मुंबईतील मॉल्सची अग्निसुरक्षा वार्‍यावर

27 Oct 2020 20:11:54

Mumbai malls_1  
 
 
राज्य सरकारने मॉल्स खुले करायला परवानगी दिल्यामुळे मॉलमधील दुकाने उघडली खरी. पण, गेल्या काही महिन्यांत मुंबईतील मॉल्समध्ये घडलेल्या अग्नितांडवांच्या घटनांनी या मॉल्सच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
मुंबईमध्ये नुकतीच सिटी सेंटर मॉलमध्ये मोठ्या आगीची एक घटना घडली. पण, ही आग पाऊस अथवा वादळी वार्‍यामुळे न लागता, ती इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक सामानामुळे लागल्याचे निष्पन्न झाले. ही आग लागायला व पसरायला आणखीही काही कारणे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, मॉलमधील दुकानदारांचा नियोजनशून्य कारभार व मुंबई महापालिकेच्या इमारत बांधण्याच्या नियमावलींकडे केलेले पूर्णपणे दुर्लक्ष. मध्य मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील बेलासीस रोडवरील नागपाडाजवळील व बस आगारासमोरील भूखंडावर ५५ माळ्यांची काचेच्या फसाडची निवासी इमारत आहे. त्याच भूखंडावर रस्त्याजवळच्या भागात चार माळ्याची सिटी सेंटर मॉलची इमारतीची बांधणी झालेली होती, तेथेच ही मोठी आग भडकली. या मॉलमध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक सामान विकण्याच्या दुकानांना परवानगी देण्यात आली. या मॉलमधील बहुतांश दुकाने ही मोबाईल विक्रेत्यांची होती व तेथे पुष्कळ गुंडाळलेल्या वायरीही ठेवल्या असल्याचे समजते.
 
गुरुवार, दि. २२ ऑक्टोबरच्या रात्री 8.५३ वाजता या मॉलमधील दुसर्‍या मजल्यावरच्या मोबाईल दुकानातील बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली. सुरुवातीला दुकानदारांनी स्वत:च आग विझविण्याचे असफल प्रयत्न केले व नंतर फायर ब्रिगेडला बोलाविले. परंतु, ती आग मात्र मध्यरात्रीपर्यंत तिसर्‍या माळ्यापर्यंत पसरली. खरं तर इतक्या दाटीदाटीत बांधलेल्या दुकानांना मुंबई महापालिकेने वास्तविक परवानगीच द्यायला नको होती. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू दुकानामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आणि ही दुसर्‍या मजल्यावरील आग तिसर्‍या मजल्यावर पोहोचली. आगीने काही क्षणातच अक्राळविक्राळ रूप धारण केले. धुराचे साम्राज्य संपूर्ण मॉलमध्ये व पाठीमागच्या हाय राईझ निवासी इमारतीत पसरले. आग विझविण्यासाठी २२८ वॉटर टँकरमधून २८ लाख लीटर पाण्याचा मारा करण्यात आला. पण, धुरामुळे आगीची ठिकाणे स्पष्ट होत नव्हती.
 
अग्निशमन दल तेथे गुरुवारी रात्री ९ वाजता पोहोचले व त्यांनी ती आग छोटीशीच असल्याने अग्नी तीव्रता क्रमांक १ ची पातळी ठरविली. परंतु, रात्री सौम्य रूपातून मोठ्या रौद्र रूपात ती आग पालटल्यावर अग्निशमन दलाने पातळी २, ३, ४ व शेवटी ५च्या पातळीची घोषणा केली व ब्रिगेडियर कॉल दिला. असा कॉल दिल्यानंतर मुंबईतील अग्निशमन दलाकडे अग्निशमनासाठी जेवढी म्हणून साधने इंजिने, बीपीसीएल व एचपीसीएलचे वॉटर टँकर होते, ते सर्व या अग्निशमनाकरिता आणून वापरण्याची व्यवस्था केली. या आगीत क्षणाक्षणाला आगीचा भडका उडाल्यामुळे अग्निशमनदलाने अधिक कुमक बोलावली व अग्निशमन साधने वा वाहनांची रीघ लावली. २०० हून अधिक अग्निइंजिने, जम्बो टँकर व अग्निविमोचन वाहने इत्यादी वाहने व साहित्य घटनास्थळी दाखल झाले होते. या अग्निशमन कामाकरिता ३०० जण कार्यरत होते, त्यात अग्निशमन अधिकारी, अग्निशमक जवान व पोलीस इत्यादींचा सहभाग होता. असाच ब्रिगेड कॉल आधी काळबादेवीच्या गोकूळ निवासची आग विझविण्याकरिता जून २०१५ मध्ये दिलेला होता. त्यावेळी अग्निशमन दलाच्या तीन अधिकार्‍यांना प्राण गमवावे लागले होते. त्याआधी मंत्रालयातील आग विझविण्याच्या वेळी २०१२ मध्ये ‘ब्रिगेड कॉल’ दिला होता. त्यावेळी तीन माणसे गतप्राण झाली होती.
 
 
अग्निशमन अधिकारी व काही जवान जखमी
 
 
या मॉलला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलातील उप-अग्निशमन अधिकारी गिरकर (५०), अग्निशामक जवान रवींद्र प्रभाकर (५३) जखमी झाले, तर श्यामराव बंजारा (३४), भाऊसाहेब बदाणे (२६), संदीप शिर्के यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयामध्ये नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आले.
 
 
अग्निशमन यंत्रणा अकार्यक्षम
 
 
अग्निशमन दल जवान आगीच्या घटनास्थळी पोहोचल्यावर मॉलची अग्निशमन यंत्रणा अकार्यक्षम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही यंत्रणा योग्य रीतीने कार्यान्वित केली गेली असती, तर या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविता आले असते आणि मोठी हानी टळली असती, असे अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.
 

आगीत अनेक दुकानांची राखरांगोळी
 
ही मॉलची आग विझविण्याकरिता ४० तास गेले तरी ती आग थांबली नव्हती. परंतु, तिला विझवायला ४८ तास लागल्यानंतरही ती धुमसत होती. मॉलच्या दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील इलेक्ट्रॉनिक व मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची बहुतांश दुकाने आगीत भस्मसात झाली. तेथे प्लास्टिक, मोबाईल फोन, बॅटरी, प्रिंटर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा भरपूर प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे लघु उद्योग व्यावसायिकांना आधीच सहा महिने नुकसान सोसावे लागले होते. त्यात या मोठ्या आगीमुळे त्यांचे रोजगारीचे साधनच नष्ट झाले. ही दुकाने दहा वर्षांपूर्वी मनीष मार्केटमधून स्थलांतरित करून या मॉलमध्ये सुरु झाली होती. मॉलमध्ये सुमारे एक हजार ते १,२०० दुकाने होती. प्रत्येकाचे ३० ते ४० लाख म्हणजे एकूण कित्येक करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा होती. पण, अग्निशमन कामाकरिता मुख्य पॉवर स्वीच बंद केल्याने ती यंत्रणा कार्यान्वित होऊ शकली नाही. काही अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झाले असावे. अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे, डिझेल जनरेटर सेट लाईटिंगकरिता व दुसरा डीजी सेट फायरफाईटिंगकरिता असणे जरुरी आहे.
 
 
५५ माळ्यांच्या ‘ऑर्किड एनक्लेव्ह’मध्ये राहणार्‍या लोकांची गैरसोय
 
 
मॉलच्याच पाठीमागच्या भागातील या ५५ माळ्यांच्या हाय राईझ इमारतीमध्ये सुमारे ३,५०० लोक राहतात. तेथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रचंड धूर पसरू लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या ३,५०० रहिवाशांना झोपेतून जागे करून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलवून सुटका केली. आगीत कोणालाही इजा झाली नाही. या इमारतीमध्ये व मॉलच्या इमारतीला काचेचे फसाड असल्याने आतमध्ये वातानुकूलित इंजिने सुरू होती. काचेच्या खिडक्या असल्याने नेहमीची हवा येण्यासाठी कष्ट पडत होते व धूर बाहेर लवकर न गेल्याने धुराची हवा कोंडली गेली, त्यामुळे इमारतीच्या आतून अग्निशमनाचे काम करणे मोठे आव्हानात्मक ठरत होते. आगीचे रूप व्यवस्थित दिसण्यासाठी व योग्य व्हेंटिलेशनसाठी काचेचे पॅनेल तोडावे लागले. आग विझविण्याकरिता फायर रोबोचा वापर करावा लागला होता. या इमारतीचे पोडियम व भिंतीला वा कदाचित, मुख्य इमारतीलासुद्धा आगीमुळे हानी पोहोचली आहे. इमारतीचे काही भाग केव्हाही कोसळू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
मॉलमधील दुकानांना आग लागण्याची पुनरावृत्ती
 
सुमारे दहा वर्षांपूर्वी क्रॉफर्ड मार्केटजवळच्या मनीष मार्केटला आग लागल्यामुळे तेथील कटलरी दुकानांनी या सिटीसेंटरच्या मॉलमध्ये स्थलांतर केले होते. पण, दुर्दैवाने येथेही आग लागून या छोट्या दुकानदारांचे पुन्हा एकदा आगीमुळे नुकसान झाले. तसेच या मॉलचेही एकूण ८० टक्क्यांहून जास्त नुकसान झाले आहे. अशीच आग बोरिवली पश्चिमेच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला जुलै २०२० मध्ये लागली होती. पातळी 3च्या आगीत शॉपिंग सेंटरमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या ९० गाळ्यांपैकी १५ ते २० गाळे पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यावेळी १४ फायर इंजिन्स व १३ जम्बो वॉटर टँकर वापरले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता थर्मल कॅमेरा व रोबोचा वापर करण्यात आला होता. या मॉलमध्ये पार्किंगसाठी ठेवलेल्या जागेत नियमभंग करून ती जागा दुकानांसाठी वापरली होती. अग्निशमन दलाचे दोन जवान १२ तासांच्या आग विझविण्याच्या वेळी अत्यवस्थ झाले होते. ऑक्टोबर महिन्यातच मस्जिद बंदरच्या प्लास्टिक व मोबाईल दुकाने असलेल्या इमारतीत पुन्हा एकदा आगीचा भडका उडाला. ती आग विझवायला तब्बल ३० तास लागले होते आणि दोन जवान जखमी होऊन बेशुद्ध पडले होते.
 
 
खरं तर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व मॉल्सचे अग्निशामन दलाकडून वर्षातून एकदा फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून घेतले पाहिजे. ‘कोविड रुग्णालय’करिता आग लागू नये म्हणून दोन आठवड्यांतून एकदा फायर सेफ्टी ऑडिट करावे, असा सल्ला एका तज्ज्ञाने दिला होता, ते याच अनुषंगाने. अग्निशमन दलातील रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी भरतीवरील निर्बंध पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आता उठवले आहेत. अग्निशमन दलातील ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. आयुक्तांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची पदे तूर्तास भरली जाणार म्हणून आदेश दिले आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाचे मनुष्यबळ वाढणार असले तरी एकूणच फायर ऑडिटचे नियम अधिक कठोर करुन, त्याचे उल्लंघन करणार्‍यांना कडक शिक्षेची तरतूदच करायला हवी.
 
 
 
Powered By Sangraha 9.0