वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह सेल'चा प्रस्ताव
मुंबई (अक्षय मांडवकर) - पक्ष्यांचे दर्शन घेण्यासाठी पक्षीनिरीक्षकांचे आवडते ठिकाण असणाऱ्या 'भांडुप उद्दचन केंद्रा'मध्ये प्रवेश करण्यासाठी यापुढे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. प्रवेशाबरोबरच लोकांकडून वाहने पार्क करण्यासाठी आणि कॅमेरा बाळगण्यासाठी शुल्क आकारण्यात येईल. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे. पर्यटकांसाठी 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'ची दारे उघडल्यानंतर 'भांडुप उद्दचन केंद्रा'च्या परिसरात या नियमांची अंमलबजावणी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या वनपरिक्षेत्राचा भाग असणारे 'भांडुप उद्दचन केंद्र' हे पक्षीनिरीक्षकांचे आवडते ठिकाण आहे. येथील उद्दचन केंद्राचा भाग हा मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा असून उर्वरित कांदळवनांचा भाग हा 'मॅंग्रोव्ह सेल'च्या अधिपत्याखालील आहे. या परिसरात साधारण २३० प्रजातींचे पक्षी दिसतात. त्यामुळे पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी याठिकाणी हौशी पक्षीनिरीक्षकांसोबतच अभ्यासक आणि संशोधकांची नेहमीच रेलचेल असते. याशिवाय अनेक पर्यावरणीय संस्था निसर्ग भ्रमंतीसाठी याठिकाणी सहली आयोजित करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यापरिसरात अनेक गैरप्रकार घडत आहेत. गुन्ह्यांबरोबरच मोठ्या संख्येने मद्यसेवनासाठी रात्रीच्या वेळी यापरिसरात लोक येतात. त्यामुळे या परिसराच्या संरक्षणाबरोबरच याठिकाणी निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने 'मॅंग्रोव्ह सेल'कडून काही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यामाध्यमातून यापुढे 'भांडुप पम्पिंग स्टेशन'मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येईल.
गेल्या आठवड्यात 'मॅंग्रोव्ह सेल'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी यापरिसराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी याठिकाणी काही उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रवेशाप्रमाणाचे यापुढे 'भांडुप पम्पिंग स्टेशन'मध्ये प्रवेशासाठी ५० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती विरेंद्र तिवारी यांनी दिली. त्यासाठी याठिकाणी चौकी उभरण्यात येईल. प्रवेश शुल्काबरोबर वाहने पार्क करण्यासाठी दुचाकी स्वारांकडून ५० रुपये आणि चार चाकी वाहनांसाठी २०० रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. शिवाय कॅमेऱ्यासाठी १५० ते २०० रुपये आकारण्याचा प्रस्ताव असल्याचे तिवारी यांनी सांगितले. या परिसरात विशिष्ट कालावधीतच लोकांना प्रवेश देण्यात येईल. परिसराच्या संरक्षणार्थ 'महाराष्ट्र पोलीस दला'चे जवान तैनात करण्यात येतील. तसेच परिसराच्या स्वच्छतेवर भर देण्यात येईल. पर्यटकांसाठी 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' खुले झाल्यावर 'भांडुप पम्पिंग स्टेशन' येथे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आम्ही असल्याचे तिवारी यांनी नमूद केले.