पथदर्शक दीप

26 Oct 2020 21:26:08

Mohanji Bhagwat_1 &n
 
 
 
डॉ. मोहनजी भागवत यांचे विजयादशमीचे भाषण वर्षभराची विषयसूची ठेवणारे झाले आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रात प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या क्षमतेप्रमाणे काम करीत राहील.
 
 
प्रथेप्रमाणे दरवर्षी विजयादशमीला रा. स्व. संघाचे सरसंघचालक यांचा बौद्धिक वर्ग होतो. प्रसारमाध्यमांच्या भाषेत सांगायचे, तर सरसंघचालकांचे भाषण होते. जवळजवळ ६५ वर्षे मी, विजयादशमीचे सरसंघचालकांचे भाषण वाचत आलो आहे आणि गेली काही वर्षे ऐकत आलो आहे. १०-१२ वर्षांचा असताना ते भाषण फारसे समजत नसे. जसजसे वय वाढू लागले, तसतसे भाषणाच्या विषयाचे थोडे-थोडे आकलन होऊ लागले. १9७० ते १98० पर्यंत सरसंघचालकांच्या भाषणाची दखल प्रसारमाध्यमांनी कधी गंभीरपणे घेतल्याचे स्मरणात नाही. त्याचे कारण असे की, संघ आजच्यासारखा शक्तिस्थानावर नव्हता. आज तो शक्तिस्थानावर असल्यामुळे सर्व देशाला या भाषणाची दखल घ्यावी लागते.
 
 
डॉ. हेडगेवार सरसंघचालक असताना विजयादशमी उत्सवातील त्यांची भाषणे प्रामुख्याने संघस्वयंसेवकांना उद्देशून असत. या भाषणात ते आपल्या कार्याची प्रगती कशी झाली आहे, याचा आढावा मांडत, हिंदू समाजापुढील समस्यांबद्दलचा विचार मांडत. श्रीगुरुजींच्या काळात संघ झपाट्याने वाढू लागला. त्यामुळे विषयाची व्याप्तीदेखील वाढू लागली. काश्मीर प्रश्न, चीन, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, अन्य समस्या यावर श्रीगुरुजी विस्ताराने बोलत राहिले. मला आठवतं की, सरसंंघचालकांचे भाषण हे एखाद्दुसर्‍या वर्तमानपत्रात एक-दोन परिच्छेदात कुठेतरी छापून येत असे, ते शोधावे लागत असे. संघ इतका अदखलपात्र होता.
 
 
आज परिस्थितीमध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेले आहेे. आजचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत विजयादशमीच्या उत्सवात काय बोलणार आहेत, याची चर्चा ते भाषण होण्यापूर्वीच वर्तमानपत्रात सुरू होते. आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे भाषणात काय काय असू शकते, याचे अंदाज बांधले जातात. देशातील बहुतेक सगळ्या वृत्तवाहिन्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करतात. यामुळे घरी बसून भाषण टीव्हीच्या पडद्यावर बघता येते आणि ऐकता येते. देशातील लाखो संघ स्वयंसेवकांप्रमाणे मीदेखील हे भाषण पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत लक्षपूर्वक आणि श्रद्धापूर्वक ऐकले.
 
 
स्वयंसेवकाची मनःस्थिती वेगळी असते. सरसंघचालक हे त्यांच्या दृष्टीने परमश्रद्धेचे आणि आदराचे स्थान असते. त्यांचा प्रत्येक शब्द त्याला वेदवाक्याप्रमाणे असतो. म्हणून तोे हे भाषण श्रद्धापूर्वक ग्रहण करीत असतो, त्यावर विचार करतो. संघकाम करीत असताना आपल्याला काय करायचे आहे, कुठे कुठे लक्ष द्यायचे आहे, आपल्या विचाराची आणि चिंतनाची दिशा कोणती असली पाहिजे, याचे मार्गदर्शन त्याला होते. डॉ. मोहनजी भागवत यांचे विजयादशमीचे भाषण वर्षभराची विषयसूची ठेवणारे झाले आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रात प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या क्षमतेप्रमाणे काम करीत राहील.
 
 
सरसंघचालकांचे भाषण सर्वांनी ऐकलेले असल्यामुळे आणि वर्तमानपत्रातूनही ते विस्ताराने आले असल्यामुळे ते काय बोलले, हे पुन्हा येथे सांगण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. तरीही या भाषणाचे एक सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे की, हे भाषण सर्व राष्ट्राला उद्देशून झालेले आहे. डॉ. हेडगेेवारांची भाषणे स्वयंसेवकांना उद्देशून असत, श्रीगुरुजींची भाषणे हिंदू समाजाला उद्देशून असत, मोहनजींचे भाषण हिंदू समाजाला उद्देशून तर आहेच; परंतु मोहनजी रूढार्थाने ज्याला ‘हिंदू’ म्हणतात, त्याचा धार्मिक अर्थ करतात, उपासना पद्धतीशी तो जोडतात, त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आपल्या भाषणात त्यांनी ‘हिंदुत्व’ म्हणजे काय, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, “हिंदुत्व हा एक शब्द आहे, ज्याचा अर्थ उपासनेशी जोडल्यामुळे संकुचित केला गेला आहे. संघाच्या भाषेत, अशा संकुचित अर्थाने तो शब्द वापरला जात नाही. हा शब्द आपल्या देशाच्या अस्मितेचा, अध्यात्म आधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि समस्त मूल्यसंपदेसह अभिव्यक्ती देणारा शब्द आहे. ज्यांना हा देश आणि समाज खंडित करायचा आहे, ज्यांना आपल्याला आपसात लढवायचे आहे, ते लोक जो शब्द सर्वांना जोडतो, त्यालाच आपल्या निंदा आणि टीकेचे प्रथम लक्ष्य बनवितात. जेव्हा संघ, ‘हिंदुस्थान एक हिंदुराष्ट्र आहे’ अशी घोषणा करतो, तेव्हा त्यामागे कोणतीही राजकीय किंवा सत्ताकेंद्रित संकल्पना नसते. आपल्या राष्ट्राचे ‘स्व’त्व हेच हिंदुत्व आहे.”
 
 
हे भाषण राष्ट्राला उद्देशून असल्यामुळे राष्ट्रापुढील अनेक समस्यांचा परामर्श त्यांनी आपल्या भाषणात घेतलेला आहे. चीन, काश्मीर, नागरिकत्व विधेयक, कोरोना संकट, शासनाची सकारात्मक धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापारातील आपली स्थिती, स्वदेशी, स्वावलंबन, तुकडे तुकडे गँग, संविधानाच्या उद्देशिकेतील भव्य आशय अशा अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. निवडणूक हे स्पर्धात्मक राजकारण आहे, एकमेकांचे शत्रू बनण्याचे राजकारण नाही, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले.
 
 
देशातील अनेक नेते पक्षीय भूमिकेतून, राजकीय भूमिकेतून, सत्ता संपादनाच्या भूमिकेतून विषयांची मांडणी करतात, अशी मांडणी त्या त्या पक्षाच्या दृष्टीने योग्य असते. परंतु, अशी मांडणी राष्ट्रीय मांडणी होऊ शकत नाही. राष्ट्रीय मांडणी करण्यासाठी राजकारण, सत्ताकारण, पक्षीय हित, या सर्व गोष्टी बाजूला ठेेवून जे राष्ट्राच्या हिताचे तेच मांडावे लागते. मोहनजींच्या भाषणातील शब्द न् शब्द राष्ट्रीय दृष्टी देणारा आणि राष्ट्रीय हिताची जपवणूक करणारा आहेे. हे या भाषणाचे एक आगळे-वेेगळे वैशिष्ट्य आहे.
देशात राजकीय घडामोडी सातत्याने होत असतात. महाराष्ट्राचे राजकारण, बिहारच्या निवडणुका, राजस्थान, आंध्र प्रदेश, प. बंगाल, मध्य प्रदेश येथील राजकीय घडामोडी, असे अनेक विषय देशाच्या विषयसूचीवर असतात. यापैकी कुठल्याही विषयाला सरसंघचालकांनी आपल्या भाषणात स्पर्श केलेला नाही. पक्षीय राजकारणावर राजकीय हेतू ठेवून भाष्य करणे, ही संघाची पद्धती नसल्यामुळे त्यांनी राजकीय विषयाला स्पर्श न करणे अगदी स्वाभाविक आहे. म्हणून हे भाषण प्रचलित राजकारणाच्या पलीकडे जाणारे आणि राष्ट्रकारणाचे भाषण आहे.
 
 
आपला देश विशाल देश आहे. अनेक भाषा येथे बोलल्या जातात. सर्व प्रकारची येथे विविधता आहे. अनेक उपासना पंथ आहेत. प्रत्येक प्रदेशाची सांस्कृतिक ओळख स्वतंत्र असते. अशा विविधतेने नटलेल्या देशाला राष्ट्रीयतेच्या एका सूत्रात बांधणे, हे सोपे काम नाही. राजकारणाच्या माध्यमातून हे काम एका मर्यादेपर्यंतच होऊ शकते. कारण, राजकारण समाजात अनेक प्रकारचे कलह निर्माण करते. राजकरणाचा तो गुणधर्म आहे. म्हणून म्हटलं जातं की, ’Politics Divides, Culture Unites.' संघकाम सांस्कृतिक आहे. म्हणजे सर्व समाजाला जोडण्याचे काम आहे.
 
 
सर्व समाजाला जोडणारा शब्द आहे ‘हिंदू.’ त्याचे विस्ताराने विवरण मोहनजींनी आपल्या भाषणात केले आहे. जगातील राष्ट्रांचा विचार केला असता, प्रत्येक राष्ट्रातील समाजाला बांधून ठेवणारी एक मूल्यपरंपरा असते. इंग्लंडचा विचार केला तर राजघराण्याविषयी श्रद्धा आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन, या दोन गोष्टी तेथे समाजाला बांधून ठेवणार्‍या आहेत. अमेरिकेला बांधून ठेवणारी राज्यघटना आणि ‘लिबर्टी’चा विषय आहे. भारताला बांधून ठेवणारा शब्द ‘हिंदू’ आहे. तो आपल्या मूल्यपरंपरेला जोडलेला आहे. कोरोनासंकटाच्या काळात समाजाने जे संकटात आहेत, त्यांना आपणहून सर्व प्रकारची मदत केली, कुणीही न सांगता केली. कारण, ही आपली मूल्यपरंपरा आहे. ही मूल्यपरंपरा प्राचीनकाळापासून संस्कारानेे आपल्याकडे आलेली आहे.
 
 
हिंदू समाजाची ही मूल्यपरंपरा या संकटकाळात तेवढ्या उत्कटतेने का प्रकट झाली? या प्रश्नाचे उत्तर ९५ वर्षांच्या संघकामात आहे. ही मूल्ये आपण जगायची असतात. असा जगणारा एक समूह या देशात उभा राहिला. या समूहाने एक वातावरण निर्माण केले. हे निर्माण केलेले वातावरण शब्दात पकडता येत नाही. ग्रंथात सांगता येत नाही आणि भाषणातून व्यक्त करण्याच्या त्याच्या मर्यादा आहेत. या वातावरणाचा सकारात्मक परिणाम समाजमनावर होत जातो. त्याला शिकवावे लागत नाही. त्याला सांगावे लागत नही. संत परंपरेतून हा सगळा विषय पिढ्या न् पिढ्या त्याच्या कानावर पडलेलाच असतो.
 
 
या कोरोना संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून लाखो स्वयंसेवक विविध प्रकारची सेवाकार्ये करण्यासाठी युद्धभूमीवर उतरले. त्यांना कुणी आदेश दिलेला नव्हता. त्यांनी हे काम मूल्य-परंपरांच्या संस्काराने आणि कर्तव्य भावनेने केले. त्यात काही जण हुतात्मा झाले. त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख मोहनजींनी आपल्या भाषणात केलेला आहे.
 
 
समाजाची ही मूल्यात्मक भावजागृती, हा या राष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. हिंदू समाज मूल्यात्मक जीवन जगण्यासाठी धडपडतो आहे. ही प्रसादचिन्हे आहेत. याच वाटेने आपल्याला पुढे जायचे आहे. हीच आपली ‘स्व’ची ओळख आहे. आपल्यामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे, ही विविधता जपत आणि मूल्य जगत एकात्म व्हायचे आहे. कोरोनाचे संकट काही भावात्मक गोष्टीही घेऊन आले, त्यातील हा सकारात्मक भाग आहे. स्वच्छता, आपली जीवनशैली, आहार पद्धती, कौटुंबिक नातेसंबंध, त्यांची जपवणूक, या सर्व गोष्टी आपण जपायला शिकलोे आहोत. कोरोनाने आपल्याला त्या विषयाकडे नेलेले आहे. मोहनजींनी याचे सुंदर विवरण केले आहे. संघ आणि समाज, अशी दरी राहता कामा नये. संघ म्हणजे, समाज आणि समाज म्हणजे संघ, असे अद्वैत निर्माण करणे हेच संघाचे लक्ष्य आहे. मोहनजींचे भाषण या लक्ष्याकडे घेऊन जाणारा पथदर्शक दीप आहे, एवढे त्याचे महत्त्व आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0