत उत्पादन क्षमतेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्पाला आर्थिक साहाय्य करणं थांबवलं आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण, इजिप्त धरण उडवूनसुद्धा देईल, वगैरे अटकळबाजी करणं तीसुद्धा दूरध्वनीवरुन? हे म्हणजे अतीचं झालं. अहो ट्रम्प महाशय, इतकी पप्पूगिरी बरी नव्हे!
 
 
 
असो. तर मुळात कोणत्याही आंतरराष्ट्रीय राजकीय, आर्थिक, सैनिकी इत्यादी संघर्षात कधीही नसणारा इथिओपिया एकदम अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या चिंतेचा विषय कसा काय झाला? तर शेवटी त्यांची कारणं आर्थिकच आहेत. २४६ किमी लांब आणि १८७४ चौ. किमी भूमी व्यापणारं ६.३५ गिगावॅट्स विद्युतनिर्मिती करणारं ‘ग्रॅण्ड इथिओपिया रिनायसान्स डॅम’ ‘जीइआरडी’ या नावाचं हे महाकाय धरण इथिओपिया हा आफ्रिकन देश उभं करीत आहे. हा प्रकल्प आता झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे. पण, कदाचित त्यामुळेच इजिप्त देश फार अस्वस्थ आहे. नाईल नदीचं पाणी हे इजिप्तचं सर्वस्व आहे. या प्रकल्पामुळे ते पाणीच कमी होणार, अशा भीतीने इजिप्त काय वाटेल, त्या उपायाने प्रकल्प पूर्ण होऊ देणार नाही, असा रंग दिसतो आहे. ट्रम्प यांच्याप्रमाणेच अनेकांना असं वाटतं आहे की, इजिप्त धरण उडवून द्यायलासुद्धा मागेपुढे बघणार नाही. उलट इथिओपियन अधिकारी म्हणतायत की, या प्रकल्पामुळे इजिप्तच्या आस्वान धरणातला पाणीसाठा फारतर तीन टक्के एवढा कमी होईल. त्यामुळे इजिप्तने कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. पण, जर त्याने ती घेतलीच तर मग आम्हीही तयार आहोत.
 
 
प्रिय वाचक, डोळ्यांसमोर जगाचा नकाशा घ्या आणि पाहा. ते पाहा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचं मुंबई बंदर. आता तिथून नैऋत्य दिशेने नजर खाली आणा. तो पाहा पूर्व आफ्रिकन देश इथिओपिया. मुंबईच्या सहार विमानतळावरुन आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये जाणारी जवळपास सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं आदिस अबाबा मार्गे जातात, ती आदिस अबाबा ही इथिओपियाची राजधानी. पाश्चिमात्य इतिहासकारांच्या मते, इजिप्त हा जगातला सगळ्या प्राचीन देश आहे. हे विधान करताना ते भारताकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. इजिप्तनंतरचा सगळ्यात प्राचीन देश म्हणजे इथिओपिया. त्यांचं मूळ नावा अ‍ॅबिसीनिया. तिथे ६० टक्के लोक ख्रिश्चन आहेत आणि ३२ टक्के लोक मुसलमान आहेत. पण आश्चर्य म्हणजे, ते गुण्यागोविंदाने नांदतात. तिथले ख्रिश्चन म्हणतात की, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूपूर्वीच आमच्याकडे चर्च स्थापन झालं होतं. त्यामुळे आम्ही रोमन कॅथलिक पण नाही नि ग्रीक ऑर्थोडॉक्सपण नाही, आमचं चर्च आहे इथिओपियन ओरिएंटल ऑर्थोडॉक्स चर्च.
 
 
इथिओपिया आणि अरेबियन द्वीपकल्प यांच्यामध्ये फक्त तांबडा समुद्र. त्यामुळे अरब व्यापारी इथिओपियात अजिबातच नवे नव्हते, प्रेषित मोहंमदांच्या हयातीतच इस्लाम धर्म अरबस्तानातून इथिओपियात शिरला, अरब व्यापारी अ‍ॅबिसीनियाला म्हणायचे ‘अल हबश’ आणि तिथल्या नागरिकांना म्हणायचे ‘हबशी.’ अरब दर्यावर्दी व्यापार्‍यांबरोबर त्यांचे अनेक हबशी गुलाम भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आले. शिवरायांनी सन १६६४ मध्ये पहिल्यांदा सुरत लुटली. त्यावेळी अ‍ॅबिसीनियाचा राजा होता, फासिलिडस किंवा बासिलिडे. गंमत म्हणजे, तो अगदी निष्ठावंत इथिओपियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन होता. पण, राज्यावर बसल्यावर त्याने अरबी सदृश पदवी धारण केली- ‘आलम सगड’ म्हणजे ‘जग ज्याच्यासमोर नम्र होतं असा.’ सन १६६० मध्ये औरंगबेजाने आपल्या बापाला कैदेत टाकून राज्य बळकावलं आणि पदवी धारण केली ‘आलम गीर’ म्हणजे ‘जगाचा मालक.’ सन १६६४ साली अ‍ॅबिसीनियाच्या आलम सगडने मुघल बादशाह आलमगीर यांच्याशी मैत्री करण्यासाठी आपला एक वकील पाठवला. त्याचं नाव होतं ख्वाजा मुराद. ख्रिश्चन राजाचा मुसलमान वकील. सुरत शहर लुटणार्‍या शिवरायांच्या माणसांनी शहरातल्या सर्व सराया धुंडाळल्या. त्यात हा ख्वाजा मुराद पण सापडला. त्याला शिवरायांसमोर हजर करण्यात आलं. बराच वेळ त्याने शिवरायांना प्रत्यक्ष काम करताना पाहिलं आणि त्याला काय वाटलं कुणास ठाऊक; तो परत सराईत आला आणि औरंबजेबासाठी म्हणून राजा फासिलिडसने पाठवलेला खूप मोठा नजराणा त्याने सरळ शिवरायांनाच नजर केला. फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या सुरेंद्रनाथ सेन लिखित ग्रंथात हकिकत आहे.
 
 
आता आपण परत आफ्रिका खंडाकडे वळूया. ते पाहा, आफ्रिकेच्या पूर्व भागातलं लेक व्हिक्टोरिया नावाचं अतिविशाल सरोवर. ६८,८०० चौ.किमी एवढ्या अवाढव्य क्षेत्रावर ते पसरलं आहे. टांझानिया, केनिया आणि युगांडा या देशांच्या प्रत्यक्ष भूमीतच ते आहे. पण, बुरुंडी, रुआंडा आणि काँगो या देशांमधून वाहणार्‍या अनेक छोट्या नद्या त्या सरोवरात विलीन होतात. दुसरीकडे म्हणजे उत्तरेकडे त्या सरोवरातून जगातली सर्वाधिक लांबीची अशी नाईल नदी उगम पावते. युगांडाच्या पर्वतीय आणि दाट जंगल प्रदेशातून ती सुदानच्या मैदानी-वाळवंटी प्रदेशात आली की, तिला म्हणतात ‘श्वेत नाईल-व्हाईट नाईल.’ एका सुदान देशाचे आता अंतर्गत यादवीमुळे ‘दक्षिण सुदान’ आणि ‘प्रजासत्ताक सुदान’ असे दोन देश झालेत. सुदानच्या पूर्वेलाच इथिओपिया. राजधानी आदिस अबाबाच्या उत्तरेला आहे, लेक ताना नावाचं २१५६ चौ. किमी क्षेत्रफळाचं विशाल सरोवर. उत्तर इथिओपियातल्या सामेन नावाच्या डोंगररांगेतून वाहणार्‍या अनेक छोट्या नद्या लेक तानामध्ये विलीन होतात, तर दुसरीकडे त्यातूनच आणखी एक नाईल नदी उगम पावते. तिला म्हणतात ‘ब्लू नाईल-नील नाईल.’ वायव्यकडे सुदानी प्रदेशात वाहत जाऊन नील नाईल जिथे श्वेत नाईलला मिळते, त्या संगमावरच वसलंय शहर खार्टूम. सुदानची राजधानी. आता दोन्ही नाईल नद्यांचा तो एकत्रित प्रचंड जलौघ इजिप्तमध्ये प्रवेश करतो आणि सरळ उत्तरेकडे वाहत भूमध्य समुद्राला मिळतो. नाईलच्या त्या मुखावरच वसलंय जगातलं एक अत्यंत प्राचीन आणि इजिप्तचं प्रमुख बंदर -अल् इस्कंदरिया किंवा अलेक्झांड्रिया.
 
 
पण नाईल नदी सुदान ओलांडून इजिप्तमध्ये प्रवेश करते तिथे लगेचच इजिप्तने एक प्रचंड धरण बांधतंय. त्याचंच नाव आस्वान. आस्वानच्या पाण्यामुळे जे सरोवर निर्माण झालंय, त्याला इजिप्तने त्यांचा सर्वात लोकप्रिय नेता अब्दल गमाल नासर याचंच नाव दिलंय - लेक नासर. इजिप्तची शेती, जलसिंचन, जलविद्युत, पेयजल सारं काही शत-प्रतिशत नाईल नदी आणि नासर सरोवराच्या विविध प्रकल्पांवर अवलंबून आहे. दुसरीकडे युरोप-आफ्रिका-आशिया या तिन्ही खंडांना जोडणारा जो सुवेझ कालवा, तो इजिप्तच्या ताब्यात आहे. म्हणजेच जागतिक व्यापार सुरळीत चालू राहण्यासाठी इजिप्तचा एकंदर कारभार सुरक्षित, सुरळीत चालू असणं गरजेचं आहे. म्हणूनच जागतिक व्यापार क्षेत्रात सर्व देश इजिप्तला सांभाळून असतात. आता १९९५ साली इथिओपिया सुमारे २१ वर्षांच्या दडपशाही कम्युनिस्ट राजवटीचं जोखड झुगारून लोकशाही देश बनला. आपल्या देशाची भरभराट व्हावी म्हणून नव्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या. इथिओपियाची भूमी सुपीक आहे, पण शेतीच्या पद्धती जुनाट. तेव्हा नव्या जलसिंचन पद्धतीने शेती करावी, जुन्या बरोबरच नवीन क्षेत्रेही ओलिताखाली आणावीत म्हणून त्यांनी अमेरिकेच्या ‘ब्युरो ऑफ रेक्लमेशन’ या संस्थेचा सल्ला घेतला. ब्युरोनेच इथिओपियन सरकारला कल्पना दिली की, नील नाईल नदीत भरपूर पाणी आहे. तिच्यावर धरण बांधलंत तरी जलसिंचन आणि जलविद्युत यांचा अमर्याद पुरवठा होऊ शकेल.
 
 
२०११च्या ऑक्टोबरमध्ये प्रकल्प सुरु झाला. इथिओपियन मंत्रिमंडळानेच त्याला नाव दिलंय-ग्रॅण्ड इथिओपियन रिनायसान्स डॅम. एकेकाळी आफ्रिकेत आणि आशियात साम्राज्य करणार्‍या इथिओपियाला मधल्या काळात गरिबी आली. पण, आता हा प्रकल्प आमच्या समृद्धीचं पुनरुज्जीवन करणार आहे. पण, तिकडे इजिप्तच्या काळजाचा ठोका चुकला. नील नाईलवर धरण होणार म्हणजे ती श्वेत नाईलला मिळून पुढे लेक नासरमध्ये येऊन साठणारं पाणी कमी होणार. म्हणून इजिप्तने टांझानिया, युगांडा, केनिया, बुरुंडी, रुखांडा, काँगो, सुदान या सगळ्या नाईलशी जोडलेल्या देशांना इथिओपियाविरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न केला. पण, कुणीही इजिप्तला साथ दिली नाही. अहो, माझ्या देशात उगम पावणार्‍या नदीवर धरण बांधायचं की नाही, हे मी ठरवणार, तुम्ही लुडबूड करणारे कोण? हां, तुम्हाला पण पाणी मिळावं म्हणून वाटाघाटी नक्की करु. पण, हुषारी केलीत, तर खपवून घेणार नाही. तुमच्या आस्वान धरणातील पाण्याची पातळी तेवढीच राहावी म्हणून आम्ही आमच्या देशात धरणच बांधू नये, हा कुठला न्याय? तर असा हा आफ्रिकेतला पाणी प्रश्न आहे. पाण्याच्या तुटवड्याचा नव्हे, तर पहिल्यासारखं वारेमाप पाणी वापरता येणार नाही; जपून, मोजून मापून वापरावं लागेल, ही जाणीव होऊन पापड वाकडा झालेल्या इजिप्तचा.
 
 
 
Powered By Sangraha 9.0